देशात नावलौकिक मिळवणाऱ्या महावितरणला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कटिबद्ध व्हावे - लोकेश चंद्र

महावितरणचा २० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

    07-Jun-2025
Total Views |
 
committed financially empowering Mahavitaran in country Lokesh Chandra
 
मुंबई: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना व मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अशा योजनांच्या अंमलबजावणीत महावितरणने देशात नावलौकिक मिळवला असून ऊर्जा परिवर्तनाचे महावितरणचे मॉडेल जगासाठी मोठे उदाहरण ठरणार आहे. महावितरणचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे हे शक्य झाले आहे.परंतु महावितरणला आर्थिकदृष्टया अधिक सक्षम करणे गरजेचे असून त्यासाठी सर्वानीच कटिबद्ध होऊन मिशन मोड वर काम करण्याचा निर्धार करावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.
 
महावितरण कंपनीचा २० वा वर्धापन दिन महावितरणचे मुख्यालय प्रकाशगड मुंबई येथे उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.लोकेश चंद्र बोलत होते. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून म.रा.वि.मं.सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक उपस्थित होते. तसेच महावितरणचे संचालक (संचालन तथा प्रकल्प)  सचिन तालेवार, संचालक (वित्त ) अनुदीप दिघे, संचालक (मानव संसाधन )  राजेंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली १ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महावितरणने ऊर्जा परिवर्तनाचा आराखडा तयार केला असून त्याची यशस्वी अंमलबाजवणी करण्यात येत आहे. या ऊर्जा परिवर्तनामुळे महावितरणचा वीज खरेदीवरील खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना स्वस्त दरांत वीज उपलब्ध होईल. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे. आगामी काळात विजेची मागणी ४५,००० मेगावॅट पर्यंत पोहचणार असून त्यासाठी महावितरणकडून यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यात येत आहे. महावितरणच्या ऊर्जेची स्थापित क्षमता ८२,००० मेगावॅट पर्यंत वाढणार असून वापरात न येणारी ऊर्जा साठवून ठेवण्याची यंत्रणा महावितरणकडून उभारण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठविण्याचे महावितरणचे नियोजन जगासाठी मॉडेल ठरणारे आहे. महावितरण मध्ये काम करणाऱ्या सर्वांसाठी ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. परंतु माहिती तंत्रज्ञाच्या आधारे ग्राहकांना तत्पर सेवा द्यावी व तक्रार निवारणामध्ये सुधारणा करावी. स्मार्ट मीटर ग्राहकांच्या हितासाठी असून त्यामुळे ग्राहकांच्या बिलिंगच्या तक्रारी राहणार नाहीत. ग्राहकांना स्मार्ट मीटरच्या फायद्याबाबत माहिती देऊन जनजागृती करण्याचे आवाहन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले. महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त संचालक राजेंद्र पवार यांच्या पुढाकारातून संपूर्ण राज्यात राबविण्यात आलेल्या सुरक्षा अभियानाचे श्री.लोकेश चंद्र यांनी कौतुक केले.
 
या प्रसंगी स्वतंत्र संचालक विश्वास पाठक म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महावितरणने केलेली प्रगती उल्लेखनीय असून स्पर्धेच्या युगात सक्षम होण्यासाठी महावितरणने अधिक जोमाने काम करणे काळाची गरज आहे.
प्रास्ताविक संचालक (मानव संसाधन )  राजेंद्र पवार यांनी केले. तसेच महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त ‘शुन्य अपघात महावितरण, शुन्य अपघात महाराष्ट्र’ ही संकल्पना घेऊन संपूर्ण राज्यात राबविण्यात आलेली विद्युत सुरक्षा मोहीम अशीच प्रभावीपणे अंमलात आणावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारदर्शन सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड यांनी केले. यावेळी गणेश शिंदे यांचे 'जीवन सुंदर आहे' विषयावर व्याख्यान झाले. वर्धापन दिन कार्यक्रमात सर्वांनी सुरक्षा शपथ घेतली. कार्यक्रमाला महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.