कर्नाटकमधील बदामीपासून 22 किमी अंतरावर वसलेले पट्टदक्कल हे छोटेसे गाव. चालुक्यांच्या कालखंडात राजांचे राज्याभिषेक सोहळे इथेच संपन्न होत. या ठिकाणी मध्य भारत आणि उत्तर भारतात दिसणार्या नागर पद्धतीच्या मंदिरांची आणि साधारण दक्षिणेमध्ये दिसणार्या द्राविड पद्धतीच्या मंदिरांची परिपूर्ण अवस्था बघायला मिळते. अशा या 1987 साली जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेल्या पट्टदक्कलची ही सफर...
एके दिवशी इंद्र अतिशय त्रासलेल्या अवस्थेत ब्रह्मदेवाकडे गेला. त्यावेळेला ब्रह्मदेव आपल्या प्रातःसंध्येमध्ये मग्न होते. इंद्र देवांना म्हणाला, “संपूर्ण सृष्टी पापमय झालेली आहे, कोणीही यज्ञयाग करून देवांना आहुती देत नाही.” हे सांगत असताना ब्रह्मदेवांच्या ओंजळीमध्ये पाणी होते. त्या पाण्याकडे पाहून देवांनी अर्घ्य अर्पण केले. त्यातून एक बलाढ्य पुरुष निर्माण झाला. ओंजळीतल्या पाण्यातून म्हणजेच चुलुकातून उत्पन्न झालेला पुरुष हा चालुक्य राजवंशाचा मूळ पुरुष.
ही सुंदर कथा ज्या राजवंशाशी निगडित आहे, त्या चालुक्य राजवंशाने भारतातल्या विस्तीर्ण प्रदेशावर साधारण इ. स. सहाव्या शतकापासून पुढे 400 वर्षांहून अधिक काळ राज्य केले. साहित्य आणि कलेचा विकास यांच्या कालखंडात मोठ्या प्रमाणात झाला. रविकीर्ती, बिल्हन, दुर्गासिंह इत्यादी प्रसिद्ध कन्नड आणि संस्कृत कवी याच चालुक्यांच्या आश्रयाला होते. पुलकेशी, विजयादित्य, विक्रमादित्य असे अनेक पराक्रमी राजे याच राजवंशाने भारतभूमीला दिले. यांपैकी पुलकेशी हा तर अत्यंत सामर्थ्यवान राजा होता. राजा कसला सम्राटच तो! याच्याच कालखंडात विंध्य पर्वतापासून ते कावेरीपर्यंत आणि पूर्व समुद्रकिनार्यापासून ते पश्चिम समुद्रकिनार्यापर्यंत चालुक्यांची सत्ता होती. पुलकेशी राजाचा एवढा दबदबा होता की, पर्शियाचा राजा दुसरा खुश्रू याचा प्रतिनिधी भलेमोठे नजराणे घेऊन यांच्या दरबारात भेटायला आला होता.
स्थापत्य आणि शिल्पकलेच्या बाबतीत चालुक्यांनी भारतात नवे युग सुरू केले. यांची कामगिरी एवढी भव्य आहे की, त्या काळात निर्माण झालेली शिल्पशैली ‘चालुक्य शैली’ अशाच नावाने ओळखली जाते. यांच्या कालखंडात लक्कुंडी, हावेरी, बंकापूर, गदग, कुरुवटी अशा अनेक ठिकाणी प्रचंड आणि भव्य देवालये उभारली गेली. चालुक्यांची पहिली राजधानी ऐहोळे या ठिकाणी आणि दुसरी राजधानी वातापी जे आपण आज बदामी म्हणून ओळखतो, तिथेही मोठा लेणी समूह आणि अनेक मंदिरांची निर्मिती केली गेली. पण, आज आपण ज्या स्थळाची माहिती घेणार आहोत, ते ठिकाण या दोन्ही जागांच्या मधोमध आहे. मंदिरस्थापत्याचे विद्यापीठ म्हणून ओळखले जाणारे पट्टदक्कल!
