देशातील गुजरात, झारखंड, कर्नाटकसह शेजारच्या अस्थिर बांगलादेशमध्येही गणेशोत्सवाला गालबोट लावण्याचे संतापजनक प्रकार विघ्नसंतोषी मंडळींकडून घडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हिंदूंच्या सण-उत्सवांवर हल्ले करुन, समाजात तेढ निर्माण करणार्या कट्टरतावाद्यांना आजन्म लक्षात राहील, असा धडा शिकवायलाच हवा.
लोहरदगा : गणेशभक्तांवर हल्ला
देशभर सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु असताना, या उत्सवामध्ये मीठाचा खडा टाकण्याचे काम देशाच्या काही भागांत काही हिंदूविरोधी समाजकंटकांकडून होत असल्याच्या घटना घडत आहेत. गुजरात, कर्नाटक, झारखंड आदी राज्यांमध्ये अशा घटना घडल्या आहेत. झारखंडमधील लोहरदगा येथे असाच प्रकार घडला. तेथील वाल्मिकीनगर भागातील गणेश पूजा समितीच्या कार्यकर्त्यांवर स्थानिक मुस्लीम समाजाच्या काही लोकांनी हल्ला केल्याने दोन समुदायांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. गणेशोत्सवाचा मंडप कोठे उभा करावयाचा यावरून तणाव निर्माण झाला होता. जागेसंदर्भात तोडगाही काढण्यात आला होता. पण, घटनास्थळावरून पोलीस व प्रशासकीय अधिकारी निघून गेल्यानंतर 25 ते 30 जणांच्या जमावाने घटनास्थळी असलेल्या आयोजकांवर हल्ला केला. त्यामध्ये सहा लोक जखमी झाले. या गुंडांनी गणेश मंडपाच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक केली. तसेच पट्ट्यांनी मारझोड केली. दोन्ही समाजांत निर्माण झालेले तणावाचे वातावरण लक्षात घेऊन पोलिसांनी त्या भागात ध्वजसंचलन करून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पण, प्रशासनाने ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली, त्यावरून हिंदू समाजाचे कार्यकर्ते अत्यंत नाराज झाले होते. हिंदू समाजावर काँग्रेस - झारखंड मुक्ती मोर्चाच्या राज्यात सातत्याने हल्ले होत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. हिंदू आणि हिंदू समाजाचे उत्सव हे या राज्यामध्ये सुरक्षित नाहीत, असा आरोपही भाजपने केला आहे. लांगूलचालन आणि मतपेढीच्या मोहापायी आंधळे झालेल्या हेमंत सोरेन सरकारकडून धार्मिक अराजकतेला प्रोत्साहन दिले जात आहे, असे भाजपने म्हटले आहे. हिंदू सणांच्या वेळी अडथळे आणण्याचे प्रकार देशाच्या अन्य भागांप्रमाणे झारखंडमध्येही घडले आहेत, हे या उदाहरणावरून लक्षात यावे.
विजयपूर महापालिकेत अखेर श्रींची स्थापना
विजयपूर महापालिकेच्या कार्यालयात दरवर्षी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. पण, यंदाच्या वर्षी महापालिकेचे आयुक्त विजयकुमार मेक्कालाकी, महापौर मेहजबीन होर्टी, उपमहापौर दिनेश हळी यांपैकी कोणीही या उत्सवासाठी पुढाकार घेतला नाही. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने कदाचित विजयपूरच्या काँग्रेस नेत्यांनी अनास्था दाखविली असावी. दरवर्षी तेथील कर्मचारीवर्ग आपले एक दिवसाचे वेतन वर्गणीसाठी देऊन हा उत्सव जोरात साजरा करीत आला आहे. सत्यनारायण पूजा, महाप्रसाद यांचेही आयोजन या निमित्ताने केले जात असे. पण, यावेळी प्रशासनाची उदासीनता दिसून आली. ती उदासीनता धाब्यावर बसवून अखेर विजयपूर महापालिकेच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर मध्यरात्री उशिरा गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. शासनाची ही उदासीनता लक्षात घेऊन महापलिकेच्या अनेक नगरसेवकांनी सर्व सूत्रे आपल्या ताब्यात घेतली आणि गणेशमूर्तीची स्थापना केली. कित्येक वर्षांची परंपरा लक्षात घेऊन या मूर्तीची स्थापना करण्यात आली असल्याचे नगरसेवकांच्या गटाकडून सांगण्यात आले. नेहमीच्या परंपरांच्या मार्गामध्ये अडसर आणण्याचा प्रयत्न करणार्यांना नगरसेवकांच्या एका गटाने जी तत्पर कृती केली, त्यामुळे अनास्था दाखविणार्या विरोधकांना एक सणसणीत चपराक बसली आहे.
