आसिफ मन्सुरीला फाशी द्या

- आ. निरंजन डावखरे यांच्यासमवेत नागरिकांची पोलीस ठाण्यावर धडक

    10-Apr-2025
Total Views |
 
Asif Mansoori mumbra case
 
ठाणे: ( Asif Mansoori mumbra case ) मुंब्य्रात दहा वर्षीय मुलीवर अत्याचार करून धारदार शस्त्राने हत्या करीत तिला सहाव्या मजल्यावरून खाली फेकणार्‍या नराधम आसिफ मन्सुरी याच्या घृणास्पद कृत्याचे सर्वत्र पडसाद उमटत असून संताप व्यक्त होत आहे. भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आ. निरंजन डावखरे यांच्या समवेत शेकडो नागरिकांनी बुधवार, दि. ९  एप्रिल रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात धडक दिली.
 
तसेच, हा खटला जलदगती न्यायालयात चालवून नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी आ. डावखरे यांनी मुंब्य्रातील ड्रग्ससह अवैध कृत्यांचा पाढाही पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे यांच्यासमोर वाचला.मुंब्य्राच्या ठाकूरपाडा परिसरात सोमवार, दि. ७ एप्रिल रोजी २० वर्षीय आसिफ मन्सुरी याने दहा वर्षीय मुलीचे अपहरण करून अत्याचार करीत तिला सहाव्या मजल्यावरून खाली फेकल्याची संतापजनक घटना घडल्यानंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. माणुसकीला काळिमा फासणार्‍या या घटनेच्या निषेधार्थ मुंब्य्रात शेकडोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले.
 
आ. निरंजन डावखरे यांनी तातडीने मुंब्र्यात धाव घेत पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच आरोपीला कठोरात कठोर अशी फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी उपायुक्त बुरसे यांच्याकडे केली.
 
या घृणास्पद घटनेबाबत लोकांमध्ये तीव्र आक्रोश असून, अशा घटना समाजात घडू नयेत, म्हणून ठोस पावले उचलण्याबाबत आ. डावखरे यांनी चर्चा केली. जनभावनेचा आदर करत, अशा प्रकारच्या घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत, याकरिता उपाययोजना करण्याची मागणी आ. डावखरे यांनी उपायुक्त सुभाष बुरसे यांच्याकडे केली.
 
यावेळी ठाणे जिल्हा भाजप सरचिटणीस कुणाल पाटील, मनोहर सुगदरे, भाजप महिला मोर्चाच्या ठाणे अध्यक्षा स्नेहा पाटील, नाग्या तांबोळी आदींसह भाजपच्या महिला कार्यकर्त्या आणि मुंब्य्रामधील रहिवासी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.