एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यभर धुळे -नंदुरबार पॅटर्न
- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
07-Jun-2025
Total Views | 30
मुंबई: एस.टी.महामंडळाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करणे व उत्पन्नवाढीस चालना देण्याच्या हेतूने विविध अनावश्यक खर्चात कपात करण्याच्या उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. यात राज्यात पहिल्या आलेल्या धुळे- नंदुरबार विभागाचा पॅटर्न सगळीकडे वापरणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. एसटी उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने बोलावलेल्या एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते.
यावेळी एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर ,आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख यांच्यासह धुळे नंदुरबार विभागाचे विभाग नियंत्रक विजय गीते, यंत्र अभियंता पंकज महाजन व इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री सरनाईक म्हणाले की, १ जुन २०२५ रोजी एसटीच्या ७७व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. त्यांचा अनुभव आणि प्रयत्न एसटीच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनुकरणीय आहेत. ज्या ज्या विभागांमध्ये आणि आगारांमध्ये उत्पन वाढीसाठी विशेष प्रयत्न केले गेले आणि त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळाले अशा अधिकाऱ्यांचे अनुभव आणि प्रयत्न हे इतरांना देखील समजणे आवश्यक आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.
सुचविण्यात आलेल्या उपाययोजना
१) कमी गर्दीच्या कालावधीत आणि साप्ताहिक सुट्ट्या दिवशी अत्यल्प प्रतिसाद असलेल्या फेऱ्यांचे पुनरावलोकन करुन चांगले उत्पन्न मिळणाऱ्या मार्गावर त्या फेऱ्या वळवणे.
२) लांब पल्ल्याच्या मार्गावर जुन्या बसेस बदलून, नवीन इंधन कार्यक्षम बसेस लवकरात लवकर वापरणे.
३) अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यक्षमतेनुसार योग्य पदावर नियुक्त करून त्यांचे प्रशिक्षण सुनिश्चित करणे.
४) आगार कक्षेत स्थानिक मार्गांवर प्रवासी प्रतिसाद असलेल्या मार्गावर ठराविक वारंवारतेने शटल फेऱ्या चालवणे.
५) आरटीओ अधिकाऱ्यांच्या सहकार्याने अवैध वाहतूक रोखून तेथे एसटीच्या अतिरिक्त फेऱ्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.
६) डिझेल इंधन टँकरचा वापर दक्षतेने करून इंधन चोरी रोखणे.
७) वाहनाचे प्रति किमी मायलेज वाढण्यासाठी त्यांची दैनंदिन देखभाल करणे.
८) जुने टायर बदलताना फक्त टायर नव्हे तर नवे ट्युब व फ्लॅपही बदलणे.