सांगे वडिलांची किर्ती तो येक मूर्ख

    21-May-2017   
Total Views |

आज २१ मे २०१७. आजच्याच दिवशी बरोबर २६ वर्षांपूर्वी देशाचे तत्कालीन पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची तामिळनाडूमधील श्रीपेरुंबुदूर इथं हत्या झाली. त्याआधी सातच वर्षांपूर्वी देशाच्या तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचीही दिल्लीत त्यांच्या राहत्या घरी निर्घृण हत्या करण्यात आली होती. देश त्यातून नुकताच सावरत असताना राजीव गांधी यांच्या हत्येनं सारा देश पुन्हा हळहळला. तोच हा दिवस.

राजीव यांना खरंतर राजकारणात काहीच रस नव्हता. वास्तविक आजोबा जवाहरलाल नेहरू, आई इंदिरा गांधी, सख्खा भाऊ संजय गांधी यांच्यासह त्यांचे संपूर्ण घराणे राजकारणात सक्रीय असूनही त्यांनी कधीच राजकारणात प्रवेश केला नाही. त्यांची रुची विमानांमध्ये होती. त्यानुसार त्यांनी इंग्लंड इथं आवश्यक शिक्षण घेतलं आणि ते इंडियन एअरलाईन्समध्ये वैमानिक म्हणून रुजूही झाले. १९६८ मध्ये त्यांचे सानिया मायनो या त्यांच्या प्रेयसीशी लग्न झाले. १९८० मध्ये त्यांचे बंधू संजय गांधी यांचा एका विमान अपघातात संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर मात्र त्यांना राजकारणात येणे भाग पडले. दुर्दैवाने चारच वर्षांत इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि पंतप्रधानपदाची धुरा राजीव यांच्या खांद्यावर येऊन पडली.

त्यांनंतर त्यांनी आपल्या नेतृत्वाने आणि आपल्या अंगी असलेल्या गुणांनी अनेक पथदर्शी, प्रगत निर्णय घेतले आणि देशात आपल्याविषयी एक विश्वास निर्माण केला. वयाच्या केवळ ४०व्या वर्षी जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचे नेतृत्व करणे हे तसे आव्हानात्मकच. पण तेही त्यांनी लीलया पेलले. विज्ञान तंत्रज्ञानाची जात्याच आवड असल्यामुळे त्यांनी त्याकडे विशेष लक्ष दिले आणि अल्पावधीतच अनेक धाडसी निर्णय घेत जागतिक स्पर्धेला तोंड देऊ शकेल असे तंत्रज्ञान देशात आणण्याची व्यवस्था केली. दुर्दैवाने १९९१ला आपल्या पुढच्या निवडणूकीला सामोरे जातानाच तमिळी अस्मितेच्या राजकारणामुळे तत्कालीन मद्रासजवळ श्रीपेरुंबुदूर इथे एका प्रचारसभेत त्यांची मानवी बॉम्बद्वारे हत्या करण्यात आली. सामान्यपणे भारतीय राजकारणात ज्या वयात लोक केंद्रीय राजकारणात जाण्यासाठी धडपडत असतात त्या वयात राजीव यांचा राजकारणाचा नव्हे जीवनाचा प्रवास संपला होता. आपल्या ७ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अफाट लोकप्रियता मिळवली. त्यांच्यावर काही भ्रष्टाचाराचे आरोपही झाले मात्र जनमत मात्र कायमच त्यांच्या बाजूने होते.

