मुंब्रा-दिवा रेल्वे अपघातावर राज ठाकरेंचा संताप! म्हणाले, "आपण कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचे..."

    09-Jun-2025
Total Views |
 
Raj Thackeray
 
मुंबई : शहरांबद्दल बोललेल्या गोष्टींना आपल्याकडे किंमत नाही. आपण कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचे हेच या समजेनासे झाले आहे, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंब्रा-दिवा रेल्वे अपघातावर संताप व्यक्त केला. सोमवार, ९ जून रोजी पत्रकार परिषद घेत त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली.
 
राज ठाकरे म्हणाले की, "मुंबईच्या रेल्वेमध्ये रोजच्या रोज अपघात होतात. मुंबईकरांनी अनेकदा केंद्र सरकारला रेल्वे मंडळ वेगळे करा असे सांगितले. पण अजूनही त्यासाठी काही होत नाही. हा विषय नुसता रेल्वेपुरता मर्यादित नाही. आपल्या सगळ्या शहरांचा विचका झाला आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली रस्ते नाहीत. सगळीकडे उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत. रस्ते नसल्याने पार्किंगची व्यवस्था नाही. पार्किंगची व्यवस्था नाही म्हणून ट्राफिक अडते. मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या अनेक ठिकाणी जर समजा कुठे आग लागली तर फायर ब्रिगेडचा बंब आत जाऊ शकत नाही, अशी आपल्या शहरांची अवस्था झाली आहे. टाऊन प्लॅनिंग नावाची आपल्याकडे काही गोष्टच नाही. आपल्या शहरांवर आदळणाऱ्या बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांमुळेच रेल्वे कोलमडली आहे. रेल्वेचा आणि ट्राफिकचा बोजवारा उडालेला आहे," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  मुंब्रा–दिवा रेल्वे मार्गावरील घटना मन सुन्न करणारी : मंत्री आशिष शेलार
 
फक्त मेट्रो आणि मोनोरेलने प्रश्न सुटणार नाहीत!
 
"लोकांना चालायला फुटपाथ नाहीत. वाहनांसाठी रस्ते नाहीत. फक्त मेट्रो आणि मोनोरेलने प्रश्न सुटणार नाहीत. मुंबईत मेट्रो आहे, मोनोरेल आहे. परंतू, गाड्यांचे रजिस्ट्रेशन थांबले का? दुचाकी, चारचाकी येतातच आहेत. मग नक्की मेट्रो आणि मोनोरेल कोण वापरत आहे? कुणी पाहायला तयार नाही. सगळेजण फक्त निवडणूका आणि प्रचार यातच गुंतले आहेत. शहरे म्हणून याकडे कोणी बघायला कुणी तयार नाही. शहरांबद्दल बोललेल्या गोष्टींना किंमत नाही. आपण कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचे हेच या समजेनासे झाले आहे. केंद्र सरकारने या गोष्टींकडे तातडीने लक्ष द्यायला हवे. लोकलमध्ये प्लॅटफॉर्मवर जर रोजची गर्दी पाहिली तर लोक आत कसे शिरतात, कसे बाहेर पडतात ते कळत नाही. मीसुद्धा रेल्वेने प्रवास केला आहे. त्यावेळी गर्दी कमी असायची. आता संध्याकाळी मुंबईचा रेल्वेचा प्लॅटफॉर्म बघा. ट्रेनच्या आतमध्ये शिरून दाखवा. त्यानंतरही त्या सगळ्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर ते स्मित हास्य असते ते सगळे विलक्षण आहे," असे ते म्हणाले.
 
रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा कशाला?
 
"रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा का द्यावा? त्यापेक्षा त्यांनी तिकडे जाऊन तिथे काय चाललंय ते बघावं. ते सुधारावं. लोकल ट्रेनमध्ये किती गर्दी असते. लोकलला दरवाजे बसवले तर लोक आत गुदमरुन मरतील. लोकलला एक जागा बाहेर पडण्यासाठी एक जागा आत जाण्यासाठी पाहिजे. पण असे काहीही नाही. जिथून आत जातात तिथूनच बाहेर पडतात. आपल्या देशात माणसाची किंमतच नाही. हीच घटना जर जगात कुठेही घडली असती तर ते याकडे कसे बघतात? सगळे मंत्री वगैरे परदेशात जातात. ते तिथून काय घेऊन येतात. तुम्ही तिकडच्या रेल्वे आणू नका पण विचार तरी आणा," असेही राज ठाकरे म्हणाले.