संघसमर्पित सरस्वती उपासक - स्व. हसानंद निहलानी

    04-May-2025
Total Views | 9

संघसमर्पित सरस्वती उपासक - स्व. हसानंद निहलानी


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षात पदार्पण केले आहे. या संघरूपी महासागरात खारीचा वाटा म्हणता येईल, असे संघसमर्पित गृहस्थी कार्यकर्ते म्हणून सहभाग असलेले नाशिकच्या देवळाली कॅम्प (भगूर नगर) येथील, हसानंद ओचीराम निहलानी यांचे वयाच्या 76व्या वर्षी नुकतेच निधन झाले. त्यांच्या कार्याचे स्मरण तथा शब्दसुमनांजली अर्पण करणारा हा लेख...


सानंद निहलानी यांनी देवळाली कॅम्प येथील ‘शंकर एज्युकेशन सोसायटी’च्या डॉ. सुभाष गुजर हायस्कूल येथे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. घरातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वतःचे दहावीपर्यंत शिक्षण घेऊन, त्याच संस्थेत आपल्या हुशारीमुळे नोकरी करण्यास सुरुवात केली. पुढे नोकरी सांभाळून पुढील शिक्षण उच्च गुणवत्तेने नाशिक, मुंबई येथील महाविद्यालयात जाऊन पूर्ण केले. बालपणापासून शिक्षणाची मुळातच आवड असलेले हसानंद निहलानी यांनी हिंदी, इंग्रजी आणि सिंधी या तीन विषयात उच्च श्रेणीत ‘एमए’चे शिक्षण पूर्ण करून, त्यात शिक्षणशास्त्र विषयाच्या ‘बीएड’ व ‘एमएड’ या पदवी उत्तम श्रेणीमध्ये प्राप्त केल्या. हसानंद निहलानी यांनी संघकाम करतानाच संघाचे प्रशिक्षण वर्ग करीत, त्यांनी प्रथम व द्वितीय वर्ष संघ शिक्षा वर्ग पूर्ण केले. नित्य शाखा, संघाचे उत्सव व विविध उपक्रम कार्यक्रमात स्वतः सक्रिय सहभाग घेऊन अनेक तरुणांना संघकामात जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. स्वतःच्या मधुर वाणीच्या संवादातून, एक एक व्यक्ती संघकार्यात सहभागी करून घेण्याचे काम ते सातत्याने व जिद्दीने करीत असत.

हसानंद निहलानी यांनी डॉ. सुभाष गुजर हायस्कूलचे प्राचार्य म्हणून काम करीत असताना, ‘शंकर एज्युकेशन सोसायटी’चे सेक्रेटरी म्हणून त्यांनी संस्थेच्या कामात राष्ट्रभक्ती व समाजसेवेचा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये आपल्या कृतीतून रुजवला. हसानंद निहलानी यांनी हिंदी व सिंधी भाषेत राज्य व केंद्र शासनस्तरावर अनमोल असे लेखन, भाषण केले. देवळाली कॅम्प येथील पूज्य ‘सिंधी समाज संघटने’च्या पदाधिकारी म्हणून समाजसेवेचे मोलाचे कार्य केले होते.

देवळाली कॅम्प येथे संघकार्यात सक्रिय असताना, हसानंद निहलानी यांनी भगूर येथील संघांच्या ज्येष्ठ स्वयंसेवकांमधील मधुकर अण्णा जोशी, तुकाराम बुवा रहाणे, शंकरराव शेटे, श्रीधरपंत रहाणे, रामदास आंबेकर आणि ‘शिक्षण मंडळ भगूर संस्थे’चे विद्यमान कार्याध्यक्ष एकनाथराव शेटे यांच्यासोबत, या नाशिक जिल्ह्यात नावाजलेल्या शिक्षण संस्थेत गेल्या 25 वर्षांपासून संस्थेच्या कार्यकारी मंडळावर कार्यरत होते. हसानंद निहलानी यांच्या संघ शाखेत, संघ बैठकीत, वैयक्तिक भेटीतसुद्धा संघाचे पद्य त्यांनी म्हटले नाही, असे कधीच झाले नाही.