राजीव यांच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नी सोनिया गांधी यांनी राजकारणात यावे यासाठी अनेक काँग्रेसी नेत्यांनी त्यांना आग्रह केला. मात्र पतिवियोगात असल्यामुळे तसेच राजकारणाचा फारसा गंध नसल्यामुळे त्यांनी त्यावेळी नकार दिला. दरम्यान नरसिंह राव सरकारच्या काळात सिताराम केसरी पक्षाध्यक्ष असताना पक्षाची बरीच वाताहत झाली आणि पक्ष विखुरला गेला. अखेर काँग्रेस पक्षाला पुन्हा एकत्र बांधण्यासाठी सोनिया गांधींनी १९९७ मध्ये सक्रीय राजकारणात प्रवेश केला आणि पुढच्याच वर्षी पक्षाच्या नेत्या बनल्या. त्यानंतर झालेल्या निवडणूकांमध्ये भाजपप्रणित रालोआ सरकार अटलजींच्या नेतृत्वात सत्तेवर आले. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका निभावली. २००४ मध्ये झालेल्या निवडणूकांमध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळाले आणि सोनिया गांधींनी स्वतःच्या परदेशी मुळाच्या वादावर पडदा टाकण्यासाठी डॉ. मनमोहन सिंग यांना देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान केले.

साधारण याच काळात राजीव आणि सोनिया यांचे पुत्र राहूल यांचा राजकीय क्षितिजावर उदय झाला. राजीव गांधी यांची हत्या झाली तेव्हा राहूल यांचे वय जेमतेम २१ वर्षांचे होते. त्यानंतरही त्यांनी लगेच राजकारणात प्रवेश केला नाही. २००४ च्या निवडणूकांवेळी त्यांनी पहिल्यांदा अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवली व पूर्वपुण्याईमुळे निवडूनही आहे. त्यानंतर मनमोहनसिंग सरकारमध्ये त्यांनी वा त्यांच्या आई सोनिया गांधी यांनी कोणतेही मंत्रीपद घेतले नाही मात्र सत्तेची सगळी सूत्र स्वतःच्या हातात ठेवली. राहूल यांनी आधी विद्यार्थी काँग्रेसचे नेतृत्व केले आणि मग युवक काँग्रेसचे. मात्र स्वतःकडे एखाद्या मंत्रीपदाचा कार्यभार घेऊन यशस्वीपणे ते निभावून नेले असे केले नाही. राहूल त्यांच्या विचित्र वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत राहिले. स्वतःची प्रतिमा युवा नेता अशी करुन घेण्यात त्यांनी कायमच धन्यता मानली. त्यामुळेच बहुदा माध्यमे, विरोधी पक्ष आणि सामान्य जनता यांनी कधीच त्यांच्याकडून परिपक्व वागणूकीची अथवा वक्तव्याची अपेक्षाच केली नाही. इतकेच काय आजही राहूल यांना काँग्रेसमधील एक दुय्यम प्रतिभेचा नेता म्हणूनच ओळखले जाते. त्यांच्या नेतृत्वात लढलेल्या जवळपास प्रत्येक निवडणूकीत काँग्रेसला प्रचंड अपयश आले आहे. त्यातच व्यसनाधीनतेचेही अनेक आरोप त्यांच्यावर सातत्याने होत असतात.

राजीव गांधी यांच्या हत्येला आज २६ वर्षे पूर्ण होत आहे. त्यांची हत्या झाली त्यावेळी त्याचे वय होते ४६ वर्षे ९ महिने आणि १ दिवस (२० ऑगस्ट १९४४ ते २१ मे १९९१). आज राहूल गांधी स्वतःला देशाचा युवा नेता म्हणवून घेत आहेत मात्र त्यांचं वय आहे ४६ वर्षे ११ महिने आणि २ दिवस (१९ जून १९७० ते २१ मे २०१७). म्हणजेच पित्याचं निधन झालं त्यावेळी त्यांचे जे वय होते त्यापेक्षाही राहूल यांचे वय दोन महिन्यांनी अधिकच आहे. पित्याच्या कर्तृत्वाची तुलना पुत्राच्या कर्तृत्वाशी करणे तसे अन्यायकारक आहे हे मान्य, कारण त्या त्या काळच्या देश-काल-परिस्थितीत भिन्नता असते. मात्र तरीही वयानुसार येणारी एक किमान सरासरी परिपक्वताही राहूल यांच्यात दिसत नाही जी राजीव यांच्याकडे लहान वयापासूनच होती. स्वतःला युवा नेता म्हणून सगळ्या समस्या सुटणार नाहीत एवढे साधे भानही राहूल यांना नाही. २०१४च्या निवडणूकांमध्ये काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. सोनिया, मनमोहन, राहूल यांच्या त्रिकुटाला लोक कंटाळले आणि त्यांनी मतांचे पारडे नरेंद्र मोदींकडे झुकवले. त्यातच सोनिया यांच्या वयाने आता सत्तरी गाठली आहे. त्यांची तब्येतीची तक्रार वाढत चालली आहे. येणाऱ्या काळात त्या काँग्रेसचे नेतृत्व करू शकतील अथवा नाही यावर काँग्रेसच्याच वर्तुळातून शंका व्यक्त करण्यात येत आहे. कांग्रेसच्या सर्व राज्यातील नेत्यांना मान्य होईल असे एकही नाव सध्या काँग्रेसकडे नाही. एकूणच नेतृत्वाची वानवा असताना राहूल यांनी पक्ष नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यांवर घ्यायची ठरवली तरी ती किती लोकांना मान्य होईल याविषयीही आनंदच आहे. म्हणूनच की काय अनेक काँग्रेसजनांना प्रियांका यांनी सक्रीय राजकारणात उतरावे असे वाटते. मात्र त्यांनी कधीच ही मागणी मान्य केली नाही. अशा परिस्थितीत राहूल हा एकच पर्याय काँग्रेसपुढे उरतो.

