पुण्याचे भूषण अपंग कल्याणकारी शिक्षणसंस्था व संशोधन केंद्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2018
Total Views |

 

 

 
डॉ. रघुनाथ गोविंद काकडे यांनी ‘अपंग कल्याणकारी शिक्षणसंस्था व संशोधन केंद्र’ या नावाने संस्थेची सुरुवात भालेराव यांच्या कोथरूड येथील बंगल्यात जहांगीर हॉस्पिटलने दानरूपाने दिलेल्या फक्त दोन बेडपासून केली
 

दोन हात, दोन पाय आणि शरीराने धडधाकट असणारी अनेक माणसं मी दारू पिऊन रस्त्याच्या कडेला लोळताना पाहिली आहेत. थोड्या थोड्या संसारातल्या तणावातून मनाने अपंग असलेली अनेक माणसं मी आत्महत्या करताना, नाहीतर विक्षिप्त वागताना पाहिली आहेत. पण आज ज्या संस्थेला भेट देण्याचा प्रसंग आला, तिथे कुणी पायाने तर कुणी हाताने, अनेकजण पोलिओ झालेले, ज्यांना आपण अपंग म्हणतो, असे धडधाकट विद्यार्थी मला भेटले, धडधाकट यासाठी म्हटले, कारण ते सगळेच जण मनाने शरीरावर मात करून इतक्या भक्कम आत्मविश्वासाने उभे होते की, थोडावेळ माझ्या पूर्णत्वाचीच मला लाज वाटली, ते इतके उत्साही आणि निरागस होते की, पाहाणार्‍याला अचंबा वाटावा. विशेष म्हणजे सर्वचजण एकमेकांना मदत करताना दिसले आणि ते नेहमी एकमेकांना मदत करत असतात. तशी इथली शिकवणच आहे, असे मला निलेशने सांगितले. निलेश अनेक वर्षांपासून तिथे काम करतो. तो स्वत:देखील अपंग आहे, पण अतिशय कौतुकाने आणि उत्साहाने तो मला संस्था फिरून दाखवत होता आणि बरोबर माहितीही सांगत होता. माझे मित्र अ‍ॅड. किशोर बालिगर यांनी मला संस्थेविषयी आधी बरेच सांगितलेले होते. त्यामुळे संस्थेला भेट देण्याची माझी खूप दिवसांची इच्छा होती आणि तेवढीच उत्सुकतादेखील. त्यांनीच संस्थेचे अकाऊंटचे काम पाहणारे मि. मनोहर शेवते यांच्याशी माझा परिचय करून दिला. मनोहर शेवतेंनी संस्थेच्या कार्याचा आणि वाटचालीचा सुंदर असा पट माझ्यासमोर उभा केला. ‘इवलेसे रोप लावियेले दारी, तयाचा वेलु गेला गगनावरी’, या माऊलीच्या अभंगाच्या ओळीप्रमाणे संस्थेचा वटवृक्ष बहरत गेला.

 

प्रदीपदादा रावत हे संस्थेचे अध्यक्ष आहेत तर अ‍ॅड. मुरलीधर कचरे हे मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन आहेत. मुख्याध्यापक, शिक्षक, केअरटेकर आणि ऑफिस स्टाफ असे एकूण 60 कर्मचारी संस्थेत काम करतात. संस्थेची वाटचाल

 

ज्येष्ठ समाजसेवक

 अपंग मुला-मुलींना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी जीवन जगता यावे, यासाठी त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा वसा या संस्थेने घेतला आणि १९५६ पासून आजतागायत ही संस्था हा सेवायज्ञ करत आहे.

