माकडाच्या हाती कोलीत’ अशी एक म्हण आहे. अलीकडे काँग्रेसच्या हायकमांडपासून ते अगदी प्रदेशाध्यक्षांपर्यंतच्या सर्वच नेत्यांना ही म्हण लागू होते. त्याचे झाले असे की, महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकताच कबुतरांना दाणे टाकण्याच्या वादाच्या पार्श्वभूूमीवर ‘कबुतर जिहाद’ हा एक नवाकोरा शब्द शोधून काढला. "महाराष्ट्रात भाजप सरकारने ‘कबुतर जिहाद’ सुरू केला,” असे सपकाळांचे म्हणणे. मात्र, मुळात सपकाळ असो अथवा काँग्रेस यांना ‘जिहाद’ हा शब्द मान्य आहे का, हा पहिला प्रश्न. कारण, ‘लॅण्ड जिहाद’, ‘लव्ह जिहाद’चे वास्तव त्यांना, त्यांच्या पक्षाला कदापि मान्य नाही. पण, आता कबुतरांच्या प्रश्नापुढे थेट ‘जिहाद’सारखा शब्द चिकटवून नेमके सपकाळ यांना काय साध्य करायचे आहे?
अलीकडेच मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने काँग्रेसला जोरदार चपराक बसली. कारण, ‘भगवा दहशतवाद’ नावाचे काँग्रेसकृत थोतांड न्यायालयाच्या निर्णयाने हाणून पाडले. शिवाय त्यानंतरही ‘भगवा दहशतवाद’ म्हणण्याऐवजी ‘हिंदू किंवा सनातन दहशतवाद’ म्हणा, असे विधान करून पृथ्वीराज चव्हाणांनी अकलेचे तारे तोडले. मात्र, तरीही घडल्या प्रकारातून काही शिकतील ते काँग्रेस नेते कसले! हे प्रकरण निवळते न निवळते, तोच आता पुन्हा हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या बौद्धिक दुर्बलतेचे दर्शन घडवले.
‘कबुतर जिहाद’ हा शब्दप्रयोग करून हिंदूंना खरं तर खिजवण्याचाच खुळचटपणा सपकाळ यांनी चालवल्याचे दिसते. कबुतरांचा मुद्दा उपस्थित करत, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसने आपणही मैदानात असल्याचे दाखवून देण्याचा केलेला हा केविलवाणा प्रयत्नच. पण, सत्य हेच की अशाप्रकारे विधाने करुन हिंदू आणि जैन समाजामध्ये तेढ कशी निर्माण करता येईल, यासाठीच काँग्रेसचा हा खटाटोप म्हणावा लागेल. गेल्या काही दिवसांतील हर्षवर्धन सपकाळ यांची विधाने बघता, प्रदेशाध्यक्षपदावर असतानाही त्यांची अशी उथळ वक्तव्ये करण्याची मानसिकता उघड होते. वास्तविक, केवळ गांधी घराण्याशी असलेल्या निष्ठेच्या जोरावरच सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली, हे जगजाहीर. त्यातही यापुढे सपकाळ असेच बरळत राहिले, तर तो दिवस दूर नाही, ज्यादिवशी महाराष्ट्राच्या विधानसभेत दुर्बीण लावून काँग्रेसचे आमदार शोधावे लागतील.
उशिरा सूचलेले शहाणपण
दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसच्या पदाधिकार्यांची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना चांगल्याच कानपिचया दिल्या. संघटना कशी मजबूत करावी, यावर नेत्यांनी कार्यकर्त्यांना ‘मार्गदर्शन’ केले म्हणे. खरेतर आपापसात अंतर्गत वाद असलेल्या नेत्यांनीच कार्यकर्त्यांना सांघिक भावना निर्माण करण्याचे धडे देणे म्हणजे, आपल्या घराला गळती असताना दुसर्याला छप्पर घालण्याचा सल्ला देण्याचा प्रयत्न आहे. "काँग्रेसचा कार्यकर्ता चिवट आहे; पण कृती, सांघिक भावना आणि संघटनेत काँग्रेस मागे पडते,” अशी खंत हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली.
दुसरीकडे, "धार्मिक ध्रुवीकरणामुळे ओबीसी मतदार आपल्यापासून दूर गेला,” असे विजय वडेट्टीवार यांचे म्हणणे. एकेकाळी ओबीसी नेत्यांना काँग्रेस डावलते, अशी खंत बोलून दाखवणारे वडेट्टीवारही आता ओबीसी मतदार दूर झाल्याचे वेगळेच कारण देत आहेत.वास्तविक, धार्मिक ध्रुवीकरणामुळे नाही, तर काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी मतदार त्यांच्यापासून दुरावला. वर्षानुवर्षे काँग्रेस सरकारने मंडल आयोगाची फाईल धूळखात ठेवली. ओबीसींसाठी ना कुठल्या योजना राबवल्या ना मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा दिला. याउलट मोदी सरकारने ओबीसींसाठी राबविलेल्या योजना असो किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाच्या हितासाठी घेतलेले ५० निर्णय असो, यामुळे साहजिकच आज ओबीसी समाज महायुती सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. शिवाय ओबीसी विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची सुरुवात करून महायुती सरकारने ओबीसी समाजाला प्रगतीच्या मुख्य धारेत आणण्याचे काम केले.
काँग्रेसच्या तुष्टीकरणाचे राजकारण, समाजा-समाजात तेढ निर्माण करणारी नेत्यांची विधाने, हिंदूविरोधी मानसिकता, धर्मांधतेची भूमिका या सगळ्यामुळे मतदारांनी त्यांना कायमचे दूर केले. याशिवाय पक्षात ‘मी सांगेन ती पूर्वदिशा’ ही नेत्यांची आडमुठेपणाची भूमिका, गटातटाचे राजकारण अशी अनेक कारणे त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरली. परंतु, या सगळ्यातून बोध घेऊन सुधारणा करेल ती, काँग्रेस कसली? आपला मतदार का दुरावला? यापेक्षा आपण कुठे कमी पडलो? याबद्दल काँग्रेसला आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आहे.