खोटं आणि पुराव्याशिवाय बोलणे आणि त्या खोटारडेपणातच आनंद मानणे, यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकाजुर्र्न खर्गे यांच्याशी कुणीही स्पर्धा करू शकेल का? नुकतेच खर्गे म्हणाले की, “मागासवर्गीय दलित आणि महिलांना मतदानाचा अधिकार देण्यास भाजप-संघ तयार नाही.” यावर काय म्हणावे? भाजपच्या सत्ता स्थापनेमध्ये महिला आणि मागासवर्गीय, तसेच दलित समाजाचे भरभरून योगदान आहे, हे जगजाहीर. त्यामुळेच भाजप सर्व समाज आणि महिला मतदारांचे शतप्रतिशत मतदान होण्यासाठी प्रयत्नशील आहे. पण, सततच्या अपयशामुळे खर्गे यांना हे सत्य कळतच नाही कदाचित. त्यांच्या समजण्याच्या क्षमतेने त्यांना ‘टाटा बाय बाय’ केले असावे.
असो. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून सर्व जाती-जमाती, धर्म, लिंगाच्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार दिला. त्यावेळी सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारने हिंदू महिलांना हक्क देणारे डॉ. बाबासाहेबांचे ‘हिंदू कोड बिल’ स्वीकारले नव्हते, हे विसरता येईल का? तेव्हा भाजप सत्तेत नव्हते. खरे तर रझाकारांनी खर्गे यांच्या आईला आणि बहिणीला जिवंत जाळले, हेसुद्धा ते विसरून गेल्याचे चित्र आहे. असे असल्यावर काँग्रेसचे पाप त्यांना कसे आठवेल? पुढे खर्गे निवडणूक आयोगाच्या विशेष सघन आणि सुधारणा पडताळणी (एसआयआर) बद्दल म्हणाले की, “ही प्रक्रिया राबवून ते (म्हणजे भाजप) देशातील गरिबांना संपवणार आहेत.” याचाच अर्थ काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष खर्गेंचा आणि त्याद्वारे काँग्रसेचा मतदारयादीच्या पुनर्परीक्षणाला विरोध आहे. मतदारयाद्यांचे परीक्षण केले, तर खरे मतदार किती आहेत? ते विस्थापित झालेत का? त्यातील काहीजणांचा मृत्यू झाला, असूनही त्यांची मतदारयादीत नावे आहेत का, हे कळणार आहे. हे खर्या लोकशाहीसाठी योग्यच आहे. मग असे सगळे असताना भाजपच्या सत्ताकाळात ‘एसआयआर’ प्रक्रिया होते, याला मल्लिकार्जुन खर्गेंचा विरोध का? खोटे बनावटी मतदार हे मतदानातून बाद होतील, याचे दुःख मल्लिकार्जुन खर्गेंना वाटते का? असे असेल, तर खर्गेंना जसे त्यांच्या समजण्याच्या शक्तीने ‘टाटा बाय बाय’ केेले, तसेच खर्गेंसह त्यांच्या समविचारी लोकांना आणि पक्षांना भारतीयांनी सर्वार्थाने ‘टाटा बाय बाय’ करायलाच हवे!
शुभ(?)मंगलम् सावधान!
त्याचे लग्न ठरले. होणार्या वधूला विवाहासाठी कल्याण येथून पोषाख घेतला. मात्र, वधूने तिच्या होणार्या पतीला सांगितले की, तिला तो लेहंगा आवडला नाही. मग तो होणारा पती लेहंगा घेऊन दुकानात गेला. दुकानदाराने सांगितले की, लेहंगा बदलून मिळेल. त्याच्या बदल्यात पैसे मिळणार नाही. यावर रागाने त्या तरुणाने मोठा चाकू बाहेर काढला आणि 32 हजारांचा लेहंगा टराटरा फाडला. तो म्हणत होता, या लेहंग्यासारखेच तुमच्या सगळ्यांना टराटरा फाडेन. प्रश्न त्याने 32 हजारांचा लेहंगा फाडण्याचा नाही, तर त्याच्या मनोवृत्तीचा आहे. जरा काही मनाविरुद्ध झाले की, जीव देण्याची प्रवृत्ती जशी वाढली आहे, तशीच मनाविरुद्ध काही झाले की, विध्वंस करण्याची घातकवृत्तीही वाढलेली दिसते.
दुर्दैव असे की, या असल्या वृत्तीला मुलामा दिला जातो की, तो किंवा ती हट्टी आहे. तिला किंवा त्याला जे पाहिजे ते पाहिजेच! त्याच्या मनाविरुद्ध काही झालेले तिला किंवा त्याला चालत नाही. आजूबाजूला पाहिले, तर अशी मानसिकता असलेल्या लोकांची संख्या वाढलेली दिसते. आधुनिकतेमुळे मानसिक अस्थिरता, दडपण आणि नैराश्य यांमुळे विध्वसंक मनोवृत्ती वाढत असावी, असे वाटते. मोबाईलवर सातत्याने हिंसक गेम खेळणारे लोक याचे उत्तम उदाहरण. मोबाईलवर साध्या कारची किंवा बाईकची स्पर्धा असलेला खेळ. पण, तो खेळ खेळणार्याला तो गेम जिंकण्यासाठी वाटेत येणार्या सगळ्या अडथळ्यांचा चेंदामेंदा करायचा असतो. खेळणारा कुणासाठीही थांबत नाही. सगळ्यांना मारून जिंकायचे आहे बस! मोबाईलच्या बहुतेक सगळ्याच गेममधून खेळणार्यांच्या मनात हे ठसवले जाते. याच परिक्षेपात काही चित्रपटांबद्दल आठवले. मागे ‘कबिर’, ‘अॅनिमल’ सिनेमा प्रदर्शित झाले होते. त्यातील नायक हिंसाचार करतात, याबद्दल कौतुकाने भरभरून बोलणारे लोक पाहिले. त्यातही मुलींचा भरणा जास्त होता. हिंसा करणार्या क्रूरपणे वर्चस्व गाजवत समोरच्या व्यक्तीला गुलाम समजणार्या व्यक्तिरेखांबद्दल प्रेम वाटावे? या परिक्षेपात होणार्या वधूचा लेहंगा फाडणार्या त्या तरुणाबद्दल काय म्हणावे? अनावर राग आणि हिंसक मनोवृत्ती असणार्या व्यक्तीशी विवाह होत असेल, तर त्याच्या वधूला किंवा वराला इतकेच म्हणू शकतो शुभ(?)मंगलम् सावधान!
9594969638