नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोन स्थानिकांना अटक केल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दिली आहे.
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या पहलगाम हल्ल्याचा तपास एनआयए करत आहे. यंत्रणेतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली बटकोट येथील परवेझ अहमद जोथर आणि हिल पार्क येथील बशीर अहमद जोथर यांना अटक केली आहे. चौकशी दरम्यान या दोघांनी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांची ओळख उघड केली आहे. ते लष्कर-ए-तोयबाशी संबंधित पाकिस्तानी नागरिक होते, असेही त्यांना सांगितल्याचे समजते. परवेझ आणि बशीर दोघांनाही बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) कायदा, १९६७ च्या कलम १९ अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे पहलगाम हल्ल्यामध्य़े २६ नागरिकांचा बळी घेतल्यानंतर दहशतवाद्यांनी आनंद व्यक्त करण्यासाठी आपल्या शस्त्रांद्वारे हवेत गोळीबार केल्याचीही माहिती प्रत्यक्षदर्शींनी तपासयंत्रणेस दिले आहे.