बांगलादेश : गणेशमूर्तीवर हल्ला
बांगलादेशचे हंगामी प्रमुख मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशमधील हिंदू समाज आणि अन्य अल्पसंख्याक समाजावर जे हल्ले होत आहेत, त्या घटना फुगवून सांगितल्या जात असल्याचे म्हटले आहे. एकप्रकारे तेथील हिंदू समाजावर एवढ्या मोठ्या प्रमाणात हल्ले होत नसल्याचे त्यांना म्हणायचे असावे! पण, तेथील हिंदू समाजावर भीषण हल्ले झाले आहेत, ही वस्तुस्थिती अमान्य करून चालणार नाही. याचे ताजे उदाहरण विद्यमान गणेशोत्सवाच्या निमित्ताने दिसून आले आहे. दि. 6 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेदरम्यान बांगलादेशच्या चट्टग्राम जिल्ह्यातील ही घटना. चेरागी मोरभागातून हिंदू लोक गणेशमूर्तीची स्थापना करण्यासाठी ती मूर्ती पूजा मंडपाकडे नेत असताना त्या मिरवणुकीस धर्मांध मुस्लिमांनी लक्ष्य केले. हिंसक जमावाने मूर्तीची विटंबना केली. तसेच दोन हिंदू तरुणांवर अमानुष हल्ला केला. चेरागी मोर भागात असलेल्या मुबारक शाही जामा मशिदीमधून गणेशमूर्तीवर पाणी फेकण्यात आले. मूर्तीची विटंबना करण्यात आली. धर्मांध मुस्लिमांनी मिरवणुकीवर दगडफेक केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलीस आणि लष्कराने हस्तक्षेप केल्याचे सांगण्यात आले असले तरी, त्यांच्या छुप्या पाठिंब्याशिवाय अशा घटना घडणे शक्य नाही. बांगलादेशचे हंगामी प्रमुख हिंदू समाजावर होणारे हल्ले अतिरंजित होत असल्याचे म्हणत असले तरी, गणेश मिरवणुकीवर झालेला हल्ला मोहम्मद युनूस हे सत्य दडवून ठेवत आहेत, हेच दर्शविणारा असल्याचे दिसून येते.
कोलकाता कार प्रकरण आणि ममता सरकारची उदासीनता
कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात बलात्कार आणि हत्येची जी नृशंस घटना घडली, त्याचा प. बंगालमधून निषेध केला जात आहे. समाजाच्या विविध थरांतील जनतेकडून या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे. या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यासाठी आणि पीडितेस न्याय मिळावा, या मागणीसाठी समाजाच्या विविध थरांतील जनतेने मानवी साखळी केली होती. दि. 9 ऑगस्ट रोजी घडलेल्या या अमानुष घटनेसंदर्भात प. बंगाल सरकार उदासीन असल्याची प्रतिक्रिया एका निदर्शकाने व्यक्त केली. या घटनेत जे गुंतले आहेत, त्यांना कठोरात कठोर शासन व्हायला हवे, अशी निदर्शकांची मागणी आहे. सरकारने या घटनेची जितक्या गंभीरपणे दखल घ्याला हवी होती, तितक्या गंभीरपणे घेतली नसल्याचा आरोप काही निदर्शकांनी केला. आम्हाला न्याय हवा आणि तो लवकरात लवकर मिळायला हवा, अशी आमची मागणी आहे. लवकरात लवकर न्याय मिळावा, असा संदेश आम्ही या मानवी साखळीद्वारे देऊ इच्छित आहोत, असे काही निदर्शकांनी म्हटले आहे.
कार बलात्कार प्रकरण लक्षात घेऊन तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा सदस्य जवाहर सरकार यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून आपल्या खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. या घटनेमुळे आपण खूपच अस्वस्थ आहोत. ममता बॅनर्जी काही ठोस कृती करतील, अशी अपेक्षा वाटत होती. पण तसे काही घडले नाही, असे खासदार सरकार यांनी म्हटले आहे.
या प्रकरणी ममता बॅनर्जी सरकारची उदासीनता लक्षात घेऊन त्या सरकारने राजीनामा दिला पहिजे, अशी भारतीय जनता पक्षाची मागणी आहे. कार प्रकरण आणि संदीप घोष यांचा आरोग्य विभागातील भ्रष्टाचार प्रकरणात असलेला कथित सहभाग लक्षात घेऊन या प्रकरणी चौकशी करावी आणि ममता बनर्जी यांना अटक करावी, अशी मागणी करणारे पत्र भाजप खासदार ज्योतिर्मय महतो यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या संचालकांना लिहिले आहे.
दरम्यान, आर. जी. कार बलात्कार रुग्णालयाप्रकरणी बॉलीवूड चित्रपटसृष्टी मौन बाळगून असल्याबद्दल गायक कुमार सानू यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बॉलीवूड चित्रपटसृष्टीतील लोक भ्याड आहेत, अशी टीकाही कुमार सानू यांनी केली आहे. बलात्कार प्रकरणी बॉलीवूडमधील कोणत्याही मोठ्या व्यक्तीने तोंड उघडलेले नाही. हे सर्व लोक भ्याड आहेत, असे कुमार सानू यांनी म्हटले आहे. टॉलीवूडचा कोणीही या प्रकरणी पुढे आला नाही. या लोकांनी कसलाच प्रतिसाद दिला नाही, असेही कुमार सानू यांनी म्हटले आहे. या लोकांमध्ये काहीच हिंमत नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे.
9869020732