भ्रष्टाचारापुढे ‘क्लीन बोल्ड’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Oct-2019
Total Views |





शाकिबने सट्टेबाजांच्या सांगण्यावरून भ्रष्टाचार केला की तो निर्दोष
, हे चौकशीअंती समोर येईलच. मात्र, सट्टेबाजांनी आपल्याशी संपर्क साधला याबाबतची माहिती दडवून ठेवणे, हादेखील गुन्हा असून ‘आयसीसी नियम २.४.४’चा शाकिबने भंग केल्याचा ठपका आयसीसीने ठेवला आहे. यामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली असून त्याला आंतरराष्ट्रीय सामने आणि आयपीएल स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.


बांगलादेशचा माजी कर्णधार शाकिब-अल-हसन याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दोन वर्षांची बंदी घातली आणि भ्रष्टाचाराची कीड ही क्रिकेट विश्वात आजतागायत कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. सट्टेबाजांनी भ्रष्टाचाराच्या उद्देशाने शाकिबशी तीनदा संपर्क साधला. दोन आंतरराष्ट्रीय सामने आणि एका इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) सामन्यांदरम्यान सट्टेबाजांनी आपल्याशी संपर्क साधला होता, अशी कबुली खुद्द शाकिबने आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकार्‍यांसमोर दिली. शाकिबने सट्टेबाजांच्या सांगण्यावरून भ्रष्टाचार केला की तो निर्दोष, हे चौकशीअंती समोर येईलच. मात्र, सट्टेबाजांनी आपल्याशी संपर्क साधला याबाबतची माहिती दडवून ठेवणे, हादेखील गुन्हा असून ‘आयसीसी नियम २.४.४’चा शाकिबने भंग केल्याचा ठपका आयसीसीने ठेवला आहे. यामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली असून त्याला आंतरराष्ट्रीय सामने आणि आयपीएल स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. नियमांनुसार आयसीसीने घातलेली ही बंदी योग्यच असल्याचे मत क्रिकेट समीक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.



‘मॅच फिक्सिंग‘ करण्यासाठी सट्टेबाज खेळाडूंना आर्थिक रसद पुरवत भ्रष्टाचार करण्यास भाग पाडतात आणि त्यांना आपले लक्ष्य बनवतात, हे सर्वश्रुत आहे. ‘मॅच फिक्सिंग’ किंवा ‘स्पॉट फिक्सिंग’चे प्रकार क्रिकेट जगतात नवीन नाहीत. याची अनेक उदाहरणे डोळ्यासमोर आहेत. याला बळी पडून अनेक खेळाडूंचे करिअर संपुष्टात आले आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर आयपीएल सामन्यांदरम्यान २००८ साली झालेले ‘स्पॉट फिक्सिंग’चे प्रकरण. या ‘स्पॉट फिक्सिंग’ने संपूर्ण क्रिकेट विश्व ढवळून निघाले. आपल्या तेज गोलंदाजीने क्रिकेट विश्वात दबदबा निर्माण करणारा एस. श्रीशांतसारख्या खेळाडूचे करिअर बहरत असतानाच संपुष्टात आले. श्रीशांतसोबतच अंकित चव्हाण आणि अजित चंडेला हे दोन्ही खेळाडूही क्रिकेटपासून दुरावले. केवळ भारतीयच नव्हे, तर परदेशातीलही अनेक खेळाडूंची कारकिर्द फिक्सिंगला बळी पडून संपुष्टात आली आहे. अनेक खेळाडूंचे करिअर संपुष्टात आल्याची उदाहरणे डोळ्यापुढे असतानाही क्रिकेटमधील खेळाडू आर्थिक भ्रष्टाचाराला बळी पडत असल्याची बाब वारंवार पुढे येते. क्रिकेटच्या भवितव्यासाठी हे चांगले संकेत नसून आर्थिक भ्रष्टाचारापुढे खेळाडू ‘क्लीन बोल्ड’ का होतात, याचा विचार होणे गरजेचे आहे.



‘हीच ती वेळ’



सट्टेबाजांनी संपर्क केल्याची माहिती दडवून ठेवल्याने बांगलादेशचा माजी कर्णधार शाकिब
-अल-हसनवर आयसीसीने दोन वर्षांची बंदी घातली आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे क्रिकेटविश्व पुन्हा एकदा हादरून गेले. ‘मॅच फिक्सिंग’ आणि ‘स्पॉट फिक्सिंग’साठी सट्टेबाजांकडून आर्थिक भ्रष्टाचार केला जातो. यामध्ये खेळाडू आर्थिक आमिषाला बळी पडतात आणि त्यांच्या संपूर्ण क्रिकेट करिअरलाच पूर्णविराम मिळतो. सट्टेबाजांच्या या कृतीला लगाम घालण्यासाठी आणि खेळाडूंना या प्रकरणांपासून दूर ठेवण्याच्या उद्देशानेच नियमांमध्ये बदल केले होते. मात्र, या नियमांनतरही असे प्रकार थांबत नसल्याचेच पुन्हा एकदा सिद्ध होत असून आता आणखीन कठोर नियम बनवण्याची ‘हीच ती वेळ’ असल्याचे क्रिकेट जाणकारांचे म्हणणे आहे. १९९५ साली सर्वात आधी ऑस्ट्रेलियन खेळाडू शेन वॉर्न आणि मार्क वॉ या दोन खेळाडूंनी खेळपट्टी आणि हवामानाच्या स्थितीबाबतची माहिती सार्वजनिक केली. सट्टेबाजांनी याचा फायदा घेतल्याचे त्यावेळी उघडकीस आले. हा प्रकार दोन्ही खेळाडूंनी हेतुपुरस्सर केला नसल्याचे सिद्ध झाल्यानंतर दोघांकडूनही आर्थिक भुर्दंड वसूल केला.


मात्र, आयसीसीने खेळाडूंवर बंदी घातली नाही. २००० साली ऑस्ट्रेलियाच्याच खेळाडूंनी पाकिस्तानचा तत्कालीन कर्णधार सलीम मलिकवर लाच देण्याचे आरोप केले. मैदानावर चांगले प्रदर्शन न करण्याच्या बदल्यात मलिकने पैसे देऊ केल्याचे आरोप ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी केल्यानंतर मलिकवर आयसीसीने आजीवन बंदी घातली. आर्थिक भुर्दंडाऐवजी बंदीचा निर्णय घेण्याची आयसीसीची ती पहिली वेळ. मात्र, या प्रकारानंतरही खेळाडूंनी धडा घेतला नाही. २००० सालीच भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन, अजय जडेजा, दक्षिण आफ्रिकेचा तत्कालीन कर्णधार हँसी क्रोनी यांसारख्या खेळाडूंची नावे ‘मॅच फिक्सिंग’ प्रकरणात समोर आली आणि क्रिकेट विश्वात खळबळ उडाली. या सर्वांवर आयसीसीने बंदी तर घातलीच. मात्र, अनेक खेळाडूंचे करिअर संपुष्टात आले. २०१० साली पाकिस्तानच्या मोहम्मद आमिर, सलमान बट यांसारख्या खेळाडूंवरही फिक्सिंगच्या आरोपांमुळे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, बंदी घातल्यानंतरही हे प्रकार अद्याप थांबलेले नसून यांपेक्षाही कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे.


- रामचंद्र नाईक
@@AUTHORINFO_V1@@