भारत- पाक संघर्षाचा अन्वयार्थ...

    11-May-2025
Total Views | 26
भारत- पाक संघर्षाचा अन्वयार्थ...


पहलागाम हल्ल्यानंतर भारताने मोठ्याप्रमाणात मात्र, मर्यादित कारवाई पाकिस्तानावर करत त्यातील दहशतवादी तळांवर आक्रमण केले. यावर पाकिस्तानाने भारतातील नागरी आणि लष्करी इमारतींना लक्ष्य करण्याची आगळीक केली. यामुळे, मोठ्या प्रमाणात संघर्ष चिघळला. त्यात पाकिस्तानचे अतोनात नुकसान झाले. मात्र, या सगळ्यात भारताचा संयम, भारताची स्पष्ट धोरणे निर्णयक्षमता, सैन्यशक्ती यांचे दर्शन जगाला घडले. यासंर्घषाचा हा घेतलेला आढावा....


दि. 22 एप्रिल 2025 या तारखेला काश्मीरमध्ये गुलमर्गजवळ पहलगाम या ठिकाणी एक अतिशय घृणास्पद घटना घडली. काश्मीरमध्ये आलेल्या पर्यटकांना पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घेरले आणि त्यानंतर फक्त पुरुषांना, त्यांचे नाव आणि धर्म विचारून कुटुंबासमोरच ठार मारले. हे घडत असताना त्यांच्यातल्या एका स्त्रीने यांना मारत असाल तर मलासुद्धा मारा, मला कशाला जिवंत ठेवता, असे म्हटल्यानंतर या दहशतवाद्यांनी त्या पत्नीला सांगितले की, जाऊन ’त्या मोदीला सांग आम्ही काय केले ते!’ ही घटना घडल्यानंतर अर्थातच आपल्या देशात संतापाची लाट निर्माण झाली आणि सरकारकडे बदला घेण्याची मागणी समाजाच्या सगळ्या थरातून जोर धरू लागली.परंतु, नरेंद्र मोदी हे अशा एकदम भावनिक कारणांनी काही करण्याबद्दल प्रसिद्ध नाहीत. जे काही करायचे ते अतिशय योजनाबद्ध आणि थंड डोक्याने करायचे हे त्यांचे पहिल्यापासून सूत्र आहे आणि त्याचप्रमाणे याही वेळेला त्यांनी योग्य वेळेला कारवाई करू असे सांगितले. पण, एक मात्र त्यांनी सांगितले की, याचे जे कोण गुन्हेगार आहेत ते, त्यांना मदत करणारे आणि त्यांच्या पाठीशी उभे असणारे या सर्वांवर त्यांच्या कल्पनेपलीकडील कारवाई केली जाईल. याअगोदरसुद्धा ‘उरी’ किंवा ‘बालाकोट’चा हल्ला असो, दोन्ही वेळेला मोदी अगोदर काहीही बोलले नव्हते. बदल्याची कारवाई झाल्यानंतरच देशाला त्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे जेव्हा नरेंद्र मोदींनी आम्ही आमच्या ठरवलेल्या वेळीच ठरवलेले काम करू हे सांगितले, तेव्हा पाकिस्तानमध्ये नागरिकांमध्ये सैन्यामध्ये आणि मुख्यत्वे दहशतवाद्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली. इकडे भारतामध्ये विरोधी पक्ष ओरडत होते की सरकार काहीच करत नाही, सरकारने काहीतरी केले पाहिजे. विरोधी पक्षाची मोठीच गंमत असते, त्यांना करायचे काहीच नसते, फक्त समोरच्याने काय केले किंवा काय केले नाही याच्यावर शाब्दिक हल्ले करायचे असतात! सुरुवातीला तर या विरोधी पक्षाच्या मान्यवर जाणत्या आणि वरिष्ठ नेत्यांनीसुद्धा धर्म विचारून गोळी घातली, हे सत्य मानायलाच नकार दिला. त्यांच्या मते, असे काहीच झाले नव्हते. कुठेतरी त्यांच्या मनामध्ये हे दहशतवादी इस्लामी धर्मांध होते, हे मान्यच करायचे नव्हते.


