संत रामदासस्वामींना उद्धव, कल्याण, वेण्णास्वामी असे अनेक थोर शिष्य लाभले. त्यांनी विविध मठांद्वारे व साहित्याद्वारे समर्थ संप्रदायाचा झेंडा डौलाने फडकत ठेवला. गुरू रामदासस्वामींचा रामभक्तीद्वारे लोकजागृतीचा मंत्र, उपदेश मस्तकी शिरोधार्ह मानून त्यांनीही अवघा हलकल्लोळ केला. देशभर पसरलेल्या समर्थ स्थापित मठांचे कार्य अपूर्व आहे. शिष्य परिवारातील संत वेण्णा, संत गिरीधर, माधवस्वामी, श्रीधरस्वामी यांनी कोदंडधारी रघुवीराचे आपापल्या परीने गुणसंकीर्तन केले. त्यांच्या साहित्यात समर्थ रामदासप्रणीत रामभक्तीचे विलोभनीय दर्शन घडते.
उत्तम कार्यकुशल आणि आध्यात्मिक सत्त्वसंपन्न अधिकारी शिष्यपरंपरा लाभणे हे कोणत्याही पंथ-संप्रदायाचे भाग्य व भविष्य असते. समर्थ रामदासांना हेवा करावा असे एकापेक्षा एक निष्ठावान सक्षम शिष्य लाभले. अर्थात समर्थांनी असे शिष्य तयार केले, घडवले ही त्यांची खरी थोरवी. समर्थ रामदास स्वामींना उद्धव, कल्याण वेण्णास्वामी, आक्कास्वामी, दिनकर गोसावी, भीमस्वामी असे अनेक शिष्य लाभले. या शिष्यांनी श्रीराम व समर्थ रामदास यांची आध्यात्मिक थोरवी गात, पारमार्थिक कार्य केले. या शिष्यांपैकी अनेकांनी भक्ती साहित्यात मौलिक भरही घातली आहे. धुळे येथील वाग्देवता मंदिरात, आपणास सर्वांचे साहित्य मूळ स्वरूपात पाहता, अभ्यासता येईल असे जतन करून ठेवण्यात आलेले आहे. समर्थ शिष्य परिवारातील अनेकांच्या साहित्यात राम-रामायणविषयी लिहिलेले आढळते. त्यामध्ये मिरज मठाच्या वेण्णास्वामी यांनी लिहिलेले 1568 ओव्यांचे ‘सीता स्वयंवर’, मन्नागुडी मठाचे मेरूस्वामी यांनी लिहिलेले ‘श्रीराम चरित्र’ आणि दक्षिण प्रांतातील माधवदास कृत ‘रामायण’ हे विशेष उल्लेखनीय आहे. तंजावर येथील सरस्वती महल संग्रहालयातही आपण हे साहित्य पाहू शकतो. तसेच समर्थ भक्त श्रीधरस्वामी यांचे समग्र साहित्य सातारच्या भक्तिधामद्वारे श्री. रामकाका वसंतगडकर यांनी ग्रंथरूपात प्रकाशित केलेले आहे. त्यामध्ये भगवान श्रीधरस्वामीकृत मराठी व संस्कृत भाषेतील अनेक स्तोत्रे आहेत. त्यात ‘रामपाठ’, ‘श्रीरामचंद्र प्रभू’ ’रामप्रार्थना’ अशा तीन मराठी आणि ‘श्री रामभद्रस्तोत्रम’ हे संस्कृत स्तोत्र विशेष आहेत.
‘सीतास्वयंवर’ व ‘संकेत रामायण’
समर्थ शिष्या वेण्णाबाई तथा वेण्णास्वामी या ज्ञानसंपन्न विदुषी शिष्या होत्या.कारुण्य, वैराग्य, पांडित्य आणि परतत्त्वस्पर्शी कवित्व लाभलेल्या वेण्णाला वेण्णास्वामी, वेणीराम नावाने भक्त मंडळी ओळखत होती. प्रारंभी संत एकनाथांच्या ‘नाथ भागवत’ ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. त्यांचा काळ इ.स. 1628 ते 1678 मानला जातो. त्यांनी समर्थांच्या कृपेने ‘सीतास्वयंवर’ नावाचा ग्रंथ लिहिला तो रामायणावर आधारित आहे. त्याशिवाय त्यांनी ‘वेणीरामायण’ लिहिले ते प्रकांडाचे आहे.
हे सीतेचे सैंवर (स्वयंवर) । वाल्मिकी बोलिला विस्तार ।
रम्य रसाळ सुंदर । नाना विलासे करोनी ॥
या सीता स्वयंवराच्या वरातीमध्ये वर्हाडी म्हणून धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ नटूनथटून सहभागी झाले होते. अशी सुंदर कल्पना वेण्णास्वामींनी या काव्यरचनेत केलेली आहे.
