
दि. ९ ऑगस्टपासून पुण्यासह राज्यातील बहुतांश भागांत अतिवृष्टीने शेतातील पिके जमीनदोस्त केली. प्राप्त माहितीनुसार, आठ लाख हेटर्सवर राज्यात पावसाने पिकांची नासाडी केली, तर पावसाने २१ बळी घेतले आहेत. ही अतिवृष्टी १९ जिल्ह्यांतील १८७ तालुक्यांत झाली असून, ११ जिल्ह्यांत तर दहा हजार हेटर्सपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नांदेड, वाशीम, हिंगोली, सोलापूर, धाराशिव, सोलापूर, यवतमाळ, अकोला, परभणी, जळगाव आणि अमरावती जिल्ह्यात अधिक नुकसान झाले असल्याने येथे प्रशासकीय यंत्रणा सक्रिय झाली आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील हे कबूल करताना नुकसानीबद्दल योग्य ती कार्यवाही करण्याबाबत प्रशासन कामाला लागले असल्याचे सांगितले आहे. या पावसाने शेतीचे अतोनात नुकसान केले असले, तरी सामान्य नागरिकांचीदेखील फजिती केली. पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात पडलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या हजारो कुटुंबीयांचे स्थलांतर करावे लागले. पुण्यात ४०४ कुटुंबातील १ हजार, ४९८, तर पिंपरी-चिंचवड परिसरात ३४० कुटुंबातील १ हजार, १२७ कुटुंबांच्या स्थलांतराची वेळ आली. या पावसाने पायाभूत सुविधांची प्रगतीच्या मार्गावर असलेल्या कामावरदेखील पाणी फेरले. एकूणच काय यंदाचा पाऊस भविष्यातील पाणीटंचाई प्रश्नावर उत्तर देऊन जात असला, तरी जे नुकसान विद्यमान परिस्थितीत दिसत आहे, त्यावर प्रश्नदेखील निर्माण करीत आहे.
माणूस आणि पाऊस तसेच आपत्ती निवारण यंत्रणा आणि पाऊस यांच्यातील न संपणारे द्वंद्व आणि तयार होणार्या प्रश्नांची नवी उत्तरे शोधणे, हे मात्र यामुळे निरंतर प्रक्रियेचा भाग बनत चालले आहे. त्यामुळे यासाठी केवळ सरकार किंवा कामे करणार्या यंत्रणांनी नव्हे, तर यापुढे माणसानेदेखील सज्ज आणि सतर्क असले पाहिजे. देशभरात हवामानबदलामुळे जे काही दुष्परिणाम जाणवत आहेत, त्याचे गांभीर्य ओळखणे हीच काळाची गरज आहे, अन्यथा केवळ निसर्गावर अवलंबून असलेला बळीराजा भविष्यात या लहरीपणामुळे हतबल झाला, तर मानवजातीचे काही खरे नाही!
संस्कृतीला उमजून घ्या! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर आले असता,माध्यमांनी त्यांना गणेश मंडळांच्या वादावर छेडले. खरे तर तेव्हाच मुख्यमंत्र्यांनी माझा पुण्यातील कार्यकर्त्यांवर विश्वास असल्याचे सांगून हे छोटे मुद्दे आपसात सामंजस्याने सहज सोडतील, असा विश्वास असल्याचे सांगून या वादातील हवा काढली होती. तरीही काही माध्यमांतून मुद्दाम हा मुद्दा तापवत ठेवण्यात आला आणि काल खुद्द गणेश मंडळाचे कार्यकर्ते असलेल्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार हेमंत रासने यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत समन्वय साधून कोणताही वाद नसल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे या मुद्द्यातील हवा तर गेलीच, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो जाहीर विश्वास पुणेकरांवर व्यक्त केला, त्यालादेखील सार्थ ठरवून जो चुकीचा ‘नॅरेटिव्ह’ प्रस्थापित केला जात होता, त्यांचेदेखील दात घशात घातले. एका दगडात दोन पक्षी मारण्याची ही किमया अशा तर्हेने साध्य झाली असतानाच, पुणेकरांमुळे ‘राज्य महोत्सवा’चा दर्जा मिळालेला हा उत्सव पार पाडण्यासाठी सर्व गणेश मंडळांचे कार्यकर्ते-पदाधिकारी पोलीस, पालिका प्रशासन आणि खुद्द सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार हेदेखील या वैभवशाली उत्साहाला आणखी लोकाभिमुख आणि आपल्या हिंदू संस्कृतीशी अधिक घट्ट करण्यासाठी गेल्या महिनाभरापासून कार्यरत आहेत.
आता अवघा आठवडा बाप्पाच्या आगमनासाठी शिल्लक आहे. बाल मंडळी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्यात मग्न आहेत. कर्कश्श आवाजाचा गदारोळ करून अश्लील नाचगाणे करून विचका करणार्या काही मोजया लोकांनी या छोट्या मंडळींकडून बोध घेतला, तर सार्वजनिक गणेशोत्सवाची मजा घेणार्या आपल्या घरातील वृद्ध, तरुण मुली-महिला हे लहान बाळांना घेऊन निर्भयपणे सहभागी होऊ शकतील. ही जाणीव जरी ठेवली, तरी हा राज्य उत्सव पुण्यातून इतरांसाठी एक चांगला आदर्श ठेवेल, यात संदेह वाटत नाही. गोंधळ-धिंगाणा घालणारे जे काही अस्तित्व आहे, त्यांना बाप्पांनी सुबुद्धी द्यावी आणि त्यांना पाठबळ देणार्यांनादेखील भानावर आणावे, म्हणजे खरा उत्सव साजरा होईल.
अतुल तांदळीकर