शतपावली ते मॅरेथॉनचे शतक

    08-Mar-2025   
Total Views |

article on preeti lala
 
शारीरिक व्याधीवर डॉक्टरांनी दिलेला शतपावलीचा सल्ला धावण्यापर्यंत पोहोचला अन् शालेय जीवनात एकही खेळ न खेळलेल्या पन्नाशीच्या उंबरठ्यावरील प्रिती लाला यांनी तब्बल १०० मॅरेथॉन स्पर्धांचा पल्ला गाठला... त्यांचा हा अतुलनीय प्रवास ....
 
ठाण्यातील वसंतविहार येथे राहणार्‍या प्रिती लाला यांचा जन्म, १९७६ साली मुंबईत झाला. मुळ बडोद्याच्या दंडवते कुटुंबातील प्रिती या देशस्थ तर त्यांचे पती पारसी, त्यामुळे विवाहानंतर त्या प्रिती लाला बनल्या. वडिलांच्या नोकरीतील बदल्यांमुळे, प्रिती बडोद्याहून मुंबईला आल्या. मुंबईत आणि ठाण्यात प्राथमिक ते उच्चशिक्षण इंग्रजी माध्यमातून पूर्ण करून, प्रिती यांनी बी. कॉम.ची पदवी मिळवली. पदवीनंतर लागलीच त्यांना, ’एल अ‍ॅण्ड टी फायनान्स’ मध्ये नोकरी लागली. मात्र, मुलीच्या संगोपनासाठी नोकरीला रामराम ठोकून, त्यांनी घरातच शिकवणी सुरू केली. घरच्या घरी काम असल्याने, कला कलाने आयुष्य तर किलो किलोने वजन वाढू लागले. परिणामी, पायाच्या दुखण्याची व्याधीही जडली. डॉक्टरांनी उपचाराबरोबरच वजन कमी करण्यासाठी, जेवणानंतर शतपावली आणि नियमित चालण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, प्रिती चालण्याच्या व्यायामासोबतच, व्यायामशाळेमध्ये जाऊ लागल्या. शाळा ते महाविद्यालय या प्रवासात प्रिती यांनी, कधीही कुठल्याही क्रीडा प्रकारात सहभाग घेतला नव्हता. शाळेतील क्रीडा दिनाच्या दिवशीही त्या, शाळेला दांडी मारायच्या. ट्रेकिंग हा मात्र, त्यांचा आवडता छंद होता.
 
२०१३ सालाच्या सुमारास, प्रिती यांचे लक्ष ठाण्यातील एका मॅरेथॉनच्या जाहिरातीने वेधले. त्या मॅरेथॉनमध्ये, अभिनेता मिलिंद सोमण स्वतः धावणार असल्याने, त्या मॅरेथॉन मधील ६ कि.मीटरच्या फन रन मध्ये, प्रिती सहजच सहभागी झाल्या. या मॅरेथॉन स्पर्धेत काही सहकारी तसेच स्पर्धकांशी प्रिती यांचा परिचय झाला. इथेच प्रिती यांच्या आकांक्षांना धुमारे फुटले. डिसेंबर २०१३ मध्ये प्रिती यांनी, हिरानंदानी गृहसंकुलाच्या १० किमी. मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला. नुसता सहभाग घेतला नाही, तर रँकिंगमध्ये बाजी मारल्याने ,त्यांचा आत्मविश्वासही दुणावला. २०१४ मध्ये त्यांनी २१ किमी. अंतर, २ तास १० मिनिटात पार केले. त्यावेळी त्यांना, हॉकी स्टीक भेट म्हणुन मिळाली होती. त्यानंतर प्रिती यांनी, मागे वळून पाहिलेच नाही. २०१५ मध्ये मुंबईत पात्रता फेरी पूर्ण करून, ’हाफ मॅरेथॉन’ आणि नंतर ’वसई - विरार महापौर मॅरेथॉन’ स्पर्धेत, ४२ किमी स्पर्धेत महिलांच्या विशेष गटात तृतीय क्रमांक पटकावला. अनवट घाट चढून पार करावी लागणारी, ’सातारा हिल मॅरेथॉन’ अशा २०१६ पासून, तब्बल आठ (४२ कि. मी.) मॅरेथॉन प्रिती यांनी पूर्ण केल्या. बक्षिसे मिळत गेली अन प्रिती यांचा उत्साहही वाढत गेला. त्यामुळे आजपावेतो एकूण १०० मॅरेथॉन स्पर्धांचा पल्ला त्यांनी गाठला असून, ५८ पारितोषिके पटकावल्याचे प्रिती सांगतात.
 
