कोकणच्या विकासाला नेहमीच प्राधान्य! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
12-May-2025
Total Views | 17
सिंधुदुर्ग : कोकणच्या विकासाला नेहमीच यूती सरकारचे प्राधान्य आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. रविवार, ११ मे रोजी त्यांनी मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. त्यानतंर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री नितेश राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर, रवींद्र चव्हाण, निलेश राणे, निरंजन डावखरे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना कोकणातील वेगवान वारे आणि वादळांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. या पुतळ्याची उंची पाहता महाराजांचा हा देशातील बहुदा सर्वात उंच पुतळा ठरेल. पुतळ्याची भव्यता लक्षात घेता पुतळ्याच्या आसपासचा परिसर विकसित करुन पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. कोकणच्या विकासाला नेहमीच यूती सरकारचे प्राधान्य आहे. कोकणाला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न आम्ही करणार असून पर्यटनाच्या दृष्टीने कोकणचा अधिकाधिक विकास करणार आहे," असे त्यांनी सांगितले.
"राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा पुन्हा एकदा त्याच तेजाने, स्वाभिमानाने आणि भव्यतेने उभा झाला ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. मागच्या काळात याठिकाणी दुर्दैवी घटना झाल्यानंतर विक्रमी वेळेत हा पुतळा पुन्हा प्रस्थापित करण्याचा निर्णय आमच्या सरकारने केला होता आणि विक्रमी वेळेत हा पुतळा उभा झाला आहे."
"सार्वजनिक बांधकाम विभागाने विक्रमी वेळेत पुतळ्याचे काम पूर्ण करुन महाराजांच्या कर्तृत्वास साजेसा भव्य पुतळा उभारला आहे. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच यंत्रणांनी अतिशय वेगाने काम केले आहे. ज्येष्ठ मूर्तीकार राम सुतारांनी कमी वेळेत आकर्षक आणि देखणा पुतळा साकारला आहे. आय.आय.टी., जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे देखील पुतळा उभारणीत मोलाचे योगदान लाभले आहे," असेही ते म्हणाले.