मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार जेव्हा सत्तेत आले तेव्हा स्वतः नरेंद्र मोदी व भाजपशी सलगी करण्याची एकही संधी न सोडणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार सध्या भाजपला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. सोमवारी ‘शेतकर्यांनी टोकाची भूमिका घ्यावी’ असे चिथावणीखोर वक्तव्य केल्यानंतर आता पवारांनी राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधकांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. इतकेच नव्हे तर भाजपविरोधकांना एकत्र आणायला आपल्याला आवडेल, असे जाहीर वक्तव्य करत आपण पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षरित्या सुचवले आहे.
शरद पवार म्हणाले की, राष्ट्रीय स्तरावर भाजपाविरोधात विरोधकांना एकत्र आणण्यास आपल्याला आवडेल. देशभरात नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या १० जागांसाठीच्या पोटनिवडणुकांत भाजपला ९ जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले होते. याच मुद्द्यावर बोलताना पवार यांनी एक पाऊल पुढे जात आपली भूमिका स्पष्ट केली. सध्याच्या परिस्थितीचे वर्णन करताना पवार यांनी थेट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारचा दाखला दिला. ते म्हणाले की, १९७७ मध्ये एका पक्षाचा पडता काळ सुरु झाला होता, त्यामुळे त्यांचे सरकारही कोसळले होते. त्याचप्रमाणे आताही सर्व विरोधक एकत्र आले तर, यासारखीच स्थिती निर्माण होऊ शकते, असा दावा त्यांनी केला.
गेल्या काही दिवसांपासून सर्वच भाजपविरोधी पक्ष एका व्यासपीठावर येण्याची तयारी करत आहेत. कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या शपथविधी समारंभाच्या वेळेसही याचाच प्रत्यय आला. मात्र, या भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व कोण करणार, याबाबत या सर्वच पक्षांत सुप्त स्पर्धा असल्याचेही दिसून येत आहे. काँग्रेस या आघाडीचे नेतृत्व करण्यास इच्छुक आहे, मात्र अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला इतर पक्षांच्या वरिष्ठ, ज्येष्ठ नेत्यांकडून मान्यता मिळताना दिसत नाही. त्यामुळेच सोनिया गांधी या प्रकृती अस्वास्थ्यानंतरही सक्रीय झालेल्या दिसत आहेत. राहुल गांधी यांच्या नावा ला शरद पवारांची नापसंती जगजाहीर आहे. मात्र, फेब्रुवारी महिन्यांत शरद पवार यांनी राहुल गांधी यांची प्रशंसा करताना काँग्रेससाठी अच्छे दिन येणार असल्याचे सुचवले होते. कुमारस्वामी यांच्या शपथविधीलाही त्यांनी उपस्थिती लावली होती. आता पुन्हा यु-टर्न घेत पवार यांनी हे ताजे वक्तव्य करत ‘हम भी है रेसमें’ असाच अप्रत्यक्ष संदेश काँग्रेस नेतृत्वाला दिला आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजप वा काँग्रेसपैकी कुणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्यास ‘भाजपविरोधी’ आघाडीच्या नावाखाली अनेक छोट्यामोठ्या पक्षांचे कडबोळे करून माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्याप्रमाणेच देशाचे नेतृत्व करता येईल का, याचीच चाचपणी शरद पवार सध्या करत असल्याचे मानले जात आहे.