पुणे : (Vaishnavi Hagwane Case Hearing) वैष्णवी हगवणेच्या मृत्यूला आता जवळपास दोन आठवडे पूर्ण होत आले. मात्र वैष्णवीच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. दररोज या प्रकरणात नवनवीन खुलासे होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हे प्रकरण सतत चर्चेत आहे. मात्र आता कोर्टात झालेल्या युक्तिवादामुळेच या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. कोर्टात झालेल्या युक्तिवादात हगवणेंच्या वकिलानं वैष्णवीच्या चारित्र्यावर गंभीर आरोप केले आहेत. वैष्णवीची एका व्यक्तीसोबत चॅटिंग पकडल्यानंतर ती आत्महत्येचा प्रयत्न करत होती, तसेच नवऱ्याने बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही असा अजब युक्तिवाद केला.
ही हुंडाबळीची केस नाही, आत्महत्येचे कारण वेगळेच
युक्तीवाद करताना हगवणे कुटुंबियांचे वकिल अॅड. विपुल दुशिंग (Advocate Vipul Dushing) यांनी खळबळजनक विधान केले. ते म्हणाले, "वैष्णवीची प्रवृत्तीच स्वतःला संपवण्याची होती. तिचे एका व्यक्तीसोबतचे नको ते चॅट एकदा पकडण्यात आल्याने तिने अनेकवेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. एकदा उंदीर मारण्याचं औषध खाऊन तर एकदा गाडीतून उडी मारुन तिने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता. असा दावा केला. वैष्णवी नको त्या व्यक्तीसोबत चॅट करायची, आम्ही ते पकडले आणि त्या व्यक्तीने त्रास दिला असेल म्हणून तिने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न असावा. मोबाईल चॅट व्हायरल झाल्यानं चॅट लपवल्याच्या दाव्यात काही अर्थ नाही. ही हुंडाबळीची केस नाही. तिने आत्महत्या करण्याचे कारण वेगळे आहे, परंतु पोलीस त्याचा शोध घेत नाहीयेत, असा दावा त्यांनी केला.
नवऱ्यानं बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही
एखाद्या नवऱ्यानं आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे तो छळ होत नाही, असा युक्तीवादही त्यांनी केला. हगवणेंकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत, ४० लाखांच्या फॅार्च्युनरसाठी ते कशाला छळ करतील असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच त्यांनी याप्रकरणी फरार असलेला संशयित निलेश चव्हाणला या प्रकरणात अडकवण्यात आल्याचं म्हटलयं. ते म्हणाले, "निलेश चव्हाणला सहआरोपी करणं चुकीचं आहे, कारण पाचही जण अटकेत असताना त्यानेच बाळाला सांभाळले आहे, परंतु त्याने बाळाची हेळसांड केल्याचा आरोप करत त्याच्यावरच गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये त्याचा काय दोष? त्याच्यावर पूर्णपणे अन्याय झाला आहे. असा युक्तीवाद कोर्टात करण्यात आला.
वकिलांकडून युक्तीवाद करताना बचावाचा पूर्ण प्रयत्न करण्यात आला असला तरी, हगवणेंना पोलीस कोठडीपासून वाचवण्यात त्यांना यश आलं नाही. दोन्ही बाजूचा युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना ३१ मे पर्यंत म्हणजे तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तर शशांक हगवणे, लता हगवणे आणि करिष्मा हगवणे यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\