महारेरा संकेतस्थळाचे दोन दिवसीय प्रशिक्षण

"महाकृती"च्या प्रभावी वापरासाठी भागधारकांना प्रशिक्षण

    27-Aug-2024
Total Views |

maharera


मुंबई,दि.२६ :
  महारेराचे नवीन संकेतस्थळ 'महाकृती'चा सर्व भागधारकांना सहज वापर करणे शक्य व्हावे यासाठी महारेरा प्रत्यक्ष आणि दृकश्राव्य पध्दतीने प्रशिक्षण आयोजित करणार आहे. संकेतस्थळ एक सप्टेंबरला पूर्णत्वाने सुरू होण्यापूर्वी आणि त्यानंतर दोन आठवड्यांसाठी हे प्रत्यक्ष आणि दृकश्राव्य माध्यमातून प्रशिक्षण घोषित केलेल्या वेळापत्रकानुसार महारेराच्या बांद्रा कुर्ला संकुलातील मुख्यालयात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महारेराने दिली. या प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ महारेराच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून दिले जातील.
प्रत्यक्ष संकेतस्थळ एक सप्टेंबरला सुरू होण्यापूर्वी २९ आणि ३० ऑगस्ट रोजी प्रकल्पांचे प्रवर्तक, विकासक, त्यांच्या स्वयंविनियामक संस्था, स्थावर संपदा क्षेत्रात कार्यरत एजंटस, तक्रारदार आणि विकासकांचे वकील आणि महारेराची अंतर्गत यंत्रणा यांना त्यांच्या त्यांच्या गरजांनुसार मार्गदर्शन केले जाईल. या प्रशिक्षणाचे वेळापत्रक महारेराच्या संकेतस्थळावर दिलेले आहे. सर्व संबंधितांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महारेराच्यावतीने करण्यात येत आहे.
यामध्ये तक्रारदारांसाठी सुद्धा तक्रारी कशा नोंदवाव्या आणि त्याची पुढील प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. यात वकिलांचाही समावेश आहे. विकासक, प्रवर्तक, त्यांच्या स्वयंविनियामक संस्था यांना नवीन गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी, गरजेनुसार दुरुस्ती, नूतनीकरण, त्रैमासिक प्रगती अहवाल, वार्षिक प्रगती अहवाल, प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दलचे प्रपत्र ४या नेहमीच्या कामांसाठी संकेतस्थळाचा वापर प्रभावीपणे कसा करायचा याबाबत मार्गदर्शन केले जाईल.स्थावर संपदा क्षेत्रातील एजंटसनाही त्यांची नोंदणी, दुरुस्ती, नूतनीकरण अशा त्यांच्या नेहमीच्या कामांबाबतही मार्गदर्शन केले जाईल. या सर्व भागधारकांना ही कामे करताना प्रत्यक्ष येणाऱ्या अडचणी सुद्धा या प्रशिक्षणाच्या काळामध्ये सोडविण्यासाठी मदत केली जाईल.