भगवान श्रीकृष्णांचा देशभर साजारा होणारा जन्मदिवस म्हणजे श्रीकृष्ण जयंती होय! भगवान श्रीकृष्णांनी अनेक लीला रचल्या आहेत. बालगोपालांत रमणारा कान्हा, प्रसंगी जगाला ज्ञानाचे अमृत देणारी गीतादेखील सांगते झाले. याच श्रीकृष्णांच्या लीलेमध्ये खेळाचे स्थान अत्युच्च असेच. श्रीकृष्णांच्या क्रीडालीला आणि सध्याचे खेळ यांचा घेतलेला हा आढावा...
श्रीकृष्णाष्टकं :
नमामि कृष्णनागरम् । नमामि कृष्णवारणम् ।
नमामि गोपनायकम् । नमामि नन्दलालसम् ।
नमामि नन्दसम्भवम् । नमामि मेघसुन्दरं तडित्प्रभालसत्पटम् ।
नमामि कुञ्जनायकम् । नमामि श्रीविहारिणम् ॥
यदा तदा यथा तथा तथैव कृष्णसत्कथा
मया सदैव गीयतां तथा कृपा विधीयताम् ।
प्रमाणिकाष्टकद्वयं जपत्यधीत्य यः पुमान्
भवेत्स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान् ॥
श्रीकृष्णाला नमन करतानाचं श्रीकृष्णाष्टकं हे श्रीमच्छङ्कराचार्यकृत जे स्तोत्र आहे, त्यातील काही पदांचे उल्लेख वर आपण पाहिले. कृष्णकथेचे कधीही, कोणीही, कोठेही आणि कसेही सादरीकरणास, गायनास, श्रवणास, बघण्यास मिळणं हे भाग्याचे लक्षण समजले जाते. मग तो पुराणकाळ असो अथवा आजच्या आधुनिक युगाचा काळ असो. आजचे आपण क्रीडाप्रेमीही ’कृष्णपक्षा’चे पाठीराखे होत. या भगवंताला प्रथम नमन करत, कृष्ण हा क्रीडा क्षेत्रात कसा अद्वितीय होता, ते या कृष्णपक्षात जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
गोपनायकाचा पक्ष : ऑगस्ट 26 ला येणारा श्रावण कृष्णपक्ष अष्टमीचा म्हणजेच गोकुळाष्टमीचा, आणि त्याला जोडून येणार्या नवमीचा दहीहंडीचा दिवस. हे भारतीय संस्कृतीत अग्रस्थानी असलेले आध्यात्मिक क्रीडासोहळे. तर याच श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशी पॅरिसलाच 28 ऑगस्टपासून चालू होणार्या, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय पॅराचमूंचा प्रस्थान सोहळा होणार आहे. भारतीय क्रीडाजनतेचे दैवत असलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी साजरा होणारा 29 ऑगस्टचा राष्ट्रीय क्रीडा दिन देखील याच पक्षात आहे. उत्साही बाळगोपाळ आणि आबालवृद्ध क्रीडाप्रेमींसाठीचे हे जिव्हाळ्याचे दिनविशेष या ऑगस्टमध्ये येत आहेत.
श्रावण कृष्णपक्ष अष्टमीला पूर्णावतार असलेल्या श्रीकृष्णाने, पृथ्वीतलावर जन्म घेतला. बालपणापासून आपल्या असाधारण कर्तृत्वाने, अनेक क्रीडा करत आबालवृद्ध, महिला, पुरुष असे सगळ्यांना मानवी जीवनातील अनेक पैलूंची त्याने शिकवण दिली. लहानपणापासून गोकुळातील सवंगड्यांना आपले क्रीडानैपुण्य दाखवून देत, समाजाला त्याचे धडे दिले. ते धडे आजही आपल्याला शिकण्यासारखेच आहेत.
यमुनाकिनारी, गोवर्धन पर्वताच्या परिसरात आपले गोधन चारायला बालवयापासूनच तो जात असे. गोधनाची राखण करत एकीकडे तो सवंगड्यांना जोडीला घेत, नानाविध खेळ खेळत, त्यांना ते शिकवतही असे. तो तेव्हा गोपाळांच्या संघातील एक खेळाडू जसा होता, तसा तो संघनेता आणि प्रशिक्षकही होता. त्याची गणना आपण आद्यप्रशिक्षक, आद्यसंघनेता अशी करू शकतो. कृष्ण, गोरक्षकांना एकत्र आणत ’अरे गोपाळांनो! चला आता खेळूया!’ अशी त्यांना साद घालत असे, आणि त्यांना दोन सम संघांमध्ये विभागून संघबांधणीचे धडे देत असे.
