भारतीय खगोलशास्त्राचा अध्वर्यू निमाला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- ज्येष्ठ वैज्ञानिक, खगोल शास्त्रज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली - मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण

    20-May-2025
Total Views |
 
 renowned Astrophysicist Jayant Narlikar Passes Away at 87
 
मुंबई: ( renowned Astrophysicist Jayant Narlikar Passes Away at 87 ) भारताची विज्ञानाधिष्ठीत प्रतिमा उजळवणारा आणि खगोल शास्त्रातील महत्ता सिद्ध करणारा महान वैज्ञानिक सुपूत्र काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशी शोकभावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्भविभूषण, महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली आहे.
 
डॉ. नारळीकर यांच्या निधनाने भारतीय खगोलशास्त्राचा अध्वर्यू निमाला, असे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी त्यांना महाराष्ट्रातील नागरिकांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. डॉ. नारळीकर यांच्या कन्या श्रीमती गिरीजा यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी त्यांना सांत्वना दिली. डॉ. नारळीकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार व्हावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणाना दिले. दरम्यान, आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
 
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, 'भारतीय खगोलशास्त्राचा भक्कम पाया घालण्यात डॉ. नारळीकर यांनी अमुल्य योगदान दिले. गणितज्ज्ञ वडीलांकडून मिळालेला वारसा घेऊन डॉ. नारळीकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर खगोलीय शास्त्रातील संशोधनात मोलाची भर घातली. त्यांच्या संशोधनात्मक कार्याला जगभरातील विद्यापीठांनी, संशोधनात्मक संस्थांनी मान्यता दिली. भारतात परतल्यावर त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाने 'इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अस्ट्रोनॉमी अँड अस्ट्रोफिजिक्स (IUCAA)' "आयुका" या संस्थेच्या उभारणीची जबाबदारी सोपवली. तीही त्यांनी समर्थपणे सांभाळली. या संस्थेलाही त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र अशी ख्याती मिळवून दिली. ‘बिग-बँग थिअरी’ वर काम करत असतानाच, त्यांनी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाच्या कॉस्मोलॉजी कमिशनचे अध्यक्षपदही भूषवले.
 
सर्वात महत्वाचे म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या प्रचार-प्रसारातील डॉ. नारळीकर यांचे कार्य देखील असेच भरीव राहिले. त्यांनी विज्ञान लेखक म्हणून केलेली कामगिरी साहित्यिक दृष्ट्या अजरामर अशीच राहील. कारण त्यांनी रसाळ आणि ओघवत्या भाषेत केलेल्या लेखनामुळे नव्या पिढीत, विशेषतः किशोरवयीन मुलांमध्ये विज्ञानाची गोडी वाढीस लागली. ‘आकाशाशी जडले नाते’ असे पुस्तकरुपातून सांगणाऱ्या डॉ. नारळीकर यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेही अध्यक्षपद भूषवले होते. त्यांच्या "चार नगरांतले माझे विश्व" या आत्मचरित्रालाही साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. यातूनही त्यांच्या साहित्यकृतींचे वैशिष्ट्य आणि गुणवत्ता लक्षात यावी. डॉ. जयंत नारळीकर, पुणे या इतक्या पत्त्यावर त्यांच्याकडे लहानथोरांची शेकडो पत्र येत.
 
या पत्रातील विज्ञान विषयक शंका-प्रश्नांचे ते आवर्जून समाधान करत. निखळ वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या प्रसारासाठी ते अखेरपर्यंत निरलसपणे कार्यरत राहीले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक - भारतीय खगोलशास्त्राचे अध्वर्यू ते शाळा-महाविद्यालये-विद्यापीठांमध्ये पोहचून विज्ञान आणि त्यातील गणिती सिद्धांताच्या प्रसारासाठी झटणारा प्रसारक अशी त्यांच्या व्यक्तिमत्वाची व्यापकता होती. डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनामुळे भारतीय वैज्ञानिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. डॉ. नारळीकर यांच्या परिवारावरही आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना महाराष्ट्राच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हटले आहे.