समर्थदेवे वेणाबाईसी वरदाने दिधली ।
सीतास्वयंवर रामायणे वदविली ॥ (समर्थ प्रताप)
या ‘सीतास्वयंवर’ शिवाय वेणी गिरीधर कृत ‘संकेत रामायण’ नावाची रचना मिळते. या संकेत रामायणातील 7 कांडापैकी 6 कांडे ही वेणाबाईंच्या हातची असून केवळ 7वे एकच कांड गिरीधर यांनी लिहिले, असा अभ्यासकांचे समर्थहृदय श्री शंकरराव देव यांचे मत आहे. ‘रामदास आणि रामदासी’ मालेतील त्रेचाळीसाव्या भागात श्री.शं. देव यांनी वेणी रामायण छापले आहे. त्याची ओवी संख्या 1536 इतकी आहे. हे रामायण मात्र पाच कांडांचेच आहे.
या वेण्णाबाई कृत रामायणाच्या पाच कांडांमध्ये गिरीधर याने आणखी दोन कांडे जोडून वेणाबाईंचे रामायण पूर्ण केले, तेच वेणा गिरीधर कृत ‘संकेत रामायण’ असावे असे एक मत आहे. मराठवाड्यातील बीड स्थित रामदासी मठाचे गिरीधरस्वामी हे महंत होते. ते समर्थशिष्या वेणाबाईंच्या शिष्य बाईयाबाई यांचे शिष्य होते. वेणाबाई या गिरीधरांच्या परात्पर गुरू होत्या. यावरून वेण्णाबाईंनी अनेक महिलांना समर्थ दीक्षा देऊन समर्थ केले होते, हेही लक्षात येते.
गिरीधराचे ग्रंथकर्तृत्व अफाट आहे. ‘समर्थ प्रताप’ मुळे ते विशेष विख्यात आहेत, पण आणखी विशेष गोष्ट म्हणजे गिरीधरांनी पाच वेगवेगळी रामायणे लिहिली आहेत. 1) संकेत रामायण 2) अब्द रामायण 3) मंगल रामायण 4) छंदो रामायण, आणि 5) सुंदर रामायण. या पाचामध्ये ‘संकेत रामायण’ सर्वात मोठे आहे तर ‘मंगल रामायण’ श्लोकबद्ध असून त्यात एकूण 1 हजार 519 श्लोक आहेत.
माधवस्वामींची दोन रामायणे
समर्थांचे शिष्य राघवदास हे दक्षिण भारतातील समर्थानुयायी महंत म्हणून प्रसिद्ध होते. त्या राघवदासांचे शिष्य ‘माधवस्वामी’ (1648 ते 1708) हे विद्वान व व्यासंगी होते. त्या माधवस्वामींनी लिहिलेली दोन रामायणे तंजावरच्या सरस्वती महल संग्रहालयात मिळतात. 1) श्लोकबद्ध रामायण 2) ओवीबद्ध रामायण. माधवस्वामींनी ओवीबद्ध रामायणाच्या शेवटी लेखनकाल दिलेला असून तो शके 1617 (इ.स.1694) असा आहे. या ओवीबद्ध रामायणाची एकूण ओवी संख्या 17 हजार 290 एवढी प्रचंड आहे. म्हणजे हा ग्रंथ जवळजवळ दासबोधाएवढा प्रचंड आहे. माधवदास यांच्या या ओवी रामायणाचा लेखनक्रम सलग नाही. त्यांनी प्रथम किष्किंधाकांड लिहिले व सर्वात शेवटी अरण्यकांड लिहून रामायण पूर्ण केले. माधवदासांचे ‘ओवी रामायण’ पूर्ण सात कांडांचे संपूर्ण आहे. पण त्यांचे ‘श्लोक रामायण’ फक्त युद्धकांडापर्यंतच असून एकूण श्लोक 726 आहेत. हे माधवस्वामी थोर संत, भावार्थ रामायणाचे लेखक, एकनाथ महाराज यांच्या कन्येचे पुत्र आहेत. म्हणजे संत एकनाथांचे नातू आहेत. संत एकनाथांच्या दोन्ही मुलींच्या मुलांनी म्हणजे नाथांच्या दोन नातवंडांनी मराठी साहित्यविश्वात ‘रामायण’ लिहून स्थान प्राप्त केलेले आहे. ते दोन प्रख्यात नातू म्हणजे 1)पंडित कवी मुक्तेश्वर आणि 2) दक्षिण भारतातील समर्थशिष्य राघवदासांचे शिष्य माधवस्वामी. समर्थ रामदासांचे व संत एकनाथांचे कौटुंबिक-पारिवारीक नाते होते. त्याचा हा वृद्धिंगत झालेला ‘रामभक्ती’ धागा आहे. यातून आपणास समर्थ संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाचे अंतरंग साम्यभावाचे अद्वैत समन्वयी, एकात्म दर्शन घडते. असा हा संप्रदाय समन्वय हेच महाराष्ट्रभूमीचे खास स्वभाववैशिष्ट्य आहे.
विद्याधर ताठे
9881909775
vidyadhartathegmail.com
(पुढील अंकात ः संत शेख महंमदाच्या ‘योगसंग्राम’मधील राम )