बदामी (कर्नाटक) गावापासून फक्त 22 किमी अंतरावर पट्टदक्कल हे छोटेसे गाव. या जागेचा वापर चालुक्यांच्या कालखंडात राजांचा राज्याभिषेक सोहळा करण्यासाठी केला जायचा. या गावाच्या नावाचा अर्थदेखील ‘राज्याभिषेकाचा दगड’ असाच होतो. राज्य चालवण्यासाठी वेगवेगळ्या अधिकार्यांची नेमणूकदेखील इथूनच केली जायची.
मंदिरस्थापत्याच्या दृष्टिकोनातून कदाचित ही भारतातली सर्वांत महत्त्वाची जागा आहे. मध्य भारत आणि उत्तर भारतात दिसणार्या नागर पद्धतीच्या मंदिरांची आणि साधारण दक्षिणेमध्ये दिसणार्या द्राविड पद्धतीच्या मंदिरांची परिपूर्ण अवस्था याच ठिकाणी बघायला मिळते. या स्थळावरची जम्बुलिंगेश्वर, पापनाथ, गळगनाथ आणि काशीविश्वेश्वर ही मंदिरे नागरशैलीचे प्रतिनिधित्व करतात, तर द्राविड शैलीमध्ये मल्लिकार्जुन, संगमेश्वर आणि विरूपाक्ष मंदिरांची निर्मिती झाली. या जागेचे हे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन 1987 सालीच पट्टदक्कल वारसास्थळांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये केला गेला.
विक्रमादित्य दुसरा याने कांचीच्या पल्लव राजघराण्यावरती विजय मिळवल्याबद्दल, या विजयाच्या स्मृतिप्रीत्यर्थ लोकेश्वर म्हणजेच विरूपाक्ष, तर त्रयलोकेश्वर म्हणजेच मल्लिकार्जुन या दोन्ही सुंदर मंदिरांची निर्मिती विक्रमादित्य दुसरा याच्या दोन पत्नी लोकमहादेवी व त्रैलोक्यमहादेवी यांनी केली.
शिवाला अर्पण केलेल्या विरूपाक्ष मंदिराच्या सुरुवातीलाच भव्य नंदी असलेला नंदीमंडप दिसतो. मुख्य मंदिराचा बाहेरचा जो भाग आहे, त्याच्या वितानावर म्हणजेच छतावर अतिशय सुंदर असे सूर्याचे शिल्प दिसते. इथून आपण मंदिराच्या मंडपात प्रवेश करतो. अनेक भव्य स्तंभांवरती हा मंडप उभा आहे. या स्तंभांवर पंचतंत्र, रामायण, महाभारत, पुराणे इत्यादी प्राचीन ग्रंथांमधल्या कथा कोरलेल्या दिसतात. गर्भगृहामध्ये भव्य शिवलिंग असून गर्भगृहाच्या दोन्ही बाजूंना डावीकडे आणि उजवीकडे देवकोष्ठ आहे. यात अनुक्रमे गणपती आणि महिषासुरमर्दिनी यांची शिल्पे दिसतात. अशाच पद्धतीची काहीशी रचना ही मल्लिकार्जुन या मंदिराचीदेखील आहे. या दोन्ही मंदिराच्या बाह्य भिंतींवर अतिशय सुंदर आणि बोलक्या शिल्पांची रचना केलेली आहे. यातल्या काही शिल्पांचा परिचय आपण करून घेऊया.
वर उल्लेख केलेला, मंदिराच्या छतावर असणारा सूर्य. ही प्रतिमा ही खूप सुंदर कोरलेली आहे. सूर्य हातामध्ये दोन कमळे घेऊन सप्तअश्वांच्या रथात उभा आहे. रथाचा सारथी अरुण समोर बसलेला दिसतो. या शिल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे, घोड्यांना बांधलेला लगाम जो अरुणाने हातात पकडलेला आहे, तोदेखील अतिशय स्पष्ट या शिल्पात दिसतो. सूर्याच्या दोन्ही बाजूंना हातामध्ये धनुष्य घेऊन उषा आणि प्रत्युषा यादेखील दिसतात. हे शिल्प बघताना आपली मान दुखते आणि मग शिल्पेे कोरणार्यांनी काय केले असेल, असा एक विचार अलगद आपल्या डोक्यात येऊन जातो.
