संघाचा प्रकल्प

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Oct-2018   
Total Views |
 
 
 
 
'सर, मी आर.एस.एस.चा कार्यकर्ता आहे. आपला एक कार्यकर्ता आलाय रक्तपेढीत. त्याला जरा फ़्री सर्विस देता आली तर बघा.’ भल्या सकाळी मला आलेल्या फ़ोनवर उच्चारले गेलेले हे पहिलेच वाक्य होते. 
 
'रुग्ण कोण आहे ?’ इकडून माझा प्रश्न गेला.
 
'त्याच कार्यकर्त्याचा सख्खा भाऊ आहे.’ फ़ोनधारकाचे उत्तर.
 
'बरं. पण हे पहा. आर.एस.एस.चा कार्यकर्ता असणे हा काही मोफ़त सेवा किंवा सवलत देण्याचा निकष नाही. मी स्वत:देखील संघाचाच कार्यकर्ता आहे. (हे सांगणं अत्यावश्यक होतं.) या रुग्णाला नक्की काय झालंय आणि त्याची आर्थिक स्थिती काय आहे, हे जर मला समजलं तर त्याला योग्य ती सवलत नक्कीच देता येईल’, मी शक्य तितक्या स्पष्टपणे सवलतीबाबतचे धोरण समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
 
'अहो पण ही रक्तपेढी तर आर.एस.एस.चीच आहे ना ? मग कार्यकर्त्यांना काहीच सवलत नाही का ?’ त्याने पुन्हा प्रश्न टाकला.
 
'सर्व गरजूंना सवलत मिळेल. त्यात कार्यकर्तेही असु शकतातच की.’ 
 
मी पुन्हा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. पण का कुणास ठाऊक, मी माझ्या परीने पुरेसे स्पष्टपणे सांगूनही या व्यक्तीच्या ते लक्षात नव्हते. अर्थात नंतर रक्तपेढीत आलेल्या या दुसऱ्या कार्यकर्त्याशीही मी बोललो आणि त्याचा आर्थिक स्तर व रुग्णाच्या रोगाचे निदान या दोन बाबी समजावून घेत त्याला योग्य ती सवलत मिळेल अशी व्यवस्थाही केली. पण तरीही या प्रसंगामुळे सुरु झालेली विचारशृंखला मात्र तुटली नाही.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे एक गतीमान संघटन आहे, ज्यात नित्य नवनवीन व्यक्तींची भर पडत असते. शिवाय संघाची काम करण्याची पद्धत ही प्रचलित संघटनांपेक्षा जरा वेगळी असल्याने अनेकांच्या ती नेमकेपणाने लक्षात येत नाही. नव्याने संघात आलेल्या व्यक्तींचेही गोंधळ ही कार्यपद्धती चटकन लक्षात न आल्यामुळे होतात. संघ हे समाजांतर्गत संघटन नसून समाजाचे संघटन आहे हा संघाचा मूळ विचार एका अर्थाने अव्दितीय आहे, पण त्याची दृश्य कल्पना करता येणे मात्र नक्कीच कठीण आहे. त्यामुळे समाजात पहायला मिळणाऱ्या अन्य संघटनांप्रमाणेच संघाकडे सहजपणे एक ’कम्युनिटी’ म्हणून पाहिलं जातं ; आणि मग अन्यत्र जे काही चालतं त्याच चौकटीमध्ये संघाला किंवा संघाच्या सेवाप्रकल्पांनाही बसवण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या कार्यकर्त्याने मला फ़ोन केला होता तो संघात नव्यानेच दाखल झालेला होता, हे मला कुणी सांगण्याची गरज पडली नाही. अर्थात त्याचे फ़ार काही चुकले होते, असेही नाही. कारण बाहेर अनेक संस्था, संघटनांमध्ये आपापल्या कार्यकर्त्यांची कामे (अनावश्यक असली तरी) कशी प्राधान्याने केली जातात, हे त्याने पाहिले असणार, अनुभवलेही असणार. त्यामुळे त्या आधारावर संघात किंवा संघाच्या सेवासंस्थांमध्येही असे व्हायला काय हरकत आहे, हा त्याचा तर्क त्याच्या दृष्टीने ठीकच म्हणायला हवा. 
 