परंतु, यांच्या भूमिकांनासुद्धा नरेंद्र मोदींनी काही प्रत्यक्ष उत्तर दिले नाही आणि मग मात्र एकेदिवशी या कारवाईला सुरुवात केली. दि. 7 मे रोजीच्या रात्री 1.30 वाजता ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेला धडाक्यात प्रारंभ झाला. हे नाव नरेंद्र मोदी यांनी जाणीवपूर्वक निवडले आहे. आमच्या माय-भगिनींच्या कपाळावरचे कुंकू पुसणार्‍या दहशतवाद्यांना याच ‘सिंदूर’ मोहिमेने चोख आणि सणसणीत उत्तर दिले जात आहे! त्या कारवाईमुळे पाकिस्तान भलताच घाबरला आहे. कारण, आता तर पाकिस्तानच्या अस्तित्वाचा प्रश्न पणाला लागलेला आहे. त्यातसुद्धा आश्चर्य असे वाटते की, भारतातले पाकिस्तानप्रेमी लोक हे जास्त टरकले आहेत आणि ठिकठिकाणी आता युद्ध नको, युद्धाने कुठलेही प्रश्न सुटत नाहीत शांतता पाहिजे. चर्चेने प्रश्न सोडवू या प्रकारची विधाने या तथाकथित ‘देशभक्त’ विरोधकांकडून यायला लागलेली आहेत. ज्याप्रमाणे आपले ‘चीफ ऑफ डिफेन्स सर्व्हिसेस’, जनरल बिपिन रावत एकदा म्हटले होते की, “भारताला अडीच आघाड्यांवर युद्ध लढायला लागणार आहे. एक चीन, एक पाकिस्तान आणि अर्धी आघाडी म्हणजे भारतातले चीन आणि पाकिस्तानची तळी उचलणारे जे लोक आहेत, ते देशद्रोहीच आहेत. कारण, इथे आपण ज्यांच्याशी लढाई करणार आहोत, त्यांची बाजू घ्यायला ही लोक येतात. यांच्यावर कठोर कारवाई करायलाच लागणार आहे आणि तीदेखील योग्य वेळेला केली जाईल, यात काही शंका नाही.”आता आपण ही घटना का घडली, त्याच्यावर थोडसे बोलू या. पाकिस्तानचे सध्याचे सैन्य प्रमुख जनरल असीम मुनीर आहेत. त्यांची ख्याती ते कट्टर धर्मांध आहेत आणि किती कट्टर, तर त्यांना संपूर्ण कुराण मुखोद्गत आहे. त्यांच्याकडे अशा माणसाला ‘हाफीझ’ असे म्हणतात. हा मनुष्य ‘हाफिझ’ आहे. त्यांनी सैन्यातल्या गरजेच्या गोष्टी काही शिकला, का फक्त कुराणच शिकला याबद्दल खात्री नाही. या माणसाला जनरल करू नका, अशा मताचे माजी लष्करप्रमुख बाजवा होते. म्हणूनच इम्रान खान यांनी यांना जनरल केले नव्हते. किंबहुना यांना ‘आयएसआय’च्या प्रमुख पदावरून डच्चू देण्यात आला होता. पण, पुढे काहीतरी करून हे जनरल झाले. या ऑक्टोबरमध्ये त्यांची कारकीर्द संपणार होती पण, त्यांना मात्र निवृत्त व्हायचे नव्हते. आता पाकिस्तानमध्ये सैन्य सर्वांच्या वर आहे, जरी तिथे लोकशाही असली तरी नावालाच. सध्या आसिफ अली झरदारी अध्यक्ष आहेत. परंतु, सगळी सूत्र सैन्यच हलवत असते आणि सैन्यप्रमुख हाच खरा सूत्रधार असतो. परंतु, आता मुनीरना भीती वाटायला लागली होती. ऑक्टोबरमध्ये त्यांना जायला लागेल. मग काय करायचे? मुळामध्ये पाकिस्तानमध्ये एवढे मोठे सैन्य असण्याची गरजच नाही.पण, त्यांनी सुरुवातीपासून पाकिस्तानी जनतेची अशी एक समजूत करून दिली आहे की, भारत पाकिस्तानच्या विरोधात कटकारस्थान करण्यासाठी टपलेला आहे, त्याला जर थोपवायचे असेल तर आपल्याला प्रचंड शक्तिमान आणि त्याच्याकडे सर्वाधिकार असणारे सैन्य आवश्यक आहे. अशाच कारणाकरिता मुनीर यांनी हा डाव रचला. त्यांचेच एक अधिकारी माजी मेजर असलेले आदिल राजा यांनी सप्रमाण सिद्ध केले की, पहलगाम येथील संपूर्ण कारवाई ही मुनीर यांनीच रचलेली होती. खर तर मुनीर यांच्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात दहशतवादी म्हणून खटला चालवायला हवा आणि त्यांना शिक्षा व्हायला हवी. परंतु, तसे काही पाकिस्तानात होणार नाही. पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय दहशतवादी हाफिज सईदसहित किंवा मसूद अजहरप्रमाणे, या सर्वांची यादी भरपूर मोठी आहे. या सगळ्यांना ‘व्हीआयपी स्टेटस’ आहे. लोकांना दाखवायला त्यांना तुरुंगात ठेवण्याच्या वाग्लना केल्या जातात. 29 वर्षांची शिक्षा झालेली आहे. परंतु, त्याला ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ दिली जाते.


