योगाने शक्तीसंवर्धन

    04-Mar-2025
Total Views |

Strengthening with Yoga
 
( Strengthening with Yoga ) प्रत्याहार हे अष्टांग योगातील पाचवे अंग आहे. प्रत्याहार म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण मिळवणे किंवा इंद्रियांचे माघारी येणे. प्रत्याहारामध्ये इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून परावृत्त केले जाते.
 
प्रत्याहार
प्रत्याहार करण्याचे फायदे :
 
1) मन एकाग्र होते
2) शरीर आणि मन स्वच्छ आणि ताजेतवाने राहते
3) मनाला प्रसन्नता मिळते.
4) इंद्रियांवर ताबा मिळतो.
5) मन आणि इंद्रिये शांत होतात.
 
प्रत्याहार करण्यासाठी काही उपाय : डोळे बंद करून शांत ठिकाणी बसणे, योगासने व प्राणायाम करणे, षण्मुखी मुद्रा लावणे.
 
‘प्रत्याहार’ या शब्दाची रचना दोन संस्कृत शब्दांपासून झाली आहे: प्रति - याचा अर्थ ‘कडे’ असा होतो आणि आहार - याचा अर्थ ‘अन्न’ असा होतो. या प्रकरणात, अन्न म्हणजे तुम्ही तुमच्या मनाने घेतलेल्या कोणत्याही बाह्य उत्तेजनांचा संदर्भ. अति चंचल असणे आणि सर्व विषयांची आसक्ती असणे हा मनाचा प्रकृति धर्म, स्वभाव आहे आणि त्यामुळे ही चंचलता मोडून मन स्थिर करणे, ही साधना अतिशय कठीण असते, तरी अशक्य मात्र नाही. अभ्यास आणि वैराग्य यांच्या योगाने निश्चितपणे मनावर नियंत्रण ठेवता येते. आत्मतत्त्वाच्या ध्यासाने देह व हे दृश्य जगत् नश्वर, आभासमात्र आहे, अशी जेव्हा अंतःकरणाची निष्ठा होईल, तेव्हा मनाची विषयाकडे धावण्याची व चिंतन करण्याची प्रवृत्ती क्षीण होत जाईल आणि त्या प्रमाणात मन स्थिर होत जाईल.
 
चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढम्।
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्॥ (श्रीमद्भगवद्गीता अध्याय 6, श्लोक 34)
 
अर्थ : कारण, हे श्रीकृष्णा, हे मन मोठे चंचल, क्षोभविणारे, मोठे दृढ आणि बलवान आहे. त्यामुळे त्याला वश करणे, मी वार्‍याला अडविण्याप्रमाणेच अत्यंत कठीण समजतो.
त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतात
 
असंशयं महाबाहो मोनो दुर्निग्रहं चलम्।
अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते॥
(श्रीमद्भगवद्गीता अध्याय 6 श्लोक 35)
 
अर्थ : भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे महाबाहो अर्जुना, मन चंचल आणि आवरण्यास कठीण आहे, यात शंका नाही. परंतु, हे कुंतीपुत्र अर्जुना, हे मन अभ्यासाने आणि वैराग्याने ताब्यात येते. थोडक्यात, अभ्यासाचे उदाहरण बघितल्यास सकाळी उठून गरम गरम चहा पाहिजे. त्याचा त्याग करण्यास प्रथम त्याचे फायदे आणि तोटे बघा. एक तर ते भारतीय पेय नाही. गरज फक्त गरम पाण्याची आहे. त्यात तुम्ही सूंठ, वेलची, लवंग, दालचिनी, अल्प मिरी पूड, थोडा गुळ घालून उकळा आणि फुंकर घालीत प्या. त्याची तुमच्या शरीराला गरज आहे. सर्दी, पडसे, खोकला, ताप आणि हृदयविकार यांवर ते उत्तम औषध आहे. मग मी चहा कशाला पितो, हा प्रश्न स्वतःला विचारा. समर्पक उत्तरच नाही. मग मी दिवसभर थोड्या थोड्या वेळाने खळखळ उकळलेला चहा पिऊन शरीराचे पित्त का वाढवतो? कारण, चहा कसा बनवायचा हेच आम्हाला माहीत नाही आणि दिवसभर रोगांना आमंत्रण देत बसतो. अशी प्रत्येक विषयाची पृथक्करणात्मक चिकित्सा करून आपण त्या त्या विषयांपासून मौजमजेचा भाग सोडून प्रत्याहार करू शकतो. मग त्या विषयाची उणी बाजू लक्षात येताच आसक्ती कमी होऊन वैराग्य साधते. हा अभ्यासाचा आणि चिंतनाचा विषय अवलंबून आपली शक्ती वाचवून, ती सकारात्मक गोष्टींकडे खर्च करता येते व जीवनात पावित्र्यता, आत्मविश्वास आणि आंतरिक शक्तीचा विकास साधता येतो व नकारात्मकता कमी होते.
 
उपाय
 
1) ध्यान-1 म्हणजे श्वासावर एकाग्र होण्याचा अभ्यास करा.
2) ध्यान-2 म्हणजे विचारांमागे न फिरता मनाची शून्यस्थिती प्राप्त करा.
3) आसने व प्राणायाम शरीराचे तप म्हणून स्वीकारा, ज्याने मन संयमन साधते.
4) संतोष हा नियम पाळा. (आपल्या समोरील परिस्थितीचे पृथक्करण करून आपल्या अधिपत्याखालील भागावरच काम करा.)
5) ईश्वर प्रणिधान : कर्म समर्पण करण्याची सवय जोडा.
 
 
- डॉ. गजानन जोग 
( लेखक योगोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशक आहेत. ) 9730014665