कसे आहे खारघरचे भव्य इस्कॉन मंदिर? जे आशियात आहे दुसऱ्या क्रमांकावर
15-Jan-2025
Total Views | 180
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (ISKCON temple Kharghar) आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे ओळखले जाणारे इस्कॉन मंदिर नवी मुंबईच्या खारघर येथे तयार झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बुधवार, दि. १५ जानेवारी रोजी लोकार्पण होत आहे. मंगळवारी मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. गेल्या १२ वर्षांपासून मंदिर उभारणीचे कार्य प्रगतीपथावर होते. भगवान श्रीकृष्णाला समर्पित या भव्य मंदिराचे नाव श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिर असे आहे. हे मंदिर एकूण ९ एकरमध्ये पसरलेले आशियातील दुसरे सर्वात मोठे इस्कॉन मंदिर असल्याचे सांगितले जात आहे.
खारघरच्या सेक्टर २३ मध्ये असलेल्या या इस्कॉन मंदिरचा उद्घाटन सोहळा ९ जानेवारीपासून सुरू झाला आहे. मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यापर्यंत उत्सव चालेल. त्यानंतर १६ जानेवारीपासून भाविकांना मंदिरात दर्शन घेता येईल. मंदिराच्या उद्घाटनापूर्वी विशेष धार्मिक कार्यक्रम आणि यज्ञविधी करण्यात आले. बुधवारी मंदिराच्या उद्घाटनासोबतच पंतप्रधान मोदी सांस्कृतिक केंद्र आणि वैदिक संग्रहालयाची पायाभरणी करणार असल्याचे मंदिराचे विश्वस्त आणि प्रमुख डॉ.सूरदास प्रभू यांनी सांगितले.
पांढऱ्या आणि तपकिरी संगमरवराच्या खास दगडांनी बांधलेले हे भव्य मंदिर आहे. या मंदिराच्या उभारणीसाठी आजवर २०० कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती आहे. मंदिराचा मुख्य भाग भगवान श्रीकृष्णाच्या थ्रीडी पेंटिंगने सजवण्यात आला आहे. त्याचबरोबर दशावतार मंदिराचे दरवाजे चांदीचे आहेत. ज्यावर गदा, शंख, चक्र आणि ध्वजाच्या सुवर्ण प्रतिमा कोरलेल्या आहेत. मंदिराच्या ९ एकर जागेपैकी ५-६ एकर जमीन निसर्गसंपदेने नटलेली आहे.
या मंदिरात तीन हजार भाविकांना एकत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय येथे येणाऱ्या भाविकांसाठी रविवारी मोफत प्रसादाचीही व्यवस्था आहे. इस्कॉनची जगभरात सुमारे ८०० मंदिरे आहेत. मात्र नवी मुंबईतील हे मंदिर एकमेव असे मंदिर असेल जिथे इस्कॉनचे संस्थापक स्वामी श्रील प्रभुपाद यांचे स्मारक असेल. ग्लोरी ऑफ महाराष्ट्र प्रकल्पाअंतर्गत हे मंदिर बांधण्यात आले आहे.