इतके दिवस आपण दहशतवादी कारवाई झाली की त्या दहशतवाद्यांना पकडायचे, पकडून त्यांच्यावर कार्यवाही करायची आणि त्यातील त्यांचे साथीदार जर पाकिस्तानात असले, तर पाकिस्तान सरकारला त्यांच्यावर कार्यवाही करायला सांगायचे, असे चालू होते. पाकिस्तान सरकार व पाकिस्तान सैन्य यांना मनापासून असे वाटतही नाही की, या दहशतवाद्यांनी काही गुन्हा केला आहे. त्यामुळे यावेळेस नरेंद्र मोदी सरकारने असे ठरवले की, ही सगळी कारवाई भारतीय सैन्याद्वारे आपणच करायची आणि याची झळ पाकिस्तानच्या सैन्याला लागली पाहिजे. त्यासाठी खूप मोठी योजना आखणे आवश्यक होते. कार्यवाहीला इतका वेळ लागला, त्याचे मुख्य कारण तेच होते. त्या कारवाईची सुरुवात कशी झाली, तर सर्वांत आधी ‘सिंधू पाणीवाटप करार’ रद्द केला. या कराराप्रमाणे पाण्याचा खूप मोठा हिस्सा हा पाकिस्तानला द्यायचा म्हणजे सिंधू, झेलम आणि चिनाब या तीन मोठ्या नद्यांचे 80 टक्के पाणी पाकिस्तानला द्यायचे आणि तुलनेने लहान, सतलज, रावी आणि बियास या नद्यांचेच पाणी भारताने वापरायचे! पण, या वेळेला नरेंद्र मोदी सरकारने हा करार मुळी रद्दच करून टाकला. रद्द म्हणजे कॅन्सल नाही तर त्याला स्थगित केला. तो करार आहे पण, त्याचे आम्ही पालन करणार नाही अशी भूमिका घेतली. कारण, या कराराचा लुच्चेपणा असा की, या करारात एक्झिट कलमच नाही आहे. म्हणजे तुम्हाला या कराराबाहेर पडताच येणार नाही. पण, असा करार स्थगित मात्र करता येतो. यामागील डाव पाकिस्तानच्या लक्षात आल्याने, त्यांनी घोषणाच करायला सुरुवात केली. हा करार स्थगित करणे म्हणजे भारत आमच्याशी युद्धच पुकारतो आहे.


त्याच्यानंतर पाकिस्तानच्या खुज्या आणि डोके फिरलेल्या नेतृत्वाने आम्ही शिमला करारातून बाहेर पडतो, अशी भूमिका घेतली. ती भारताच्या पथ्यावरच पडली. कारण, शिमला करारसुद्धा पाकिस्तानच्या फायद्याकरिताच केलेला आहे. त्यावेळेस आपण त्यांच्याकडून घेतलेली 13 हजार चौरस किमी भूमी त्यांना परत करून टाकली व त्यांचे 93 हजार युद्धकैदी परत केले. त्याबदल्यात काश्मीरचा प्रश्न सोडवला नाही. नियंत्रणरेषा जन्माला घालून ती ओलांडायची नाही, असे कलमही या करारात घातले. आता हा करारच पाकिस्तानी रद्द केल्यामुळे नियंत्रणरेषा असा काही प्रकार उरलेलाच नाही. आता भारतीय सैन्य स्वतःची आंतरराष्ट्रीय सीमा जिथपर्यंत आहे, तिथपर्यंत जाऊ शकेल.