राजीव यांची कारकीर्द वयाच्या ज्या टप्प्यावर संपली साधारण त्याच टप्प्यापासून राहूल यांना कदाचित आपली पक्षाध्यक्षपदाची सुरूवात करावी लागेल. आई - वडिलांनी जे यश मिळवलं ते मिळवायला मात्र राहूल यांना अजून बराच लांबचा पल्ला गाठावा लागणार आहे हे मात्र नक्की. आजवर गांधी - नेहरू कुटुंबाच्या पुण्याईवर अनेकांची कारकीर्द तरली. "मेरे पती और साँसने देश के लिए जान दे दी" असे म्हणून सोनिया यांनी वेळ मारून नेली. मात्र आता सध्याच्या या विकासाच्या मोदी लाटेत केवळ तेवढे पुरेसे होणार नाही. त्यासोबत कर्तृत्वही लागेल आणि नेमकी त्याचीच वानवा राहूल यांच्याकडे आहे. वाडवडिलांची महती सांगून आता भागणार नाही हे त्यांनी आता समजून घ्यायला हवे. 'सागे वडिलांची किर्ती तो येक मूर्ख |' असे समर्थांनी म्हणून ठेवले आहे ते बहुदा राहूल यांच्यासाठीच असावे. केवळ काँग्रेस पक्ष टिकवणे एवढे जरी राहूल त्यांच्या कार्यकाळात करू शकले तरी पुढे येणारे नेतृत्व त्याला नवसंजीवनी देऊ शकेल. मात्र ते ही जमले नाही तर भारत खरंच काँग्रेसमुक्त होईल यात शंका नाही.

 

- सदाशिव 

अग्रलेख
जरुर वाचा
मंदिर प्रवेशाबाबत जातीय भेदभाव थांबवा; मद्रास हायकोर्टाने स्थानिक प्रशासनावर दिली मोठी जबाबदारी

मंदिर प्रवेशाबाबत जातीय भेदभाव थांबवा; मद्रास हायकोर्टाने स्थानिक प्रशासनावर दिली मोठी जबाबदारी

कायद्याच्या राजवटीने शासित असलेल्या देशात जातीवर आधारित कोणताही भेदभाव मान्य नाही, असे गुरूवार दि.१७ जुलै रोजी मद्रास उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अय्यनार मंदिरात अनुसूचित जाती प्रवर्गाच्या (एससी) भाविकांना अडविल्या प्रकरणी उच्च न्यायालयाने अरियालूर जिल्हा पोलिस अधीक्षकांना आणि उदयारपलयम महसूल अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की, “पुथुकुडी येथील अय्यनार मंदिर प्रवेशासाठी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या भाविकांना आडवू नये आणि त्यांना उत्सवात सहभागाची संपूर्ण मुभा दिली जावी.”..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121