वयाच्या ३७व्या वर्षांपासून देशविदेशात लांब पल्ल्यांच्या मॅरेथॉन त्या धावत आहेत. उटी अल्ट्रा ही दोडा बेटा पीक डोंगराळ भागातील ९० कि. मी.ची मॅरेथॉन, खडकवासल्याची १०० किमीची स्पर्धा त्यांनी, १३ तास ५९ मिनिटात पूर्ण केली. दक्षिण आफ्रिकेतील पाच डोंगर पार करणारी, अल्मेट ह्युंमन मॅरेथॉन त्या दोनदा धावल्या आहेत. एव्हरेस्ट बेस कॅम्प स्पर्धाही त्या धावल्या असून, भारत- पाकिस्तान सीमेवर असलेल्या, बॉर्डर १०० माईल्स या प्रसिद्ध ठिकाणी त्यांनी जैसलमर ते लोंगेवाला १६१ किमीची मॅरेथॉन २४ तासात पूर्ण केली. ऑस्ट्रेलियात भरवण्यात आलेल्या ओकीनिया चॅम्पियनशिपमध्ये, प्रिती २४ तास धावणार्‍या पहिल्या भारतीय महिला होत्या. जगभरातील सहा प्रमुख मॅरेथॉनपैकी बर्लिन- जर्मनी मॅरेथॉन देखील, प्रीती धावल्या आहेत.दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, तैवान या परदेशातील मॅरेथॉनमध्ये, प्रिती भारतातर्फे धावल्या आहे. मुंबईत १९३.६ किलोमीटर सतत २४ तास धावण्याचा विक्रम नोंदवताना, या स्पर्धेत त्यांनी पुरुषांनाही मागे टाकले. २०२२ मध्ये पुणे इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये प्रिती यांनी, तिसरा क्रमांक पटकावला. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर, भारताचे नाव उज्ज्वल करण्याची महत्त्वाकांक्षा प्रिती यांनी बाळगली आहे.
 
आयुष्यात काही चांगले काम करून दाखवायचे असेल, तर त्याला वयाची अट नसते. कोणत्याही वयात लोकांच्या लक्षात राहील, त्यांना प्रोत्साहन मिळेल असे कार्य करता येते, असे मानणार्‍या प्रिती यांनी स्पर्धेतून मिळालेल्या पारितोषिकाच्या रक्कमेतून, अनेक गरजुंना बुट, कर्करोग रुग्णांना साह्य तसेच महिला सक्षमीकरणासाठीही योगदान दिले आहे. शेतकर्‍यांच्या पाणी प्रश्नासाठी त्यांनी, नाशिक ते मुंबई मदत दौड काढली. आजवर स्पर्धेत पारितोषिके अनेक पटकावली, पण ठाण्यात राहून अद्याप घरचा अर्थात ठाणे शहराचा सन्मान न मिळाल्याची खंत त्यांना वाटते. छोट्या कुटुंबात मी खुश असून माझ्याकडे जे आहे त्यात आनंदी आहे, निरोगी आयुष्याकरिता, आनंदाकरिता धावत असल्याचे प्रिती सांगतात. त्यांची मुलगी मोठी झाल्यावर देखील, त्या कोचिंग क्लासेसना शिकवण्यासाठी जात असत. प्रकृती सुडौल राहावी यासाठी यासाठी त्या आजही योग करतात, तसेच योगाचे क्लासेसही घेतात. त्या सर्टीफाईड योग मार्गदर्शक असून, योगमध्ये त्यांनी पदवी मिळवलेली आहे. मॅरेथॉनचे इव्हेंट बहुधा रविवारी असतात, ते करून आठवड्यातील इतर दिवस योगसाठी देत असल्याचे प्रिती सांगतात.
 
प्रिती स्वतः महाराष्ट्रीय आणि पती पारशी असे त्यांच्या घरात दोन धर्म वेगवेगळे असले, तरी स्वयंपाकात मात्र दोन्हीकडचे पदार्थ तयार होतात. या दोन्ही रेसिपी बनवण्याची प्रिती यांना आवड असून, अशा रंजक रेसिपीवरील त्यांचे अनेक लेखही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्याचे त्या सांगतात. “घरातील महिला चांगली असेल, तर घर सुदृढ राहते. आजकाल तणावाचे जीवन आहे तेव्हा, दिवसातील किमान अर्धा तास स्वतःकरिता द्या. या अर्ध्या तासात शरीराला रिचार्ज करा, छंद जोपासा, यामुळे तणाव कमी होईल. विशेषतः महिलांनी तर हे आवर्जून करावे,” असा सल्ला प्रिती देतात. अशा या पन्नाशीच्या उंबरठ्यावरील धावपटूला जागतिक महिला दिनानिमित्त दै. ’मुंबई तरूण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
 

दीपक शेलार

वायसीएमओयू मुक्त विद्यापीठातून वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका, तसेच पदवी. 'मुंबई तरुण भारत' या प्रथितयश मराठी दैनिकात ठाणे ब्युरो चिफपदी कार्यरत. ३० वर्षांपासून वृत्तपत्रविक्रेता, गेले एक तप विविध राज्यस्तरीय, तसेच स्थानिक वृत्तपत्रे व वाहिन्यांसाठी वृत्तांकन. गड-किल्ले भ्रमंती आणि मराठी नाटक, साहित्यात रुची, नवे शिकण्याचा हव्यास.