याच्यानंतर अनेक कारवाया करण्यात आल्या. पाकिस्तानशी कुठलाही व्यापार करायचा नाही, अगदी त्यांच्या जहाजांना भारताच्या बंदरात येऊ द्यायचे नाही. पाकिस्तानने त्यांची हवाई सीमा भारताकरिता बंद केली. त्याबरोबर भारताने आपली हवाई सीमा पाकिस्तानकरिता बंद केली आणि या सगळ्याचा परिणाम एकदम खूप मोठा झाला आणि पहलगामचे उट्टे काढण्याकरिता, भारताने पाकिस्तानवर कारवाई केली! दि. 7 मे रोजीच्या रात्री 1 वाजता एकाच वेळी नऊ ठिकाणी, पाकिस्तानी दहशतवादी जिथून आपली कामे करायचे, त्यांचे जसे ‘जैश-ए-मोहम्मद’, ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ अशा अनेक दहशतवादी संघटनांच्या मुख्यालयांवर प्रचंड हल्ला केला. त्यांच्याविरुद्धही कारवाई अजूनपर्यंत चालू आहे. पाकिस्तानने त्यानंतर तुर्कस्तानने दिलेले ड्रोन भारतावर पाठवले. त्यानंतर त्यांनी काही विमाने पाठवली ती भारताच्या अति उत्कृष्ट हवाई संरक्षण व्यवस्थेने पाडली. त्यांची आतापर्यंत तीन ‘एफ-16’ पाडलेले असून, दोन ‘जेएफए-17’ चीनीबनावटीची पाचव्या श्रेणीतील विमानेही पाडली. सर्वांत स्तुती करण्यासारखी गोष्ट म्हणजे भारताची हवाई संरक्षण प्रणाली इतकी सुदृढ आहे की, यातली बहुतेक मिसाईल हवेत उद्ध्वस्त करण्यात आली. परंतु, पाकिस्तानी ही कारवाई सुरू केल्यानंतर लगेच भारताने ताबडतोब त्यांच्या महत्त्वाच्या शहरांचे जे विमानतळ आहेत, त्या विमानतळावरची हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त केलेली आहे. आपले नौदल सिंधुसागरात म्हणजे अरबी समुद्रामध्ये, कराचीच्या तोंडावर नेऊन उभे केलेले आहे. त्याशिवाय पाकिस्तानात जे अंतर्गत संघर्ष चालू होते, त्यातला सर्वांत महत्त्वाचा म्हणजे बलुचिस्तानचा स्वातंत्र्य संघर्ष. ‘बलुच लिबरेशन आर्मी’ नावाचे स्वातंत्र्यसैनिक त्यांचे सशस्त्र दल आहे. आता कसे झाले की, भारताशी लढाई असल्यामुळे पाकिस्ताननी आपल्या फौजा बलुचिस्तान आणि अफगाणिस्तान या सीमांवरून पूर्व सीमेवरती भारताकडे बोलावलेले आहेत. त्यामुळे ‘बलुच लिब्रेशन आर्मी’नेही पाकिस्तान सैन्याविरोधात आघाडी उघडली आहे. त्यामुळे पाकिस्तानी सैनिक पळून जात आहेत. हीच परिस्थिती वायव्य सीमेवरच्या सैन्याची आहे, तिथे पाकिस्तानी सैनिकांना ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ म्हणजे ‘टीटीपी’ या मूलतः पठाण नागरिक असलेल्यांचा संघर्ष सहन करायला लागतो. ‘टीटीपी’नेही आघाडी उघडली आहे. पाकिस्तानी सैनिक आपला युनिफॉर्म काढून पळून गेल्याचे व्हिडिओसुद्धा समाज माध्यमांवर प्रसारित झाले आहेत. त्यामुळे ‘टीटीपी’ एका बाजूने ‘बलुच लिब्रेशन आर्मी’ दुसर्‍या बाजूने आणि समोर भारत अशा तिहेरी फासात पाकिस्तान सापडलेला आहे. त्यांना मदत कोण करणार? पूर्वी अमेरिका करत असेल, पण सध्या ट्रम्प यांच्या अमेरिकेने पाकिस्तानला आपला मित्र राष्ट्र मानलेले नाही. चीन त्यांना मदत करतो, पण चीनमध्ये सध्या इतक्या अडचणी वाढलेल्या आहेत. असे म्हटले जाते की चीनमध्ये जिनपिंग यांनाच सत्तेतून बाहेर काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आता जिनपिंग स्वतःची सत्ता वाचवणार की, आपल्या पाकिस्तानसारख्या लंगड्या मित्राला मदत करणार? त्यामुळे तिकडून मदत होत नाही, पाकिस्तानी मदतीसाठी इराणकडेसुद्धा गेला. इराण शिया राष्ट्र आहे, मूलतः पाकिस्तानचे शत्रू राष्ट्र आहे. इराणच्या मंत्र्यांनी मध्यस्थीबाबत करण्याबाबत आपल्याशी चर्चाही केली, आपण ती नाकारली. पाकिस्तानकडचा पैसा संपलेला आहे, आपल्या दुर्दैवाने आणि त्यांच्या सुर्दैवाने ‘जागतिक नाणेनिधी’ने या परिस्थितीतसुद्धा त्यांना एक अब्ज डॉलर्स कर्ज मंजूर केले. आजची परिस्थिती अशी आहे की, उद्या खायला पैसे नाही, लढायचे म्हटले तर लढण्याकरिता पुरेसा दारूगोळा नाही, पुरेसे इंधन नाही, नेहमी मदत करणार्‍या अरब राष्ट्रांनीही यावेळेला हात आखडता घेतलेला आहे. हे अर्थात नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाचे यश म्हणायला लागेल.


