संस्कृत ही आपली प्राचीन भाषा असून, ‘देववाणी’ म्हणून तिचा गौरव केला जातो. एवढेच नव्हे, तर जगातील भाषांपैकी सर्वात प्राचीन म्हणूनही तिचे स्थान आहे. संस्कृत भाषेतील साहित्य हा भारतीयांचा ऐश्वर्य ठेवा आहे. संस्कृत काव्ये आणि नाटके, कवी आणि नाटककार यांच्या साहित्यकृतीने, भारतीय संस्कृतीला समृद्ध, संपन्न केलेले आहे. संस्कृत नाटककारांमध्ये भास यास, ‘आदि नाटककार’ मानले जाते. त्याची 13 नाटके प्रसिद्ध आहेत. त्या नाट्यचक्रातील ‘प्रतिमा’ आणि ‘अभिषेक’ अशी दोन नाटके, रामकथेवर आधारित आहेत. ही दोन्ही सुखान्त नाटके रामराज्याभिषेकाने समाप्त होतात. रामायणाचे एक वेगळे साहित्यदर्शन या नाटकातून घडते.
संस्कृत भाषेची थोरवी अगाध आहे. संस्कृत विश्वातील सर्वात प्राचीन भाषा असून, अनेक भाषांची जननी आहे. संस्कृत काव्यग्रंथ, संस्कृत नाटके यांची स्तुती, प्रशंसा, देशोदेशीच्या विद्वान रसिक अभ्यासक व संशोधकांनी केलेली आहे. जर्मन कवी गटे महाकवी कालिदासाच्या ‘शाकुंतल’ने एवढा वेडा झाला होता की, ते संस्कृत नाटक डोक्यावर घेऊन तो नाचला होता, असे म्हणतात. विदेशांमध्ये असे अनेक गटे आहेत की, जे संस्कृत काव्य, नाटकांनी, ज्ञान ठेव्याने प्रभावित झालेले आहेत. संस्कृत वर्णमाला, जगातील सर्वाधिक वैज्ञानिक आणि शास्त्रीय वर्णमाला आहे. संस्कृतला ‘देववाणी’ तसेच ‘अमरभाषा’ म्हटले जाते. संस्कृत भाषेतील ‘ऋग्वेद’ ग्रंथाला, जगातील पहिल्या साहित्यरचनेचा मान आहे. विद्वान अभ्यासक मॅक्समुलर याने, महाराणी एलिझाबेथला जगातील पहिला, सर्वाधिक प्राचीन ग्रंथ म्हणून ‘ऋग्वेद’चा गौरवाने परिचय करून दिलेला होता. भारतातील सनातन हिंदू, जैन, बौद्ध या धर्माचे मुख्य धर्मग्रंथ संस्कृत आहेत. संस्कृत साहित्यवर्णन विशाल व विविधतापूर्ण आहे. जगातील पहिली ज्ञानभाषा म्हणून, संस्कृतचा गौरव करावा तेवढा थोडा आहे.
संस्कृत काव्य परंपरेप्रमाणे, संस्कृत नाटकांना प्रदीर्घ परंपरा आहे. कवीकुलगुरू कालिदास, बाण, भवभूती, शूद्रक, राजशेखर, विशाखादत्त, हर्षवर्धन या थोर नाटककार परंपरेचा नाटककार भास हा मेरूमणी, शिरोमणी आहे. भास याला संस्कृत नाट्यसृष्टीचा जनक मानले जाते. भास या शब्दाचा अर्थ ‘तेज’ आहे. तेजोनिधी म्हणूनच सूर्याला भास्कर म्हणतात. हा बंडखोर कवी भास कुठला? त्याचे मातापिता, गुरू कोण? नेमका कार्यकाळ व स्थळ कोणते? हे सारे प्रश्न, इतिहासात आजही अनुत्तरीत आहेत. कोणी त्याला इसवी सन पूर्व काळातील मानतात, तर कोणी चक्क इसवी सनाच्या सातव्या शतकातील मानतात. आश्चर्य म्हणजे, इ. स.1913 पर्यंत या जगविख्यात आदि नाटककाराची एकही नाटक संहिता उपलब्ध नव्हती. कालिदास आदि थोर कवीकुलगुरुंनी, भास याची प्रशंसा केलेली होती. त्यामुळे याचे आद्य नाटककार म्हणून नाव, सर्वत्र परिचित होते. पण, त्याच्या नाटकाच्या संहिता, केरळमधील एका विद्वानास इ. स. 1909 मध्ये सापडल्या आणि एक अपूर्व ऐतिहासिक अक्षरठेवा साहित्यविश्वाला लाभला.
