गुहागरचा पहिला मान; समुद्री कासवाची यंदाची पहिली पिल्ले गुहागरमधून समुद्रात रवाना

    04-Jan-2025   
Total Views |
 guhagar beach
 
 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील यंदाच्या समुद्री कासव विणीच्या हंगामातील पहिले पिल्ले शनिवार दि. ४ जानेवारी रोजी रत्नागिरीतील गुहागरच्या किनाऱ्यावरुन समुद्रात रवाना झाली (guhagar beach).यंदाच्या सागरी कासवांच्या विणीच्या हंगामातील कोकण किनारपट्टीवरील पहिले घरटे गुहागरमध्ये नोव्हेंबरमध्ये सापडले होते (guhagar beach). त्यामधून बाहेर पडलेल्या काही पिल्लांना शनिवारी समुद्रात सोडण्यात आले. (guhagar beach)
 
 
कोकणकिनारपट्टीवर समुद्री कासवांनी अंडी घालण्यासाठी सुरुवात केली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन सागरी जिल्ह्यांमध्ये दरवर्षी सागरी कासवांची वीण होते. वन विभागाच्या नोंदीनुसार रायगड जिल्ह्यातील ४, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी १५ किनाऱ्यांवर कासवांची घरटी सापडतात. समुद्री कासवांमधील 'ऑलिव्ह रिडले' प्रजातीच्या माद्या कोकणात अंडी घालण्यासाठी येतात, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही किनाऱ्यांवर ग्रीन सी कासवांची घरटी देखील सापडली आहेत. महाराष्ट्रातील सागरी कासवांची सर्वात जास्त घरटी ही गुहागरच्या किनाऱ्यावर आढळतात. सहा किलोमीटर लांबीच्या या किनाऱ्यावर गेल्यावर्षी २९८ घरटी आढळून आली होती. अशा परिस्थितीत यंदाच्या हंगामातील पहिले घरटे १५ नोव्हेंबर रोजी सकाळी गुहागरच्या किनाऱ्यावर आढळून आले होते. त्यामधील अंड्यांना कासवमित्रांनी संरक्षित केले होते.

guhagar beach 
 
गुहागरच्या किनाऱ्यावर बाग, वरचा पाट आणि खालचा पाट याठिकाणी समुद्री कासवांसाठी हॅचरी तयार करण्यात आल्या आहेत. या किनाऱ्यावर सात कासवमित्रांकडून संरक्षणाचे काम केले जाते. समुद्री कासवाच्या मादीने किनाऱ्यावर खड्डा करुन त्यामध्ये टाकलेली अंडी ही कासवमित्रांकडून हॅचरीमध्ये संरक्षित करण्यात येतात. अशाच प्रकारे संरक्षित केलेल्या घरट्यामधून शनिवारी पहाटे २७ पिल्ले बाहेर पडली. जी कासवमित्रांनी सुखरुपरित्या समुद्रात सोडली. कासवांच्या अंडी उबवणीचा काळ हा ५० ते ६० दिवसांचा असतो. उबवणीच्या प्रक्रिया बाहेरील तापमानावर अवलंबून असते.
 
 
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.