डोपिंग !
बालपणापासूनच गायीचे दूध, ताक, लोणी, तूप असे ताजेताजे आणि त्यापासून होणार्या सकस, पौष्टिक घरगुती आहाराने वाढलेला नंदन सदा ताजातवाना ताकदवान असाच होता. आजचे क्रीडापटू जशी विकतची महागडी औषधे घेतात तसले प्रकार अनुभवावेत, असे गोपाळांच्या मनात चुकूनही आले नसेल. गोपाळांच्या नायकासकट कोणीच आपले वय आणि वजन चोरले नसेल. साधारणपणे कुस्तीत, मुष्टियुद्धात, वरिष्ठ गटातील मल्ल कनिष्ठ गटातील मल्लांशी खेळत नसतो. प्रत्येकाचे वजनगट ठरलेले असतात. आजच्या काळातील वजनी व वयोगट त्याकाळीही पाळले जात. क्रीडापटूची कामगिरी वाढवण्यासाठी औषधांचा, पेयपानांचा वापर अनैतिक मानला जातो, तसा तो पौराणिक काळातही आढळला आहे. आणि जरी तसे असले-नसले तरी राक्षसी वृत्तीचे क्रीडापटू ते नियम धुडकावत असत. असे असले तरी, कृष्ण-बलराम बंधूना त्याचा अडसर कधीच आला नव्हता. त्या मल्लयुद्धाचे अनेक पुरावे आज आपल्याला सापडतात.
कंसाने आपल्या मल्लश्रेष्ठ चाणूराला कृष्णाचा समाचार घेण्याकरिता पुढे करून, कृष्णाला आव्हान दिले. कृष्णाने एका तडाख्यातच चाणूराचे मर्दन करून ,त्याला यमसदनास पाठविले. त्या पाठोपाठ बलरामाने मुष्टिक या मल्लाला चारीमुंड्या चीत केले. अशा अनेक महामल्लांची वाट लावल्यानंतर, यादवकुलाचे आणि नंदगोपाच्या जमातीचे निर्दालन करण्याची कंसाची प्रतिज्ञा आठवून, कृष्णाने कंसाच्या सिंहासनावर झेप घेऊन, कंसाचा शिरच्छेद केला आणि कंसाचा पिता उग्रसेन यास राज्याभिषेक केला.
कंसमामा, चाणूरासारख्या राक्षसी मल्लांना मल्लयुद्धात खेळवत ठार करण्याचीही युक्ती अन् शक्ती कृष्णाच्या बाललीलांमध्ये सापडते.
त्याच्या वाढीच्या काळातील कथांचा अंतर्भाव कृष्णाच्या दिव्यावतारात आढळेल. आजकाल आपण पाहतो की फ्रीस्टाइल कुस्ती व बॉक्सिंग चॅम्पियनशिप सामन्यांमध्ये, विजय मिळताच, विजयी बॉक्सरचे सवंगडी त्याचे अभिनंदन करण्यासाठी रिंगमध्ये धावतात, आणि चॅम्पियन मोठ्या आनंदात नाचतो. अशाच प्रकारे कृष्ण आणि बलराम नाचत त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांसोबत आपला विजय साजरा करीत. नदीकिनारी खेळताना पाण्यात गेलेला चेंडू आणण्यासाठी कृष्ण निष्णात जलतरणपटू बनतो, आणि डोहात गेल्यावर सगळ्यांना त्रास देणार्या कालियाचे मर्दन करत कृष्ण त्यावर कसे नर्तन करतो, याचे वर्णन आपल्याला आढळतं. कृष्णाने शत्रू मारले, दुष्ट राजे, मानव किंवा आक्रमक बैल-राक्षस अरिष्टसुर सारख्यांना मारले आणि आपल्या सहकार्यांचे रक्षण केले. त्यामुळे तो जलतरणपटूंचा कप्तान बनला, प्रशिक्षक बनला.
मनुष्याचा अहंकार व शरणागत होणे!
