कोलंबस दिवस? छे :! स्थानिक लोक दिवस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |





अमेरिकन सरकारने असं ठरवलं की
, ऑक्टोबर महिन्याचा दुसरा सोमवार हा ‘कोलंबस दिवस’ म्हणून साजरा करायचा, मग तारीख काहीही असो. त्यानुसार यंदा २०१९ मध्ये ही तारीख १३ ऑक्टोबर आली.



दरवर्षी गणपती
, नवरात्र, दिवाळी या काळात केव्हातरी असं घडतंच की, सलग तीन-चार दिवस सुट्टी येते. ती लगेच वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरती बातमी ठरते. अशा सुट्ट्या या ‘सार्वजनिक सुट्ट्या’ म्हणजे ‘पब्लिक हॉलिडेअसल्या तरी पेपरवाले किंवा सर्वसामान्य जनतासुद्धा त्यांचा उल्लेेख ‘बँक हॉलिडे’ असाच आर्वजून करते. सलग तीन-चार दिवस बँक बंद राहणार म्हटल्यावर लोकांच्या पोटात दुखतं. ‘साली मजा आहे या बँकवाल्यांची’ अशी सर्वसाधारणपणे लोकभावना असते. मध्यमवर्गीय नोकरदार समाजात एकेकाळी ‘चार आकडी’ पगार असणं याची फार मोठी अपूर्वाई होती. तो चार आकडी पगार सर्वप्रथम बँक कर्मचार्‍यांना मिळू लागला. त्यामुळे होतकरू मुलग्यांच्या आया ‘आमचा मुलगा चार आकडी पगार घेतो,’ असं नाक वर करून सांगत असत. लग्नाच्या बाजारात अशा मुलग्यांचा भाव सगळ्यात भारी होता.



पण
, आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, नगरपालिका, शिक्षक, प्राध्यापक आदी सगळी नोकरदार मंडळी बँकवाल्यांच्या मागे टाकून कुठच्या कुठे पुढे निघून गेली आहेत. खाजगी नोकर्‍यांचे तर बोलायलाच नको. ही सगळी मंडळी ‘नवश्रीमंत’ या वर्गात टाकावं इतके पगार घेऊ लागली आहेत आणि तरीही बँकेला सलग तीन-चार दिवस सुट्टी म्हटल्यावर ‘साली मजा आहे बँकवाल्यांची’ ही त्यांची भावना काही बदलत नाही. स्वातंत्र्योत्तर काळातील गेल्या ७० वर्षांतील समाजातल्या नोकरदार वर्गाचं बदलतं जीवनमान, बदलणारे म्हणजे वाढणारे पगार आणि त्यानुसार बदलणार्‍या दैनंदिन गरजा, राहणीमान, संकल्पना हासुद्धा एक अभ्यासाचा विषय होऊ शकतो. त्यात काम न करता मिळणारा पगार म्हणजेच ‘भरपगारी सुट्टी’ हा किती जिव्हाळ्याचा आनंदाचा विषय असतो, हे आपणच स्वत:शी विचार करून पाहा. अमेरिकन नोकरदार क्षेत्रात पहिल्यापासूनच वेगळी स्थिती आहे. नोकरी खाजगी असो वा सरकारी, सोमवार ते शुक्रवार पाच दिवस खच्चून काम असतं. शनिवार आणि रविवार मात्र पूर्ण मोकळे असतात. सलग पाच दिवस चोपून काम केल्यावर ‘वीकएन्ड’ सुट्टीची शारीरिक, मानसिक गरजही असते. सार्वजनिक सुट्ट्या म्हणजेच सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्या या संपूर्ण वर्षभरात फक्त दहा असतात. त्यापैकी एखादी सुट्टी शुक्रवारी किंवा सोमवारी आली, तरच सलग तीन दिवस सुट्टी मिळते. साहजिकच अमेरिकन लोक अशा ‘लाँग वीकएन्ड’ची अगदी वाट बघत असतात.