त्यामुळे सध्या बघितले तर पाकिस्तान हा बर्‍यापैकी सापळ्यात सापडलेला आहे. त्यामुळे थोड्याच ही दिवसात पाकिस्तानचा सगळा उसना आवेश संपलेला असून आणि ते शनिवार, दि. 10 मे रोजी दुपारी 3.30 वाजता आपल्याकडे विनाशर्त शांतीची भीक मागायला आले आहेत. कारण, त्यांना ही लढाई यापेक्षा जास्त झेपणारच नाही. आपण त्यांच्या युद्धबंदी प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे, पण त्यामध्ये आपल्या अटी काय असतील, हे अजून उघड झालेले नाही. तरी पण यावेळेला त्या शांतीची किंमत नरेंद्र मोदींकडून मान्य करून घ्यायला लागेल आणि नरेंद्र मोदी हे नेहरू यांच्याप्रमाणे भोळसट नेतृत्व नाही आणि प्रखर राष्ट्रवादी नेतृत्व आहे, त्यामुळे काश्मीरचा प्रश्न पूर्णपणे सोडवणे आणि दहशतवाद्यांना आमच्या ताब्यात द्या, या दोन गोष्टी शिवाय शांतता नाही हे नक्कीच. अधिक म्हणजे बलुचिस्तानला स्वातंत्र्य द्या, ही मागणी असणार आहे आणि लक्षात ठेवा. 44 टक्के भूभाग बलुचिस्तानकडे आहे आणि पाकिस्तानची सगळी नैसर्गिक संपत्ती बलुचिस्तानमध्येच आहे. भविष्यात खैबर पख्तूनख्वादेखील स्वतंत्र होईल. कारण, पठाण सैनिकांना आणि नागरिकांना अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामधल्या भागाची सीमा मंजूरच नाही. मग उरेल काय तर फक्त पंजाब म्हणजे पश्चिम पंजाब. या लढाईचा निकाल लवकरच लागेल याची खात्री आहे. कारण, पाकिस्तानकडे एवढी लढाई लढण्यासाठी संसाधने नाहीत. भारताची आंतरराष्ट्रीय राजकारणातली प्रतिमादेखील खूप उच्च झालेली आहे आणि पाकिस्तान सारखी अणुबॉम्बची धमकी देत असतो, त्या धमकीला भीक न घालणे हे नरेंद्र मोदींनी उत्तमरीतीने साधलेले आहे. त्यामुळे असे वाटते की, या युद्धाचा निकाल म्हणजे पाकिस्तानचे कमीत कमी चार तुकडे होणे! कारण, कोणालाच पंजाबी पाकिस्तानी वर्चस्व नकोय. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सर्व मंत्रिमंडळ आपल्या सैन्याचे तिन्ही दलप्रमुख, सीडीएस जनरल अनिल चौहान आणि इतर सर्व अधिकारी यांच्या प्रयत्नाला किती लवकर यश येते आणि आपल्या पश्चिम सीमेवरची पाकिस्तानची डोकेदुखी किती लवकर संपते याकडे देशाचे लक्ष आहे.


एक छोटीशी पुस्ती म्हणजे भारतीय सैन्याने वापरलेले भारतीय युद्ध साहित्याच्या उत्तम प्रदर्शनामुळे, येत्या काही दिवसांत हा शस्त्रास्त्र निर्मिती आणि विक्रीचा व्यवसाय खूप भरभराटीला येईल यात काही शंका नाही. ही लढाई एकदा संपली की आपली प्रगती सुरू होणार आहे. तर बघू या आता किती लवकर आपण या शत्रूचा निपात करतो आणि भारत पुन्हा प्रगतिपथावर पूर्ण शक्तिनिशी येतो ते आपल्याला बघता येईल. तोपर्यंत आपला आपल्या सरकारवर दृढ विश्वास असला पाहिजे आणि आपल्या देशभक्तीला प्रणाम करत एकच म्हणेन जय हिंद!!





चंद्रशेखर नेने 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121