‘द्यूत बिठाये बैठे शकुनि
मस्तक सब बिक जायेंगे।
उठो द्रौपदी वस्त्र सम्भालो
अब गोविंंद न आयेंगे।’
कोलकात्याच्या वैद्यकीय महाविद्यालयातील हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर, सध्या व्हायरल होत असलेल्या ह्या दोन ओळी मला येथे आठवतात. पुष्यमित्र उपाध्याय ह्यांच्या काव्यातील त्या आहेत. तथापि, 2018मध्ये अटलजींच्या जाण्याच्या काळातही कविता व्हायरल झाली होती; तशीच ती आता परत अटलजींच्या नावावर पुन्हा व्हायरल होत असून, काही गैरसमज पसरवले जात आहेत. तर, त्या काव्यातल्या ह्या ओळी आठवतात आणि ते महाभारतही आठवते. तर, द्यूत हा पूर्वापार प्रसिद्ध असलेला बैठ्या खेळातील एक क्रीडाप्रकार. महाभारतात पांडव श्रीकृष्णाचे लाडके असूनही ते द्युतात कसे हरतात, पण द्रौपदीचे रक्षण कसे होते, हे लक्षात घेण्यासारखे आहे. आपण कृष्णाचा धावा न करता आपण सहजी जिंकू शकतो, असा अहंकार युधिष्ठीरात असल्याने तो द्युताचा महानियंत्रक असलेल्या शकुनीमामा व कौरवांकडून हरतो, पण द्रौपदी वेळेवर कृष्णाचा धावा करते आणि वाचते. द्युताच्या खेळातून आपल्याला कृष्णाने हे देखील शिकवलं आहे की, जो स्वतःच्या हक्कासाठी लढण्याचा प्रयत्न करत नाही, त्यासाठी भगवंत काही करत नसतो.
क्रीडापटूची शिदोरी!
श्रीकृष्णाने व्रजमंडळात गोधन चारताना आपली आणि सवंगड्यांच्या शिदोर्यां एकत्र गोळा करून त्या एकत्र कालवल्या, आणि तिथे अंगतपंगत केली. पोहे, दही, धारोष्ण दूध, ताक, लोणी याचा यथेच्छ पौष्टिक आस्वाद सगळे वारंवार घेत असत, आणि ते पचवतही असत. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्या दिवशी गोपाळकाला करण्याची, आणि त्यासाठी दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली. आज तीच दहीहंडीची प्रथा निष्ठेने पाळली जात आहे. तथापि, आध्यात्मिक आणि पौराणिक पार्श्वभूमी विसरून, आजच्या भाषेत तो केवळ एक सार्वजनिक उत्सव म्हणून अनेकदा साजरा होत आहे. आज अन्य इव्हेंटप्रमाणे दहीहंडीचहीे इव्हेंट होत आहेत. हा गोपाळकाल्याचा इव्हेंट म्हटले की, उंचच्या उंच हंड्या आणि त्या फोडण्यासाठी जीवाचे रान करणारे तरुण, आपल्या डोळ्यांसमोर येतात. बालगोपालांची दहीहंडी, गोपालकाला वगैरे फक्त मुरलीधराच्या मंदिरांमध्ये होणार्या कीर्तनात आणि हिंदू धर्माचा पुरस्कार करणार्या संस्था व शाळांमध्येच दिसते.
पुण्यामुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये दहीहंडी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपल्या मंडळाच्या दहीहंडीला जास्तीतजास्त नागरिक यावेत, यासाठी मंडळाकडून वेगवेगळी शक्कल लढविली जाते. चित्रपटसृष्टीतील तारे- तारकांना आणण्यासाठी दहीहंडी मंडळांत स्पर्धा लागलेली असते. अशा या गोंधळात चक्क एका ’पॉर्न स्टारला’ही प्रमुख पाहुणी म्हणून बोलविण्याचे धारिष्टय एका मंडळाने काही वर्षांपूर्वी केले होते. पोलीस सहसा डॉल्बीला परवानगी देत नाहीत, आणि जरी दिली तरी डॉल्बीचे डेसिबल तपासले जाते. असे असले तरी अनेकदा डॉल्बीचा त्रास गणेशोत्सवात होतो तसा दहीहंडीतही होताना आढळलेला आहे. एका ठिकाणी तर एका मंडळाने दहीहंडीच्या कार्यक्रमात चक्क कोयता नृत्य सादर केले होते. त्यात सगळे कोयते हाती घेऊन बेधुंदपणे नाचल्याची घटना 2022 मध्ये घडली होती. रात्री उशिरापर्यंत चालणार्या या दहीहंडीत, डीजेच्या तालावर तरुणाई मनमुरादपणे नाचण्याचा आनंद घेत असते. तर, अनेक गोविंदा मंडळे या दहीहंडी स्पर्धेत सहभाग घेत असतात, आणि तेथे जाहीर केलेले हजारोंचे बक्षीस हस्तगत करण्यात गर्क असतात. त्यात गोरस सोडाच, पण काही गोपाळ दुसरेच काही रसपान ताकदीसाठी करताना आढळत असतील. बरेच दिवस आधीपासूनच शहरातील गणेश मंडळांतील कार्यकर्ते एकीकडे दहीहंडीचे मानवी मनोरे रचण्याच्या सरावामध्ये, तर काही कार्यकर्ते शहरातल्या पुलांखाली ढोल बडवण्याचा सराव करत असतात. दुसरीकडे आजूबाजूच्या भागात राहणार्या केविलवाण्या रहिवाशांना आधीपासूनच आपल्या कानांचा त्रास कसा कमी करता येईल, ह्याची प्रॅक्टिस ते कार्यकर्ते देत असतात, की जेणेकरून प्रत्यक्ष उत्सवात, मिरवणुकांत होणारा त्रास सवयीचा होईल, तर काही कार्यकर्ते ऑलराऊंडर क्रीडापटू असतात.