परवा १३ ऑक्टोबर
, २०१९ ला त्यांना असा ‘लाँग वीकएन्ड’ मिळाला. कारण, तो दिवस सोमवार होता. १२ ऑक्टोबर, १४९२ या दिवशी कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला म्हणून तो दिवस अमेरिकेत ‘कोलंबस दिवस’ या नावाने सार्वजनिक सुट्टीचा दिवस असतो. पुढे याबाबत अनेक ‘भानगडी’ निर्माण झाल्या. १४९२ साली संपूर्ण ख्रिश्चन जग हे जॉर्जियन कॅलेंडरप्रमाणे चालत होतं. त्यानुसार तो १२ ऑक्टोबर होता. पण, पुढे ग्रेगरी या पोपने कालगणनेत सुधारणा करून ‘ग्रेगरियन कॅलेंडर’ रुढ केलं. त्यानुसार तो दिवस २१ ऑक्टोबर, १४९२ असा असायला हवा इत्यादी. यावर उपाय म्हणून अमेरिकन सरकारने असं ठरवलं की, ऑक्टोबर महिन्याचा दुसरा सोमवार हा ‘कोलंबस दिवस’ म्हणून साजरा करायचा, मग तारीख काहीही असो. त्यानुसार यंदा २०१९ मध्ये ही तारीख १३ ऑक्टोबर आली.



पण
, यंदा आणखीन काही गंमती झाल्या. ६ ऑक्टोबर, २०१९ रोजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक खास पत्रक काढून जाहीर केलं की, सोमवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी अमेरिकन केंद्र सरकार ‘कोलंबस दिवस’ म्हणूनच सुट्टी देत आहे. नंतर १६ ऑक्टोबर, २०१९ या दिवशी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले, “इतर कुणाला काय म्हणायचं असेल ते असो, पण माझ्या मते तो ‘कोलंबस दिवस’च आहे.” ट्रम्प यांच्या या वक्तव्यावरून अर्थातच वादंग उसळला. अनेकांनी नाराजी व्यक्त केली. म्हणजे काय? अमेरिकन सरकारने गेल्या कित्येक वर्षांपासून जर ऑक्टोबरचा दुसरा सोमवार हा अधिकृत ‘कोलंबस दिवस’ ठरवलेलाच आहे, तर ट्रम्पना मुद्दाम पुन्हा पत्रक काढण्याचं काय कारण? आणि इटालियन राष्ट्रध्यक्षांना पुन्हा ते सांगण्याचं काय कारण?



दर्यावर्दी कोलंबस याने असा सिद्धांत मांडला की
, पृथ्वी गोल असल्यामुळे भारतात जाण्यासाठी (युरोपातून) आपण सतत पश्चिमेकडेच जात राहिलो, तर केव्हा ना केव्हा भारतात पोहोचू. १४९२ साली तो हे वेडं धाडस करायला निघाला आणि अटलांटिक महासागर पार करून अमेरिका खंडात पोहोचला. त्या भूमीला तो भारतच समजला. प्रत्यक्षात त्याने ‘अमेरिका’ हे तोवर अज्ञात असलेले एक नवीनच खंड शोधून काढले होते. अशा आशयाच्या कथा आपण शालेय इतिहासात, भूगोलात वाचलेल्या असतात. त्यापुढे आपल्याला त्या विषयाची जवळजवळ काहीही माहिती नसते. अमेरिका असं म्हटलं की, सुखासीन, विलासी जीवन, एवढीच आपली कल्पना असते. त्यापलीकडचं आपल्याला काहीही माहिती नसतं आणि माहिती व्हावं, अशी इच्छाही नसते. कारण, ज्ञानबिन हवंय कुणा लेकाला! असो, तर कोलंबस आणि त्याने लावलेला अमेरिकेचा कथित शोध, याला अमेरिकेत मोठ्या प्रमाणात विरोध आहे आणि विरोधकांची संख्या दरवर्षी वाढतेच आहे. अनेकांचं असं म्हणणं आहे की, सरकारने हा दिवस ‘कोलंबस डे’ म्हणून साजरा न करता ‘इंडिजिनस पीपल्स डे’ म्हणजे ‘स्थानिक लोक दिवस’ म्हणून साजरा करावा. अमेरिकेतल्या काही प्रांतांनी तर केंद्राला धाब्यावर बसवून तो तसा साजरा करण्यास सुरुवातही केली आहे. ट्रम्प यांच्या वक्तव्यामागे, पत्रकामागे ही सगळी पार्श्वभूमी आहे.