मुंबई इलाख्याचे त्यावेळचे मुख्यमंत्री कै. मोरारजीभाई देसाई यांनी दिलेल्या देणगीतून या संस्थेची स्थापना झाली, ती अवघ्या ६ मुलांपासून आणि आज या संस्थेची पुण्यातील वानवडी येथे साडेतीन एकर जागेत भव्य वास्तू उभी राहिली आहे, जेथे २५० अपंग मुले राहू व शिकू शकतील. सध्या येथील मुला-मुलींची संख्या १८० एवढी आहे. भारताच्या कानाकोपर्‍यातून पालक आपल्या मुलांना आत्मनिर्भर बनविण्याच्या आत्मविश्वासातून येथे घेऊन येतात. संस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या निवासाकरिता प्रशस्त व सुसज्ज अशी मुलांची व मुलींची वेगवेगळी वसतिगृहे आहेत. प्रत्येक विभागात १२५ विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे, तसेच भोजनाकरिता स्वतंत्र भोजनगृह आणि स्वयंपाकघरही आहे. शारीरिक अपंगत्वावर मात करण्याबरोबरच येथील मुलांना त्यांच्या मानसिकतेबरोबरदेखील संघर्ष करावा लागतो आणि ही संघर्ष करण्याची ताकद येथील कर्मचारी सातत्याने या मुलांना पुरवत असतात. त्यांना सतत उत्साही ठेवण्यासाठी इथला प्रत्येक माणूस झटत असतो. ही मुले शरीराने अपंग असली तरी मनाने ती खूप परिपूर्ण असल्याचे मला जाणवले. स्वत: अपंग असूनदेखील आपल्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या इतर मुलांची मदत करत असतानाचे येथील चित्र आपल्याला कायमच दिसेल. दि. ८ जून २००६ रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती आणि मुलांचे लाडके राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांनीदेखील या संस्थेस भेट देऊन इथल्या मुलांशी संवाद साधला आणि संस्थेच्या कामाचे तोंड भरून कौतुक केले. संस्थेचे शैक्षणिक उपक्रम अपंग मुलांना त्यांच्या अपंगत्वाची न्यूनता वाटू नये, आपणही इतर मुलांप्रमाणे सर्वसामान्य आहोत, ही भावना त्यांच्यात विकसित व्हावी, भविष्यात त्यांना आपल्या पायावर उभे राहता यावे यासाठी संस्था विविध उपक्रम राबवते. संस्थेतील विद्यार्थ्यांना १ ली ते ७ वीपर्यंतचे शिक्षण संस्थेतच दिले जाते. त्यानंतर ८ वी ते १० वी पर्यंत त्यांना जवळच्याच ह. ब. गिरमे विद्यालयात मोफत प्रवेश मिळवून दिला जातो. त्याबरोबरच हे विद्यार्थी समर्थ, स्वावलंबी व्हावेत आणि जबाबदार नागरिकही व्हावेत म्हणून त्यांना विविध कौशल्य विकास प्रशिक्षणही दिले जाते. त्यामध्ये संगणक, इलेक्ट्रिशियन, वायरमन, स्क्रिन प्रिंटिंग, फोटो लॅमिनेशन, शिवणकला, सुतारकला, कृत्रिम अवयवनिर्मिती व दुरुस्ती यांचा समावेश होतो. याबरोबरच खडू, अगरबत्त्या, मेणबत्त्या, साबण पावडर, फिनेल, सुगंधी अत्तर, कृत्रिम फुलांचे बुके, सिरॅमिकचे नक्षीकाम अशा

 

हस्तकलेचेही प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री संस्थेच्याच प्रदर्शन विक्री केंद्रातून केली जाते. शारीरिक पुनर्वसन व आरोग्य सुविधा संस्थेमार्फत पोलिओपीडित विद्यार्थ्यांची मोफत अपंगत्व निमूर्र्लनाची शस्त्रक्रिया करण्यात येते. या शस्त्रक्रियेच्या आधी व नंतर आवश्यक असणारे व्यायाम देण्याकरिता संस्थेमध्ये अद्ययावत भौतिकोपचार व व्यवसायोपचार कक्ष असून विविध तज्ज्ञांकडून या विद्यार्थ्यांवर उपचार केले जातात. हे उपचार विद्यार्थ्यांच्या शारीरिक पुनर्वसनासाठी फार उपयुक्त ठरतात. येथील विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे कृत्रिम अवयवसुद्धा याच संस्थेत तयार केले जातात. याशिवाय विद्यार्थ्यांच्या नैमित्तिक आजारावर उपचार करण्यासाठीदेखील येथे विशेष चिकित्सालय उपलब्ध आहे.