त्यांच्या मनःपूर्वक प्रेमळ अशा गीतगायनाच्या परिणाम स्वरूप, आजही ‘डॉ. सुभाष गुजर हायस्कूल देवळाली कॅम्प’ व ‘शिक्षण मंडळ भगूर संस्थे’च्या नूतन विद्या मंदिरात नियमितपणे परिपाठाद्वारे विद्यार्थ्यांना ही वरील देशभक्तीपर गीत मुखोद्गत आहे, दररोज शाळेची सुरुवात या राष्ट्रभक्तीचा संस्कार नसानसांत रुजविणार्‍या गीतांनीच होत आहे.
 
 
हसानंद निहलानी गेल्या वर्ष -सहा महिन्यांपासून आजारपणाने त्रस्त होते. परंतु, त्यांची संघकार्याची तळमळ त्यांना गप्प बसू देत नसे. तीन-चार महिन्यांपूर्वी झालेल्या प्राथमिक संघ वर्गात त्यांनी, प्रत्यक्ष भेट घेऊन सर्व स्वयंसेवकांशी आपलेपणाने विचारपूस करून, संघ गीतातून संघकामाचे प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्व लक्षात आणून दिले. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या घरातील संघ कार्याची पुस्तके, बैठकीच्या नोंद वही व अन्य संघ उपयोगी साहित्य देण्यासाठी, स्थानिक संघ स्वयंसेवक हेमंत गायकवाड यांस घरी बोलावून घेतले. काळजीने या सर्व सामग्रीचा उपयोग पुढील संघकामासाठी त्यांचा आग्रह होता.

संघकामाविषयी स्वतःच्या शेवटच्या श्वासापर्यंत तळमळीने विचार करणारे आणि स्वतःच्या कृतीतून संघ संस्कार करणारे हसानंद निहलानी यांनी, मला त्यांच्या निधनाच्या दोन दिवस अगोदर मुलगा भरतद्वारे भेटीला बोलावून, स्वतःकडे असलेले दुसर्‍या एका स्वयंसेवकाचे गुरूपूजनाचे समर्पण मला स्वहस्ते सोपवले. स्वतःचे कर्तव्य शेवटच्या क्षणापर्यंत पूर्ण करणारे, संघसमर्पित जीवन जगणारे, सरस्वतीचे उपासक हसानंद निहलानी यांच्या रूपाने माझ्यासारख्या सामान्य स्वयंसेवकांना त्यांच्या संघकामातून आदर्श म्हणून यापुढेही प्रेरणा देत राहतील.

या अशा संघसमर्पित स्वयंसेवकामुळेच आज 100 वर्षांची यशस्वी वाटचाल, संघ पूर्ण करताना आपण अनुभवत आहोत. यापुढेही हसानंद निहलानी यांच्या म्हटलेल्या,
प्राचीन तेरे देश में,
हम सबका लय हो,
जय हो, जय हो, जय हो...
या संघ गीताप्रमाणे, सर्वांना राष्ट्रप्रेमाचा संस्कार प्रेरणादायी ठरेल. या संघसमर्पित सरस्वतीच्या उपासक हसानंद निहलानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

(लेखक एकनाथराव शेटे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय देवळाली कॅम्प, नाशिक येथे प्राचार्य आहेत.)
प्रा. डॉ मृत्युंजय कापसे
9860310130
अग्रलेख
जरुर वाचा

'जारण'ने साजरी केली सक्सेस पार्टी; तीन आठवड्यांत सहा कोटींहून अधिक कमाई!

मराठी चित्रपट 'जारण'ने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करत केवळ समीक्षक, चित्रपटसृष्टी नव्हे, तर सर्वसामान्य प्रेक्षकांकडूनही भरभरून प्रेम मिळवले आहे. अनेक मोठ्या हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेतही 'जारण'ने आपल्या वेगळ्या आशयामुळे चित्रपटगृहात आपली खास जागा निर्माण केली आहे. प्रदर्शित होऊन तीन आठवडे उलटले असतानाच 'जारण'ने सुमारे ६ कोटींच्या वर कमाई केली आहे. हा प्रवास केवळ आकड्यांपुरता मर्यादित न राहता, भावनिक गुंतवणूक, आशयघन कथा आणि प्रेक्षकांकडून तोंडभरून कौतुक या सगळ्यांचा एकत्रित मिलाफ आहे. चित्रपटाला ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121