ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या मुलाखतीने होणार व्याख्यानमालेचे उद्धाटन
12-Apr-2025
Total Views |
मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्षेत्राचे क्षितीज विस्तारणारी आणि नव्या विचारांची ओळख लोकांना करुन देणाऱ्या वसंत व्याख्यानमालेची सुरुवात आज दि. १२ एप्रिल पासून होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची मुलाखतीने या व्याख्यानमालेची सुरुवात होणार असून, राजीव जोशी आणि नेहा खरे अभिनेते अशोक सराफ यांच्या कला जीवनाचा प्रवास उलगडणार आहेत.
अमर हिंद मंडळाच्या ७८ व्या वसंत व्याख्यानमालेत अनेक मान्यवर विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. दि. १३ एप्रिल रोजी मुंबई मनपाचे आयुक्त भूषण गगराणी मुंबईच्या भवितव्यावर आपले मत मांडणार आहेत. दि. १४ एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महामार्ग विकासाचा या विषयावर श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. सुप्रसिद्ध लेखक आणि पत्रकार रवि आमले दि. १५ एप्रिल रोजी रॉ: गुप्तचर यंत्रणा आणि आपण या विषयी रंजक माहिती देणार आहेत. दि. १६ एप्रिल रोजी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू ' भारत महासत्ता बनताना ' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दि. १७ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती मृदुला भाटकर 'कोर्टाची पायरी आणि नागरिक' या विषयावर श्रोत्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दि. १८ एप्रिल रोजी मृदुला दाढे निवडक हिंदी आणि मराठी संगीतकारांच्या शैलींचे विश्लेषण आपल्या ' तरी असेल गीत हे!' या कार्यक्रमात करणार आहेत.
दादार पश्चिम इथल्या अमरवाडी येथे ही वसंत व्याख्यानमाला पार पडणार असून, या व्याख्यानमालेला लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.