 

एक पाऊल पुढे

यावर्षी संस्थेमार्फत राबविल्या जात असलेल्या विविध उपक्रमांव्यतिरिक्त ‘सक्षम’ या सेवाभावी संस्थेबरोबर संयुक्त विद्यमाने एक पाऊल पुढे टाकत २६ जानेवारी २०१८ रोजी दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला गेला व दहा दिव्यांग जोड्यांचा विवाह संस्थेमार्फत लावून देण्यात आला. दिव्यांगांमध्ये नवी उमेद निर्माण करण्याचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम होता. अशा उपक्रमांची नांदीच त्या निमित्ताने संस्थेत सुरू झाल्याची भावना यावेळी जर निर्माण झाली असेल तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. संस्थेच्या या उपक्रमाचे समाजाच्या सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले.

 
 

यशोगाथा

अपंग कल्याणकारी शिक्षणसंस्था व संशोधन केंद्राच्या माध्यमातून अनेक अपंग मुलांना जीवनाची दिशा मिळाली. आपण सर्वसामान्य आहोत, असं इथल्या प्रत्येक अपंग विद्यार्थ्याला वाटलं पाहिजे, त्याच्यात आत्माभिमान जागा झाला पाहिजे, हे संस्थेचं ब्रीदवाक्य आहे. त्या जाणिवेतूनच आजपर्यंत संस्थेची वाटचाल योग्य दिशेने चालू असल्याचे दिसून येते, कारण संस्थेतील अनेक विद्यार्थी संस्थेच्या माध्यमातून घडले गेले आहेत. मग तो अमोल देशमुख असेल, जो सी. ए. होऊन एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये जॉब करत आहे किंवा मग तो दत्ता खेडेकर असेल, जो सिव्हिल इंजिनीयर आहे अथवा स्टेट बँकेत नोकरी करणारी अनुराधा सोनी असेल वा ट्रॅव्हल एजन्सीचा स्वत:चा व्यवसाय करणारी माया पारखी असेल, अशा अनेक सक्सेस स्टोरीज संस्थेत काळाबरोबर तयार होत आहेत. वास्तविक सामाजिक बांधिलकीची जाणीव एक नागरिक म्हणून आपणा सर्वांनाच असायला हवी आणि समाजातील कोणत्याही पीडित व्यक्तीचे पुनर्वसन हा सामाजिक जबाबदारीचा एक भाग आहे व या समाजाचाच एक घटक म्हणून या सामाजिक जबाबदारीत आपलादेखील खारीचा वाटा असायला हवा, असं प्रत्येक नागरिकाला जेव्हा वाटायला लागेल तेव्हा आपण खर्‍या अर्थाने प्रगत म्हणून मिरवू शकू, एवढेच मला सांगायचे आहे. अपंग कल्याणकारी शिक्षणसंस्था व संशोधन केंद्राला या कार्यात अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्याच्या या कार्यात आपणही देणगीरूपाने आपला सहभाग नोंदवू शकता. समाजातील आपल्या अपंग बंधूंचे पुनर्वसन करणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे, ही भावना मनात बाळगून,’उध्दरेदात्मनात्मानम,’ अर्थात ’तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार,’ ही उक्ती सार्थ करण्यासाठी संस्थेच्या www.swph या वेबसाईटला अवश्य भेट द्या!

 

-काशीनाथ पवार

@@AUTHORINFO_V1@@