माहिती तंत्रज्ञानाच्या उत्कृष्ट वापरासाठी महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार
28-Sep-2024
Total Views |
मुंबई, दि.२७ : (MahaVitaran) माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे वीजग्राहकांना सर्वोत्तम सेवा देणे आणि दर्जेदार ग्राहकसेवेसाठी प्रभावी धोरणात्मक उपक्रम राबविल्याबद्दल महावितरणला द गव्हर्नन्स नाऊ या संस्थेतर्फे दोन प्रवर्गात राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात आले. दि. २६ सप्टेंबर रोजी हॉटेल हॉलिडे इन, एरोसिटी, नवी दिल्ली येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या कामकाजात आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून ग्राहकांना पारदर्शक व गतिमान सेवा देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महावितरणकडून माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत ग्राहक सेवेत अधिक सुलभता आणणार्या ऊर्जा चॅटबॉट व ईव्ही मोबाईल अॅपसाठी महावितरणला हे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
महावितरणचे ऊर्जा चॅटबॉट २४ तास ग्राहकांच्या सेवेत आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना नवीन जोडणी अर्ज, तक्रार नोंदणी करणे, वीजबिल भरणे इ. सेवा सुलभपणे उपलब्ध झालेल्या आहेत. इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषेत ग्राहकांना तत्परतेने, सुरक्षितरितीने माहिती प्रदान करून ग्राहकांचे समाधान करण्यात येत आहे. महावितरणच्या इलेक्ट्रिक व्हेईकल उपक्रमासाठी मानव विरहित ईव्ही चार्जिंग स्टेशनच्या उभारणी व इलेक्ट्रिक व्हेईकल वापरकर्त्यांसाठी मोबाईल अॅप उपलब्ध करुन दिले आहे. हे अॅप वापरकर्त्यांस चार्जिंग स्टेशन शोधणे व ई-वाहनांच्या व्यवस्थापनात मदत करते. हे अॅप महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक व्हेईकल क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या वाढीला चालना देणारे ठरले आहे. राष्ट्रीय पातळीवरील हे दोन्ही पुरस्कार महावितरणतर्फे महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) एकनाथ चव्हाण यांनी स्वीकारले. या यशाबद्दल महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मुख्य महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) अविनाश हावरे व माहिती तंत्रज्ञान विभागाचे अभिनंदन केले.