जोरदार खडाजंगी; विधानसभा अध्यक्षांना करावा लागला हस्तक्षेप
06-Mar-2025
Total Views |
मुंबई: ( gulabrao patil and aditya thackeray ) उबाठा गटाचे युवराज आदित्य ठाकरे आणि पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्यात बुधवार, दि. ५ मार्च रोजी विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली. “गुलाबरावांना मंत्री म्हणून अभ्यास करून यायला सांगा,” अशी मागणी आदित्य यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली.
त्यावर गुलाबराव पाटील यांनी तत्काळ “यांच्या बापाला कळले होते म्हणून त्यांनी मला हे खाते दिले होते,” अशा शेलक्या शब्दांत त्यांची कानउघाडणी केली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये भूजल नायट्रेटचे प्रमाण रोखण्याबाबतचा प्रश्न आ. रोहित पवार यांनी उपस्थित केला. या प्रश्नावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी सविस्तर उत्तर देताना आदित्य ठाकरे उभे न राहता बसूनच काही प्रश्न विचारत असल्याने पाटील संतापले आणि त्यांना “तुम्ही शांत बसा, तुम्ही शांत बसा,” असा दम भरला. त्यावर आदित्य बोलण्यासाठी ताडकन उभे राहिले. अध्यक्षांनी मात्र मध्यस्थी करत विषय मिटवण्याचा प्रयत्न केला आणि “आपण आपसांत बोलू नका. इथे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे बघून बोला,” असे आमदार आणि मंत्र्यांना सांगून आदित्य ठाकरे यांना खाली बसवले.
आपले उत्तर पूर्ण करण्यापूर्वी पाटील यांनी आमदारांना सांगितले की, “तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कृषिमंत्री, पर्यावरणमंत्री यांच्याशी एक बैठक लावू आणि काही पर्याय निघतो का ते पाहू,” असे आश्वासन दिले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी याच विषयाला पुन्हा हात घातला. ते म्हणाले, “आम्ही विरोधी पक्षात असलो, तरी काही चांगले करायचे असेल, तेथे सहकार्य करू.” मंत्र्यांनी उत्तरात सांगितले की, “अन्य खात्यांसोबत बैठका लावू. याचा अर्थ यांना (गुलाबराव पाटील) खाते कळते आहे की नाही?” “मंत्री सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनाही उत्तरे देऊ शकत नाहीत, त्यामुळे हा प्रश्न राखून ठेवावा आणि मंत्र्यांना अभ्यास करून उत्तर देण्याची सूचना करावी,” अशी मागणी ठाकरे यांनी अध्यक्षांकडे केली.