जावं की न जावं, इतकाच प्रश्न!

    30-Apr-2025
Total Views | 12

जावं की न जावं, इतकाच प्रश्न!

पहलगामसारख्या हत्याकांडानंतर तेथे निव्वळ मौजमजेसाठी जाण्याची कृती ही त्या निष्पाप बळींबद्दल अनादर दर्शविते. जेथे नृशंस संहार झाला आहे, तिथे काही घडलेच नाही, अशा थाटात फिरणे हे संवेदनशील मनाचे लक्षण निश्चितच मानता येणार नाही. काही महिने पर्यटक काश्मीरला गेले नाहीत, म्हणून काश्मीरवरील भारताचा हक्क संपुष्टात येणार नाही.


संवेदनशीलता हीसुद्धा सापेक्ष असते. त्यामुळेच 26 पर्यटकांच्या हत्याकांडानंतर, अनेकांनी पहलगाममध्ये जाण्यास नकार दिला आणि हॉटेलमध्ये आधीच केलेली नोंदणी रद्द केली. पण, काहीजणांना या हत्याकांडानंतरही, तेथे जाण्यात काहीच गैर वाटत नाही. म्हणून पहलगाममध्ये दि. 22 एप्रिल रोजीनंतर दोन-तीन दिवसांनीच पुन्हा अनेक पर्यटक येत असल्याच्या बातम्या आणि व्हिडिओ प्रसिद्ध झाले आहेत. त्यात हिंदी-मराठी चित्रपट अभिनेता अतुल कुलकर्णी याचाही समावेश आहे. अतुल कुलकर्णीच्या फेसबुकवरील संदेशात त्याने काश्मीर भारताचे असून त्यावर आपला हक्क दाखविण्यासाठी, तेथे पर्यटनास जाण्याबाबत आग्रह व्यक्त केला आहे. दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये भारतीय पर्यटकांनी येऊ नये, असे वाटते. त्यांच्यावर दहशत बसविण्यासाठीच पहलगाममधील हत्याकांड करण्यात आले. पण, आता आपण तेथे जाण्यास नकार दिला, तर दहशतवाद्यांचा हेतू सफल होईल. काश्मीर भारताचे आहे आणि तेथे जाण्याचा आपल्याला हक्क आहे, म्हणून आपल्यासारखेच इतरांनीही तेथे पर्यटनास यावे, असे मतही कुलकर्णीने व्यक्त केले आहे.

अतुल कुलकर्णीच्या या पोस्टने वाद उभा राहिला आहे. अनेकांनी कुलकर्णीच्या भेटीवर नापसंती व्यक्त केली आहे आणि काहींनी आक्षेपही घेतला आहे. जेथे नुकतेच इतके मोठे हत्याकांड झाले, त्या पहलगाममध्ये केवळ चार दिवसांनंतर काही घडलेच नाही, अशा थाटात मौजमजेसाठी फिरणे हे संवेदनशील मनाचे लक्षण नक्कीच मानता येणार नाही. पर्यटन हे मनाच्या प्रसन्नतेसाठी आणि सुंदर आठवणी मनात साठवण्यासाठी केले जाते. मात्र, जेथे अगदी चारच दिवसांपूर्वी अनेक निष्पाप पर्यटकांना त्यांच्या धर्मासाठी क्रूरपणे ठार करण्यात आले, तेथे कोणालाही फिरायला जाण्याची इच्छाही कशी होऊ शकते? दहशतवाद्यांचा हेतू काहीही असो, केवळ माणुसकी या नात्याने तरी ती जागा टाळणे शक्य होते. पण, इतकी संवेदनशीलता दाखविणेही या अभिनेत्याला जमले नाही. हा मुद्दा निश्चितच भावनात्मक आहे, राजकीय नव्हे. काश्मीरमध्ये जाणारे पर्यटक हे आपला राजकीय हेतू किंवा अधिकार सिद्ध करण्यासाठी जात नसतात, याची जाणीव अतुल कुलकर्णीला राहिली नव्हती. पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातीलच पाच पर्यटकांचा समावेश आहे, याचा तरी अतुल कुलकर्णी या मराठी अभिनेत्याने विचार करायला हवा होता.