ह्या मंडळांना आणि पथकांना उत्तेजन देण्यासाठी आणि त्यांचे सगळे खर्च भागवण्यासाठी त्यांना स्वार्थ व परमार्थ सांभाळत स्पॉन्सर मिळत असतातच. ह्यासाठी जागोजागी जाहिरात कमानी लावल्या जातात. या कमानी अनेकदा रहिवाशांना त्रासदायक ठरत असतात. म्हणून काही नगरपालिका त्यांना जाहिरात शुल्काची सवलत देतात. ही सवलत केवळ गणेशोत्सवासाठी असते. त्यामुळे दहीहंडी उत्सवासाठी जाहिरात फलकाचे शुल्क भरावे लागते. गोपाळांवर हा अन्याय तर समजला जात नसेल काय! ह्या कमानींचा आकार, त्याची ठिकाणं हे मनपा जरी ठरवत असले, तरी आजचे गोपाळ ते पाळत असतील काय! त्यांचेच तारणहार असलेले नगरसेवक काय भूमिका घेत असतील. दहीहंडीतले हे खेळ श्रीकृष्णच फक्त जाणो! तर अशा प्रसंगात ह्या तथाकथित गोविंदांना संस्कृती, पोलिसांचे भय, स्वत:ला होणारे जीवघेणे अपघात, ह्या कशाचीही फिकीर नसावी? त्या अशांना तो इव्हेंट यशस्वी करायचा असतो काय!. गोपाळांनो, आत्मचिंतन करा.
दहीहंडी उत्सवादरम्यान गोविंदांना मानवी मनोरे रचताना अपघात होण्याची शक्यता असते. काही वेळा गोविंदा पथकातील गोविंदांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू घडून येतो, किंवा गंभीर दुखापत होऊन त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. परिणामी, अपघातग्रस्त गोविंदांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते. या अनुषंगाने गोविंदांना विमा संरक्षण देण्यासाठी काही विमा कंपन्या राज्य सरकारच्या मदतीने पुढे सरसावत आहेत. दहीहंडीत ’पॅरा-गोपाळ’ होऊ नका. नशीबवान समजा, स्वतःला भगवंताने आपल्याला धडधाकट ठेवलं आहे हे श्रीकृष्णाचे आपल्यावरचे उपकार माना.
कृष्णाने अर्जुनाला केवळ लक्ष्यावर ध्यान देण्यास सांगितलं होतं. तेच अंतिम फेरीत माझ्या डोक्यात सुरू होतं. श्रीकृष्णाचे हे विचार करत ध्येयप्राप्ती करणारी नेमबाज मनू भाकर असो, अथवा आता ध्येय प्राप्त करण्यास पॅरिसलाच गेलेली पॅरा धनुर्धर शीतलदेवी असो, त्यांचे नेम बसण्यासाठी आपल्याला मार्गदर्शक ठरतात, ते खेळाडूच आपल्याला प्रेरणा देतात. याच आपल्या आजच्या भारतीय क्रीडाक्षेत्राचे दैवत मानल्या जाणार्या मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस, आता 29 ऑगस्टला येत आहे. तो आपण साजरा करत त्यांना वंदनही करणार आहोतच, तसेच त्यांची गाथा वाचून भारतीय गोपाळांचा क्रीडादिन मोठ्या आनंदात साजरा करण्यास आपण उत्सुक आहोतच. तर, चला, आपण सारे क्रीडापटू ....
‘वन्दे वृन्दावनचरं वल्लवीजनवल्लभम् ।
जयन्तीसम्भवं धाम वैजयन्तीविभूषणम् ॥’
वृंदावनामध्ये विहार करणार्या, गोपीजनांना आनंद देणार्या गोपनायकाला, त्याच्या जयंती योगावर म्हणजे श्रावण कृष्ण अष्टमीच्या मध्यरात्री रोहिणी नक्षत्र असताना जन्मलेल्या, भक्तांचे आश्रयस्थान असलेल्या, वैजयंती माळेने सुशोभित झालेल्या भगवान श्रीकृष्णाला, गोपनायकाला त्याच्या जयंतीला नमन करूया. इति!
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७४०