ख्रिस्तोफर कोलंबस हा मूळचा इटालियन
. पुढे तो पोर्तुगालमध्ये आणि मग स्पेनमध्ये स्थायिक झाला. तत्कालीन युरोपचा भारताशी आणि एकंदर पूर्वेकडल्या देशांशी चालणारा व्यापार हा भूमध्य समुद्र ते तांबडा समुद्र किंवा इराणी आखात यामार्फत चालायचा. या दोन सागरी मार्गांचा मधला भाग अरबस्तानचा आहे. म्हणजे नेमकं काय, हे समजून घेण्यासाठी जगाचा एक चांगलासा नकाशा पाहा. पंधराव्या शतकात हा अरबस्तानचा भाग तुर्कांनी जिंकला. ते युरोपीय व्यापार्‍यांना आपल्या मुलखातून जाऊ देईनात. यातून पूर्वेकडे जाणारा नवा मार्ग शोधण्याची खटपट सुरू झाली. सतत पश्चिमेकडे गेलं की, केव्हातरी पूर्व येईलच, अशा तर्काने कोलंबस निघाला आणि त्याला अमेरिका सापडली. प्रत्यक्षात त्याला, आज आपण ज्याला ‘वेस्ट इंडिज’ किंवा ‘कॅरेबियन बेट’ म्हणतो, त्यातल्या ‘बहामा बेटा’चा किनारा मिळाला होता. पण, यामुळे युरोपीय दर्यावर्दींना एक नवीनच भूमी सापडली. या भूमीत स्पॅनिश दर्यावर्दींनी हैदोस घातला. आज आपण ज्याला ‘दक्षिण अमेरिका खंड’ म्हणतो, ते संपूर्ण खंड त्यांनी पूर्णपणे बाटवून ‘कॅथलिक’ बनवलं. ‘उत्तर अमेरिका खंड’ म्हणजे आजचे ‘युनायटेड स्टेट्स’ आणि ‘कॅनडा’ या देशांमध्ये इंग्रज आणि फ्रेंच यांनी हेच केलं. मात्र, इथे भूप्रदेश फारच अफाट होता आणि त्यामानाने स्थानिक टोळीवाले रक्तवर्णी लोक संख्येने कमी होते. पण, तरीही त्यांच्या कत्तलीच करण्यात आल्या. उरलेल्यांची धर्मांतरे करण्यात आली.



आज दक्षिण अमेरिकतले सगळे देश
‘कॅथलिक’ आहेत. उत्तरेत कॅनडामध्ये ‘कॅथलिक’ आणि ‘प्रोटेस्टंट’ दोघेही आहेत, तर युनायटेड स्टेट्समध्ये ‘प्रोटेस्टंट’ लोकांचं वर्चस्व आहे. पण, तरीही या लोकांना कोलंबस आवडत नाही. त्यांचं म्हणणं असं की, कोलंबसने अमेरिका शोधली हे विधान चूक आहे. ज्या खंडप्राय भूमीवर लक्षावधी लोक भले ते रानटी मागास का असेनात, पण शतकानुशतकं राहत होते, त्या भूमीचा शोध कसला लावायचा? दुसरं म्हणजे कोलंबसने त्याचं स्वागत करणार्‍या स्थानिक लोकांवर जुलूमच केला. काहींना ठार मारलं, लुटालूट केली आणि कित्येकांना तो गुलाम करून परत घेऊन गेला. ही सगळी घृणास्पद युरोपीय, साम्राज्यवादी मानसिकता आहे. आम्हाला ती मान्य नाही. ज्या कोलंबसने स्वागतशील स्थानिक लोकांच्या सौजन्याला अन्यायाने उत्तर दिलं, त्याच्या नावाने कसले दिवस साजरे करता? त्याऐवजी त्या अन्यायग्रस्त स्थानिकांच्या स्मरणार्थ ‘स्थानिक लोक दिवस’ साजरा करा. आपल्याकडे काही ‘आचरट इंटेलेक्चुअल’ (अरे, ही उगीच द्विरुक्ती झाली) लोक आहेत. ते अजूनही मुंबईला ‘बॉम्बे’ म्हणतात. त्यांच्या मते, २१ मे हा दिवस ‘बॉम्बे’चा वाढदिवस म्हणून साजरा करावा. का? तर म्हणे, २१ मे, १६६२ या दिवशी पोर्तुगीजांनी ‘बॉम्बे’ इंग्रज राजाला आंदण म्हणून दिली. या अकलेच्या कांद्यांना अमेरिकन समाजातील वरील भावना कुणीतरी सांगायला हवी.

@@AUTHORINFO_V1@@