महाराष्ट्रात ४ वर्षांत ३८ हजार महिला आणि मुली बेपत्ता

    16-Jul-2025   
Total Views |

मुंबई
: गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रातून ३८ हजार महिला आणि मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात नागपूर शहरातील ५ हजार २२७ महिला आणि अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत ४१ हजार १९३ मुला-मुलींचा शोध लावला असून, आता महिलांसाठी ‘ऑपरेशन शोध’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत १७ एप्रिल ते २५ मे या कालावधीत ४ हजार ९६० महिला आणि १३ हजार ६४ बालकांचा शोध लावण्यात यश आले. विशेष म्हणजे, नोंद नसलेल्या ७०३ बेपत्ता बालकांचाही शोध लागला, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. १६ जुलै रोजी विधान परिषदेत प्रश्नोत्तर तासात दिली.

उबाठा गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी हा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे, भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी चर्चेत सहभाग घेतला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “विविध कारणांमुळे महिला आणि मुली घराबाहेर पडतात आणि नंतर परत येतात. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तात्काळ गुन्हा नोंदवला जातो. नागपूरमध्ये ५ हजार ८९७ बेपत्ता प्रकरणांपैकी ५ हजार २१० जणांचा शोध लागला आहे, म्हणजेच ९० टक्क्यांहून अधिक प्रकरणे निकाली निघाली. वर्षभरात हा आकडा ९६-९७ टक्क्यांपर्यंत पोहोचतो. मात्र, ३-४ टक्के प्रकरणांमध्ये व्यक्तींचा पत्ता लागत नाही.”

त्यांनी पुढे सांगितले की, ‘ऑपरेशन मुस्कान’ आणि ‘ऑपरेशन शोध’ या मोहिमांना सर्वोच्च न्यायालयानेही मान्यता दिली आहे. इतर राज्यांनीही ‘ऑपरेशन मुस्कान’चा अवलंब केला आहे. “बेपत्ता प्रकरणांचा पाठपुरावा न करणाऱ्या ४ टक्के लोकांमुळे आणि पोलिसांचे इतर खटल्यांकडे लक्ष जाण्यामुळे अडचणी येतात. यापुढे असे चालणार नाही. प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘मिसिंग सेल’ स्थापन करून महिला पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणांचा तपास केला जाईल,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, सामाजिक आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून या प्रकरणांचा तपास करण्यासाठी ‘पोलीस काका, पोलीस दीदी’ उपक्रमाद्वारे समुपदेशन केले जाईल. मानसशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञांचे साहाय्य घेऊन बेपत्ता प्रकरणे सोडवण्यावर भर दिला जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.