एवढ्या मोठ्या थोर नाटककारांची नाट्यसंपदा संहिता, केरळच्या माणसाला कशा सापडल्या? त्याची आश्चर्यकारक कथा थक्क करणारी आहे. केरळमधील सांस्कृतिक सोहळ्यातील मेळ्यामध्ये, नाटककार भासच्या नाटकातील निवडक अंक ‘च्याकर’ नावाचे लोककलाकार, अनेक वर्षे अनेक पिढ्या सादर करीत होते. पण, ही नाटके भास याची आहेत, हे त्यांना ज्ञातच नव्हते. कारण, त्या नाटकाच्या संहितावर नाटककाराचे नाव नव्हते. इ. स. 1912 साली थोर विद्वान व्यासंगी टी. गणपतीशास्त्री यांना, संस्कृत भाषेतील पण मल्याळम् लिपीत लिहिलेली 300 वर्षे जुनी ताडपत्रे, हस्तलिखिते सापडली. त्या 300 ताडपत्रांमध्ये 13 नाटकांच्या संहिता होत्या. ती अभ्यासल्यावर, गणपतीशास्त्रींना ही सर्व नाटकं एकाच नाटककाराची आहेत, हे लक्षात आले. त्यामध्ये एक नाटक ‘स्वप्नवासवदत्ता’ होेते. नवव्या शतकातील नाटककार राजशेखर याने, ‘स्वप्नवासवदत्त’ हे भास याचे नाटक असल्याचा उल्लेख केलेला होता. त्यावरून ही सारी सापडलेली 13 नाटके, नाटककार भास यांची असल्याचे सिद्ध झाले आणि एक दुर्मीळ साहित्यठेवा हाती लागला. या अपूर्व कार्याबद्दल टी. गणपतीशास्त्री यांचा, जर्मनमधील विद्यापीठाने ‘डॉक्टरेट’ किताब देऊन गौरव केला. ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ यांनी सुवर्णपदक देऊनही त्यांना गौरवले. भारतीय विद्वत परिषदेने त्यांना, ‘महामहोपाध्याय’ पदवीने सन्मानित केले.
भासाची 13 नाटके पुढीलप्रमाणे आहेत. 1) स्वप्नवासवदत्ता, 2) प्रतिमा, 3) अभिषेक, 4)पंचरात्र, 5) मध्यामव्यायोग, 6) दूत घटोत्कच, 7) कर्णभार, 8) दूतवाक्य, 9) उरूभंग, 10) बालचरित, 11) चारूदत्त, 12) अविमारक आणि 13)प्रतिज्ञायौगंधरायण. यातील नाटकांचा मुख्यविषय ‘रामायण’, ‘महाभारत’ या कथा आहेत. या 13 पैकी पाच नाटके, एक अंकी आहेत. 13पैकी दोन नाटके ‘प्रतिमा’ आणि ‘अभिषेक’ ही रामकथेवर आधारित आहेत. ‘प्रतिमा’ नाटक करूणरस प्रधान असलेले सात अंकाचे नाटक आहे, तर ‘अभिषेेक’ हे वीररस प्रधान नाटक असून, सहा अंक आहेत. ‘प्रतिमा’ नाटक स्त्रीप्रधान असून, माता कैकई त्यातील मुख्य पात्र व विषय आहे. तर ‘अभिषेक’ नाटकामध्ये, तीन राज्याभिषेक आहेत. पहिला सुग्रीवाचा ‘किष्किंधाराज’ म्हणून राज्याभिषेक आहे. दुसरा, विभीषणाचा लंकेच्या राजपदी राज्याभिषेक आहे, तर तिसरा आणि मुख्य राज्याभिषेक सोहळा, श्रीरामाचा अयोध्येचा राजा म्हणून आहे. ‘प्रतिमा’ नाटकात रामाचा वनवास ते राज्याभिषेक असा कथा भाग आहे, तर ‘अभिषेक’ नाटक वालीवधापासून सुरू होते व रामराज्याभिषेकाच्या सोहळ्यांनी, त्या नाटकाचा सुखान्त होतो. दोन्ही नाटके सुखात्मिका आहेत. ‘प्रतिमा’ नाटकातील भास, हा कैकईचा पक्षधर आहे. कैकई ही कुटिल खलनायिका नसून, पती दशरथ आणि सावत्र पुत्र राम या दोघांचे, वचनभंगाच्या पापापासून रक्षण करणारी, रामाचे प्राण वाचवणारी, विचारी व धाडसी स्त्री आहे. या नाटकाचे मराठीत द. ग. गोडसे यांनी, ‘धाडिला राम तिने का वनी’ असे केलेले नाट्यरूपांतर प्रसिद्ध आहे.
नाटककार भास हा वत्स राज्याच्या, उदयन राजाच्या दरबारी कलारत्नांपैकी एक आहे. वत्स राज्याची राजधानी कौशांबी येथे, त्याचे वास्तव्य होते. ‘अग्निमित्र’ म्हणूनही भास ओळखला जात होता. थोर कवी जयदेव यांनी, भासाचा ‘कविता कामिनी’ असा गौरव केलेला आहे. तसेच बाणभट्ट, कालिदास अशा सर्व संस्कृत कवी महाकवींनी, भासचा गौरव करीत वंदन केलेले आहे. ‘स्वप्नवासवदत्ता’ ही भासाची सर्वश्रेष्ठ नाट्यकृती मानली जाते.
॥ जय श्रीराम ॥
विद्याधर ताठे
9881909775
(पुढील लेखात : संस्कृत नाटककार ‘भास’ याची रामपर दोन नाटकं)