मंदिराच्या मंडपात एका स्तंभावरती रामायणातली गोष्ट कोरलेली आहे. पहिल्या ओळीत शूर्पणखा आणि राम-लक्ष्मण संवाद दिसतो. दुसर्या ओळीमध्ये आपल्या मुलांच्या मदतीने शूर्पणखेने सीतेचे हरण करायचा प्रयत्न केला, पण तो सफल झाला नाही, हा युद्धप्रसंग कोरलेला दिसतो. तिसर्या ओळीमध्ये तिने रावणाकडे याचना केलेला प्रसंग कोरलेला असून, चौथ्या ओळीत मारिच राक्षस आणि रावणाकडून सीतेचे हरण असे प्रसंग कोरलेले दिसतात. साधारण दीड फुटांच्या चौरसामध्ये हे शिल्प कोरलेले आहे. याच खांबाच्या एका बाजूला वरती शिल्पश्लेषदेखील कोरलेला आहे. शिल्पश्लेष म्हणजे काय, तर प्राण्यांची दोन शरीरे, पण चेहरा एकच. डावीकडून बघितल्यावर आपल्याला बैलाचे शरीर व चेहरा दिसतो, तर उजवीकडून बघितल्यावर हत्तीचे शरीर आणि चेहरा दिसतो. आहे की नाही कमाल!
मंदिराच्या बाह्यांगावर नटराज, लिंगोद्भव, दुर्गा, वराह अवतार अशी अनेक वेगवेगळी शिल्पे कोरलेली आहेत. पण, यापैकी सर्वांत बोलके शिल्प हे मंदिराच्या डावीकडच्या बाजूला असणार्या अर्धमंडपाच्या खांबावरती कोरलेले आहे. साधारण तीन साडेतीन फूट उंच असणारे हे शिल्प नरसिंह आणि हिरण्यकश्यपु यांच्यामधला युद्धप्रसंग दाखवणारे आहे. कशानेच मृत्यू येणार नाही, म्हणून अत्यंत गुर्मीमध्ये असणारा हिरण्यकश्यपु, ज्या वेळेला समोर दिसणार्या मृत्यूची चाहूल लागल्याने घाबरतो, बरोबर तो क्षण कलाकाराने या शिल्पामध्ये पकडलेला आहे. एका बाजूला नरसिंह उभा असून, त्याने आपल्या घट्ट पकडीमध्ये हिरण्यकश्यपुला पकडले आहे आणि आता बरोबर पोट फाडण्यासाठी मांडीवरती घेणार, हा क्षण तिथे दिसतो. पण, इथे आपल्याला काय बघायचे आहे, तर त्या हिरण्यकश्यपुचा घाबरलेला चेहरा. आपल्या कलाकारांनी दगडालादेखील या शिल्पांच्या माध्यमातून जिवंत केलेले आहे.
आपल्यापैकी अनेकजण बदामी देवीच्या दर्शनासाठी कायम जात असतील. कदाचित कित्येकांची ती देवी कुलदेवतादेखील असेल. आता जेव्हा केव्हा या बदामी देवीच्या दर्शनासाठी जाल, त्या वेळेला फक्त 22 किमी अंतरावर असणार्या पट्टदक्कल या जागेची आठवण नक्की ठेवा. आपल्या वारसास्थळांप्रति आपण प्रेम आणि आपुलकी मनापासून व्यक्त केली, तर ती देवी कदाचित अजून मोकळ्या हातांनी आपल्याला भरभरून आशीर्वाद देईल!
इंद्रनील बंकापुरे
7841934774