आता मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारने, काश्मीरमधील 48 पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद केली आहेत. त्यामागे पर्यटकांच्या सुरक्षेचाच हेतू आहे. काश्मीरची सारी अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून असून, तेथील पर्यटनाचा हंगाम नुकताच सुरू झाला आहे, हे लक्षात घेतल्यास त्यांचा निर्णय किती कठोर आहे, ते लक्षात येईल. एक प्रकारे अतुल कुलकर्णीच्या युक्तिवादाला त्यांनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिले आहे. ओमर अब्दुल्ला हे एक राजकीय नेते आहेत. तरी विधानसभेत या हत्याकांडावर बोलताना त्यांचाही कंठ अवरुद्ध झाला होता. “काश्मीरमध्ये आलेले पर्यटक हे आपले अतिथी असून, आपण त्यांचे यजमान होतो. या अतिथींचा यथायोग्य पाहुणचार करणे आपल्याला जमले नाही आणि काहींना आपले प्राण गमवावे लागले,” याची तीव्र बोच त्यांनी, आपल्या भाषणात व्यक्त केली. अब्दुल्ला यांच्यावर यापूर्वी अनेक कारणांनी टीका झाली असली, तरी त्यांचे हे विचार आणि भाषण त्यांच्यातील संवेदनशील माणसाचे दर्शन घडविते. अब्दुल्ला हे मुस्लीम असले, तरी त्यांनी बिगर-मुस्लीम असल्यामुळे मारण्यात आलेल्या निरपराध व्यक्तींबाबत शोक व्यक्त केला. पण, तितकीही परिपक्वता दर्शविणे अतुल कुलकर्णीला जमले नाही. त्याच्यातील राजकीय अभिनिवेश जागाच राहिला.

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, हे सार्या जगास ठाऊक आहे. पण, ते सिद्ध करण्यासाठी पर्यटक तेथे जात नसतात. काश्मीरची सारी अर्थव्यवस्था याच पर्यटकांवर, त्यातही भारतीय पर्यटकांवरच अवलंबून आहे. तरीही तेथील स्थानिक काश्मिरींच्या मनात भारतीय पर्यटकांबाबत एक अढी आणि आकस आहे, हे आजही वारंवार जाणवते. ‘कलम 370’ लागू असताना, तर ते चक्क भारतीयांना परकेच मानीत. ‘कहाँ से आये हो? भारतसे?’ असा प्रश्न तेथे उघडपणे विचारला जात असे. म्हणजे त्यांना भारतीयांचा पैसा हवा आहे, पण त्यांना (आणि भारतालाही) आपले मानण्यास ते तयार नव्हते. आजही अनेक पर्यटकांनी, काश्मीरमध्ये त्यांना आलेले वाईट अनुभव सांगितले आहेत. याच बैसरण खोर्यात जाणार्या काही घोडेवाल्यांनी, हल्ल्यानंतर परतणार्या पर्यटकांकडून अतिरिक्त पैसे वसूल केल्याच्याही तक्रारी प्रसिद्ध झाल्या. तेथील काही स्थानिक काश्मिरी या दहशतवाद्यांना मदत करीत असल्याचा संशय असून, त्याचाही तपास केला जात आहे. यासंदर्भात काहीजणांना अटकही करण्यात आली आहे. म्हणूनच काश्मीर पर्यटनावर काही काळ बहिष्कार घालावा, अशी मागणी केली जात आहे, ती चुकीची म्हणता येणार नाही. ‘कलम 370’ असो की नसो, काश्मीरला पर्यटनासाठी जाणे हे एक जोखमीचेच काम आहे, हे आता स्पष्ट झाले आहे.

पूर्वी मुंबईवर दि. 26 नोव्हेंबर 2008 रोजी हल्ला झाल्यावर, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख ताजमहाल हॉटेलमध्ये पाहणीसाठी गेले होते. तेव्हा त्यांनी चित्रपट दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यालाही बरोबर नेले होते. कारण, रामगोपाल वर्मा एका चित्रपटाची आखणी करीत होता. त्या चित्रपटाच्या पटकथेसाठी, उद्ध्वस्त ताजमहाल हॉटेलची त्याला पाहणी करायची होती. या घटनेने सामान्य माणसांमध्ये संतापाची लाट उसळली होती. जेथे इतका मोठा नरसंहार झाला, ती जागा देशमुख आणि वर्मा यांना काय पर्यटनस्थळ वाटली, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. विलासरावांना त्यामुळे पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. काश्मीरमध्ये सध्या पर्यटनाला जाण्यास विरोध होण्यामागेही हाच संदर्भ आहे. पण, ते कळण्याइतकी संवेदनशीलता या नटाकडे नाही का, असाच प्रश्न उपस्थित होतो.

राहुल बोरगांवकर
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121