'ओशन' ठरतोय सागरी प्रदूषण बंदीची मात्रा; 'जळके तेल' विकून मच्छीमारांना मिळतोय रोजगार

    11-Jan-2025
Total Views |
fisherman


रत्नागिरी (अक्षय मांडवकर) -
मच्छीमारांनी बोटींमध्ये वापरल्यानंतर उरलेले इंजिन ऑइल खरेदी करुन त्याद्वारे रोजगार देऊन सागरी प्रदूषणावर रोख बसविण्याचा प्रयत्न 'ओशन ऑईल कलेक्शन एन्व्हॉर्यमेंटल अॅक्शन नेटवर्क' (ओशन) या प्रकल्पाच्या माध्यमातून होत आहे (sustainable solutions for fisherman's). पुण्यातील 'गोखेल इन्स्टिट्यूट आॅफ पाॅलिटिक्स अॅण्ड इकाॅनाॅमिक्स'च्या (जीआयपीई) 'सेंटर फाॅर सस्टेनेबल डव्हल्पमेंट'कडून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये राबविण्यात येणारा हा अनोखा प्रकल्प चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरला आहे (sustainable solutions for fisherman's). या प्रकल्पाच्या आजवरच्या निष्कर्षांचे सादरीकरण रत्नागिरीमध्ये सुरू असलेल्या सागर महोत्सवामध्ये करण्यात आले. (sustainable solutions for fisherman's)


रत्नागिरीत 'आसंमत बेनोव्हलन्स फाऊंडेशन'च्या पुढाकाराने तीन दिवसीय सागर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये समुद्राविषयीच्या अनेक प्रश्नांविषयी उहापोह करण्यात येत आहे. याठाकिणी 'जीआयपीई' आणि 'एस.एल.किर्लोस्कर फाऊंडेशन'च्या माध्यमातून सुरू असलेल्या 'ओशन' या प्रकल्पाची माहिती देण्यात आली. मच्छीमार हे बोटीमध्ये लुब किंवा इंजिन ऑइल टाकतात. विहित कालावधीनंतर हे इंजिन ऑइल बदलावे लागते. अशावेळी वापरलेले इंजिन ऑइल म्हणजेच वंगण तेल बहुतांश मच्छीमारांकडून समुद्रात फेकले जाते. ज्यामुळे सागरी प्रदूषण वाढते. 'ओशन' या प्रकल्पासाठी २०२३ साली केलेल्या सर्वेक्षणामध्ये समोर आले आहे की, एका मोठ्या जहाजामध्ये १५ लीटर इंजिन आॅईल भरले जाते. त्यापैकी १० लीटर वंगण तेल ज्याला जळके आॅईलही म्हणतात, ते वापरानंतर उरते. तर छोट्या बोटींमध्ये ७.५ लीटर इंजिन आॅईल भरल्यानंतर त्यातून ६.७ लीटर वंगण तेल उरते. आता महाराष्ट्रात सुमारे १९ हजार नोंदणीकृत जहाजे आहेत आणि या जहाजामधून वापरण्याजोगे न राहिलेले किमान सहा लाख लीटर वंगण तेल हे समुद्रात टाकले जात आहे.

या समस्यवेर उपाय काढण्यासाठी 'ओशन' प्रकल्पाअंतर्गत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ११ बंदरांवरील मच्छीमारांकडून वंगण तेल हे वीस रुपये प्रती लीटर दराने विकत घेतले जात आहे. विकत घेतलेले हे तेल पुण्यातील एका कंपनीला विकण्यासाठी पाठविण्यात येत आहे. यामुळे मच्छीमारांना रोजगार देखील मिळतो आहे आणि यापूर्वी समुद्रात जाणाऱ्या तेलाचा पुनर्वापर देखील होत आहे. याविषयी 'जीआयपीई'च्या 'सेंटर फाॅर सस्टेनेबल डव्हल्पमेंट'चे प्रमुख गुरुदास नूलकर यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना सांगितले की, "महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांच्या अधिन राहून आम्ही वंगण तेल गोळा करणारी संकलन केंद्र तयार केली आहेत. पुनर्वापर करुन तयार झालेले तेल हे बाॅयलर इंधन आणि इतर लुब्रिकेशन उद्देशांमध्ये वापरण्यात येते. हा प्रकल्प महाराष्ट्रातील इतर किनारी जिल्ह्यांमध्ये राबविण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मत्स्यव्यवसाय विभागाशी देखील यासाठी संपर्क साधणार आहोत."
रोजगारही मिळाला आणि प्रदूषणही रोखले
'ओशन' या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही गेल्या दोन महिन्यांमध्ये ५०० लीटर वंगण तेलाचे संकलन केले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मच्छीमारांना रोजगाराची शाश्वत संधी मिळाली आहेच. शिवाय सागरी प्रदूषण रोखण्यात यश मिळाले आहे. - पूजा साठ्ये, रिसर्च असोसिएट, सेंटर फॉर सस्टेनेबल डव्हल्पमेंट