गेले अनेक दिवस मल्टीस्टार ‘दशावतार’ या चित्रपटाची बरीच चर्चा होती. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता आणि अखेर आता दि. १२ सप्टेंबर रोजी चित्रपट सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर पाहिल्यानंतरच अनेकांनी या चित्रपटाची दाक्षिणात्य चित्रपटांशी तुलना केली होती. अर्थातच त्या धाटणीची कथा आणि काहीसे साम्य असल्यामुळे, अशा प्रतिक्रिया येणे साहजिकच. प्रथितयश कलाकारांची मोठीच फौज या चित्रपटात असल्याने, प्रेक्षकांना या चित्रपटाची फारच उत्सुकता होती. अशा या चित्रपटाची समीक्षा...
कोकणातील घनदाट जंगलात रात्रीच्या अंधारात काजव्यांचा लखलखाट होत असतो. गर्द झाडीत रात्रीच्या अंधारात पहिले दृश्यच दिसते ते कातोळबाचे. कातोळबा अर्थातच कातळ शिल्प. कोकणातले एक साधे निसर्गरम्य गाव, गावातली साधी माणसं आणि त्यापैकीच एक बाबुली मेस्त्री म्हणजेच दिलीप प्रभावळकर प्रसिद्ध दशावतारी कलाकार, अत्यंत साधा, भाबडा, गरीब पण मनाने आणि कलेने अत्यंत श्रीमंत. त्याचा एकुलता एक मुलगा म्हणजे माधव (अभिनेता सिद्धार्थ मेनन). घरात दोघेच एकमेकांचा आधार असतात. तर माधवच्या प्रेमात वंदू(प्रियदर्शिनी इंदलकर) पडते. अशी एकूणच या चित्रपटाच्या कथेला सुरुवात होते. बाबुलीची नजर वयोमानामुळे कमकुवत झाल्याने, त्याला धुरकट दिसते. तसेच शरीरामध्ये अशक्तपणा आहे आणि त्यामुळेच त्याचा मुलगा माधव याला फारच काळजी वाटते. बाबुलीने दशावतारातून निवृत्त व्हावे अशी माधवची इच्छा. पण, कलासक्त, कलाप्रेमी बाबुलीला ते काही मान्य नाही. परंतु, लेकाच्या आग्रहाखातर ‘तुला नोकरी लागली की मी हे सगळं सोडेन’ असं वचन बाबुली देतो आणि या महाशिवरात्रीला शेवटचा दशावतार करून माझा नवसही फेडण्याची ग्वाही बाबुली देतो.
शेवटच्या दशावताराचा दिवस उजाडतो. पण, हा दिवस बाबुलीच्या आयुष्यात मोठं वादळ घेऊन येतो आणि संपूर्ण कथेलाच वेगळं वळण लागते. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा दोन वेगळ्या कथा चित्रपटात दिसतात. आता हा बाबुलीच्या आयुष्यातला नेमका ट्विस्ट काय आहे, यासाठी चित्रपट पाहावा लागेल.
चित्रपटाचे कथानक जसे पुढे सरकते तसतसे नवीन पात्रांची ओळख होत प्रेक्षकांना होत जाते. महेश मांजरेकर, अभिनय बेर्डे, सुनील तावडे, भरत जाधव असे बरेच कलाकार हे मध्यंतरानंतर प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. गाव, गावातलं जंगल, कातोळबा, राखणदार आणि गावातील लोकांची त्यावर असणारी नितांत श्रद्धा, अशा बर्याच छटा या कथेत दिसून येतात. याशिवाय दशावतारातील अनेक अवतारही प्रेक्षकांना बघायाला मिळतात.
दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन आणि कथालेखनदेखील केले आहे. सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे कथा दोन भागांमध्ये विखुरलेली आहे. सुरुवातीचे बाप-लेकाचे, प्रियकर-प्रेयसीचे गोड नाते आणि दुसर्या भागात कथेने घेतलेले अतिशय वेगळेच रूप पाहायला मिळते. दिग्दर्शकाने उत्तम प्रयत्न केला असला, तरी कथेची योग्य सांगड घालण्यात दिग्दर्शकाची काहीशी तारांबळ उडालेली दिसते. दुसर्या भागातील बरीचशी दृश्ये मनाला पटत नाहीत. असे असले तरीही, चित्रपट प्रेक्षकांना खूपच भावनिक करून जातो. नकळतच प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावतात. याशिवाय बाबुलीची दशावतारातली बरीच रूपंही पाहायला मिळतात. कथानक सुंदर असले तरीही, दशावताराची गुंफण तितकीशी मजबूत बसलेली नाही. चित्रपटात सस्पेन्स फारसा नाही. अगदी अपेक्षित घटना घडताना दिसल्याने, दाक्षिणात्य चित्रपटाशी त्याची तुलना होऊ शकत नाही. पण, मराठीतला हा उत्तम प्रयत्न नक्कीच म्हणता येईल.
एका वायात सांगायचं तर बाबुलीने म्हणजेच दिलीप प्रभावळकर यांनी संपूर्ण सिनेमा काबीज केला आहे. एका एका फ्रेममध्ये ते अतिशय उत्कृष्ट दिसतात. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शनी इंदलकर, विजय केंकरे, रवी काळे, अभिनय बेर्डे, सुनील तावडे, आरती वडगबाळकर, लोकेश मित्तल असे बरेच कलाकार चित्रपटात असले, तरीही ८१ वर्षीय दिलीप प्रभावळकरांचा प्रभाव जराही कमी झालेला दिसला नाही. त्यानंतर माधव म्हणून सिद्धार्थ मेनन आणि वंदू म्हणजेच प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या भूमिकादेखील लक्षात राहण्यासारख्या आहेत. अभिनेते भरत जाधवदेखील वन अधिकार्याच्या भूमिकेत दिसतात पण, या अभिनेत्याला ही भूमिका काहीशी अपुरी वाटते. बाकी कलाकारांनी आपापल्या भूमिका योग्यरित्या साकारल्या आहेत.
एकंदरितच चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर, गुरु ठाकूर यांनी उत्तम संवाद लिहिले आहेत. कलाकारांनीही उत्तम अभिनयासह त्या संवादांना पूर्ण न्याय दिला आहे. सिनेमॅटोग्राफीसुद्धा उत्तम झाली असून, कोकणातील गर्द हिरवळ, घरे नक्कीच नयनसुख देणारे आहे. कलाकारांनी चित्रपटाची मूलाधार असलेली मालवणी भाषासुद्धा, बर्यापैकी आत्मसात केली आहे. चित्रपटाला संगीतही समर्पक मिळाले असून, त्यातील ‘रंगपूजा’ हे गाणं विशेष लक्षात राहणारं आहे. गावातल्या दशावताराच्या कार्यक्रमांचं सुंदर चित्रण पाहायला मिळतं.
बाप-लेकाचं प्रेम अगदी सुंदररित्या चित्रपटातून दाखवलं आहे. अनेक क्षण डोळ्यांच्या कडा ओलावणारे आहेत. मराठी चित्रपटाचे मराठीतच तुलना झाली, तर दशावतार नक्कीच निराश करत नाही. दिग्दर्शक सुबोध खानोलकरांचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यांनी या चित्रपटावर बरीच मेहनत घेतल्याचे दिसूनही येते. मराठीतला अतिशय उत्तम प्रयत्न म्हणजे ‘दशावतार’. अडीच तासांचा हा चित्रपट तुम्हाला नक्कीच एक वेगळा अनुभव देऊन जातो. कुटुंबासह मराठी चित्रपट पाहायचा असेल, तर दशावतार तुम्ही नक्की पाहू शकता.
निर्माते : सुजय हांडे, ओंकार काटे,सुबोध खानोलकर
लेखक-दिग्दर्शक : सुबोध खानोलकर
संवाद-गीत : गुरू ठाकूर
कलाकार : दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शनी इंदलकर, विजय केंकरे, रवी काळे, अभिनय बेर्डे, सुनील तावडे, आरती वडगबाळकर, लोकेश मित्तल
संगीत : ए. व्ही. प्रफुलचंद्र
- अपर्णा कड