गायिका अनुराधा पौडवाल यांच्या ध्वनिचित्रफितीचे सिध्दीविनायकाच्या साक्षीने झाले लोकार्पण

    06-Sep-2024
Total Views |
ganesh panchratn
 
 मुंबई -  गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोक काव्याची ध्वनिचित्रफित ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरात मंगळवार ३ सप्टेंबर रोजी सकाळी बाप्पाच्या चरणी अर्पण केली. गायिका डॉ. अनुराधा पौडवाल यांनी आदि शंकराचार्य रचीत विघ्नहर्त्याचे हे पंचरत्न स्तुती काव्य लंडन येथील हाऊस ऑफ कॉमनमध्ये गायले. सामान्य रसिकांना आणि भविकांना ते ऐकायला मिळावे यासाठी त्याची ध्वनिचित्रफित तयार करण्यात आली आहे. श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर, अनुराधा पौडवाल यांच्या कन्या कविता पौडवाल, या ध्वनिचित्रफितीचे निर्माते लंडनस्थित व्यावसायिक दिलीप आपटे यावेळी उपस्थित होते. अत्यंत मांगल्यपूर्ण वातावरणात या पारंपारिक, सुश्राव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण भक्ती रचनेच्या ध्वनिचित्रफितीचे लोकार्पण सिध्दीविनायकाच्या साक्षीने झाले. मंगळवारी श्री सिध्दीविनायक मंदिराच्या प्रांगणात ‘गणेश पंचरत्न’ श्लोक काव्य प्रसारित करण्यात आले. त्यामुळे तेथील प्रसन्न आणि मंगलमय वातावरणात भर पडली. मंदिरात दर्शनासाठी आलेले हजारो भाविक तल्लीनतेने हे श्लोक काव्य ऐकत होते.