जळगावमधील दोन माजी मंत्री - तीन माजी आमदार राष्ट्रवादीत
03-May-2025
Total Views | 22
मुंबई, जळगावमधील दोन माजी मंत्री आणि तीन माजी आमदारांनी शनिवार, दि. ३ मे रोजी अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासह जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील शरद पवार गटाच्या असंख्य पदाधिकार्यांनी के. सी. कॉलेज सभागृहात झालेल्या कार्यक्रमात जाहीर प्रवेश केला.
जळगाव जिल्ह्यातील माजी मंत्री सतिश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार दिलीपराव सोनवणे, धुळ्याचे माजी आमदार प्रा. शरद पाटील, उत्तरविभागीय अध्यक्ष शरद पवार गटाच्या नेत्या तिलोत्तमा पाटील यांचा यात समावेश आहे. याशिवाय जळगाव, धुळे, नंदुरबार, रावेर येथील जिल्हा परिषद, जिल्हा बँकेचे संचालक, पंचायत समिती, बाजार समिती मधील शरद पवार गटातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांनीही प्रवेश केला.
उपस्थितांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री अजित म्हणाले, बेरजेचे राजकारण करत करत सर्व जाती धर्माच्या घटकांना सोबत घेऊन काम करूया. आम्ही राजकारणात किंवा सार्वजनिक जीवनात जात-पात, धर्म कधी पाळला नाही. अठरापगड जातींना घेऊन शिवरायांनी जसे राज्य केले. त्याचपद्धतीने राष्ट्रवादी पक्ष काम करत आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, आमदार शिवाजीराव गर्जे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.