मागे एकदा खूप वर्षांपूर्वी काही व्यावसायिक कामाच्या निमित्ताने एका स्थानिक सहकारी बॅंकेत जाणे झाले होते. ही बॅंक पुण्यातील एका बड्या राजकीय नेत्याव्दारेच चालविली जाते, त्यामुळे बॅंकेचे संचालक मंडळ नावापुरतेच. सर्व निर्णय घेणार ते हे माननीयच. माझा बराच वेळ या बॅंकेत गेल्याने तेथील काही कर्मचाऱ्यांशी चांगला परिचय झाला. बोलता बोलता एकजणाने सहज एक माहिती मला पुरवली. नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणूका होऊन गेल्या होत्या. या निवडणूकीसाठी या राजकीय नेत्याने भल्यामोठ्या रकमेचे कर्ज स्वत:च्याच बॅंकेतून उचलले आणि या कर्जाच्या हफ़्त्यापायी या बॅंकेच्या पुण्यातील सर्व शाखांतील सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारातून प्रत्येकी किमान एक-एक हजार रुपये कापायला सुरुवात केली. ’नोकरी टिकविण्यापायी’ सर्वांनी हे निमूटपणे सहन केले. मला हे सर्व ऐकून तेव्हा फ़ार आश्चर्य वाटले होते. एखादी संस्था स्थापण्यामागे असलेले उद्देश्य किती पराकोटीचे स्वार्थी असतात, हे मी डोळ्याने पहात होतो. स्थापना करताना लोकहित, लोककल्याण वगैरेच्या वल्गना करुन नंतर ’आपले राजकीय अथवा व्यावसायिक स्वार्थ साधण्यासाठी याच संस्था राखीव कुरणे होतात. ’आपला माणूस आहे, याचे काम करा’ असा आदेश आला की ’सदर कामासाठी हा माणूस अपात्र आहे’ हे बहुधा अध्याहृतच असते. दुर्दैवाने संस्था-संघटनांचे असेच चित्र आपल्या समाजामध्ये रुजलेले आहे. शिक्षणसंस्थेचा संचालक निवडणूकीला उभा आहे म्हणून सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उघडपणे आणि सक्तीने निवडणूक-प्रचाराचे काम लावण्यात काही फ़ार मोठी चूक आहे, असे इथे कुणालाच वाटत नाही. अशाच एका शिक्षणसंस्थेत शिकलेल्या एका मित्राने मला सांगितले की, संस्थेच्या प्रत्येक शाळा आणि कॉलेजात संस्थापकांचे नाव गुंफ़ून तयार केलेली एक प्रार्थना रोज म्हटली जाते. सुमारे दोनेक हजार मुले ही प्रार्थना रोज म्हणतात, नव्हे तो त्यांचा अनिवार्य परिपाठ आहे. जी संस्था उभी राहण्यात सर्व समाजाचा हातभार लागलेला असतो त्या संस्थेमध्ये असा एखाद्या व्यक्तीचा उदो-उदो करण्यामध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करणे, इतकाच हेतु असतो. 
 
कदाचित असे अनुभव घेऊनच एकदा एका ज्येष्ठ व्यक्तीने मला मोठा गमतीशीर प्रश्न विचारला होता. एका घरगुती कार्यक्रमांत ओळख झालेले हे गृहस्थ निवृत्तीनंतर काही समाजकार्य करु इच्छित होते. रक्तपेढीबद्दल माहिती कळाल्यावर ’मला इथे यायला आवडेल’ असेही त्यांनी बोलून दाखवले. पण नंतर मात्र ते म्हणाले, ’…फ़क्त माझी एक अट आहे.’ मी उत्सुकतेने ’कोणती’ असे विचारल्यावर ते म्हणाले, ’मी रक्तपेढीचे काम करीन मात्र तिथे जर तुम्ही मला ’भगव्या झेंड्याला प्रणाम करायला लावला’ किंवा ’हे हिंदुराष्ट्र आहे’ असे म्हणायला लावले, तर मात्र मी ते कदापि करणार नाही’, हे ऐकल्यावर मला हसावे की रडावे तेच कळेना. त्यानंतर तासभर मी त्यांना संघाच्या सेवाप्रकल्पात असे काही नसते, हे समजावून सांगत बसलो होतो. अर्थात हे गृहस्थ आणि वर उल्लेख केलेला फ़ोन करणारा कार्यकर्ता यांच्या संघाच्या प्रकल्पांविषयी झालेल्या धारणा त्यांना अन्यत्र आलेल्या अनुभवांवरुन बनलेल्या होत्या हे उघडच आहे.
 
परंतु जनकल्याण रक्तपेढीसारखा सेवाप्रकल्प असो वा संघाचे दैनंदिन काम असो, संघकार्यकर्त्यांच्या धारणा अत्यंत स्पष्ट असतात. जनकल्याण रक्तपेढी हा संघाचा प्रकल्प आहे याचा अर्थच हा समाजाचा प्रकल्प आहे. रक्तपेढीच्या लाभार्थ्यांमध्ये सर्व जाती, पंथ, धर्माचे लोक आहेत आणि या सर्वांना रक्तसेवा देण्याचे आणि सवलती देण्याचे निकष समान आहेत. कायदेशीर चौकटीत काम, गुणवत्तेचा आग्रह, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सेवा, महिलांचा सन्मान ही सर्व तर संघाच्या प्रकल्पाची लक्षणे आहेतच पण याखेरीज हा संघाचा प्रकल्प असण्याचा आणखी एक अर्थ म्हणजे, संघाच्या स्वयंसेवकांना ’स्वयंसेवक’ या नात्याने इथे विशेष सवलती नाहीत, सवलती आहेत त्या गरजूंना. एकदा एका ज्येष्ठ संघप्रचारकांस – त्यांनी संन्यस्त आयुष्य पत्करले आहे हे लक्षात घेऊन - इथून रक्तघटकांमध्ये पूर्ण सवलत दिली गेली. पण काही दिवसांतच जितक्या रकमेची सवलत दिली गेली होती तितक्याच रकमेचा धनादेश या प्रचारकाच्या नातलगांनी कुठचाही गाजावाजा न करता रक्तपेढीला देणगी म्हणून पाठवून दिला. आपल्या सेवाप्रकल्पाबद्दल संघस्वयंसेवकांच्या कल्पना अशा स्पष्ट असतात. 
 
विकसित व्हावे, अर्पित होऊन जावे !
 
असा स्वत:च्या जीवनाचा आदर्श घालुन दिलेल्या हजारो संघकार्यकर्त्यांनी या धारणा घडविल्या आहेत. ’हा संघाचा प्रकल्प आहे’ या वाक्यामागे ’मालकी’ नसून ’समर्पण’ आहे. आपल्या समाजातील सर्व घटकांमध्ये ही समर्पणवृत्ती आहेच. या समर्पणामुळेच समाज आणि संघ असे अव्दैत हळुहळु तयार होऊ लागते. संघाला अपेक्षित आहे ते हेच ! संघाचे प्रकल्प चालतात ते याच उद्देश्याने !!
महेंद्र वाघ
 
 
@@AUTHORINFO_V1@@