घारापुरी - समुद्राच्या कुशीतला सांस्कृतिक ठेवा

    14-Sep-2025
Total Views |

मुंबईच्या वेगापुढे इथल्या अनेक ऐतिहासिक स्थानांकडे प्रत्येक मुंबईकरांचे दुर्लक्ष अनाहुतपणे होतेच. मात्र, मुंबईच्या भोवतालच्या अनेक ऐतिहासिक स्थाळांविषयीची माहिती मुंबईकरांना असतेच. या देशात सर्वत्र स्थापत्य शैलीची उत्तम उदाहरणे आपल्याला दिसतात. अशा स्थापत्यकलेचा वारसा सांगणारी अनेक स्थळेे मुंबई सभोवतालही आहेत. यामधील एक म्हणजेच मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियापासून काही अंतरावर असणार्‍या घारापुरी लेणी होय! या लेण्यांच्या सौंदर्याचा, इतिहासाचा घेतलेला आढावा...

स्वप्नांचे शहर समजल्या जाणार्‍या मुंबईमध्ये, आपल्या प्राचीन स्थपती आणि कलाकारांनी एक महान स्वप्न बघितलं. फक्त बघितलंच नाही, तर ते पूर्णदेखील केलं. या कलाकारांनी जे काही तयार केलं ते १ हजार, ५०० वर्षांनंतरदेखील प्रत्येकाला रोज आकर्षित करत आहे. आजच नाही, तर हजार वर्षांपूर्वी तिथे गेलेल्या अलमसुदी आणि इद्रीसी या परदेशी मंडळींनीदेखील, भरभरून कौतुक केले आहे. ही जागा म्हणजेच मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियापासून काही अंतरावर असणारी घारापुरी लेणी होय. सभोवताली पसरलेला निळाशार समुद्र आणि वर पसरलेले अथांग अवकाश, या दोघांमध्ये हे कलाविश्व निर्माण केले गेले. भारतामध्ये १ हजार, २०० पेक्षा जास्त लेणी कोरल्या गेल्या पण, समुद्राच्या गाभार्‍यात उभे केलेले हे बिंब एकमेवाद्वितीय आहे.

साधारण दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहनांच्या काळात घारापुरी हे भरभराटीला आलेले मोठे बंदर होते, असे तिथे सापडलेल्या अवशेषांवरून दिसून येते. अनेक रोमन, ग्रीक आणि अरबी व्यापारी याठिकाणी येऊन गेले. गुप्त, कलचुरी या घराण्याच्या राजांची अनेक नाणीदेखील याठिकाणी सापडलेली आहेत. कर्नाटकमधल्या ऐहोळे गावात असलेल्या शिलालेखामध्येही या लेण्यांचा उल्लेख येतो. शिलाहार-यादव असा प्रवास करत १५३४ साली पोर्तुगीजांनी, या बेटावर ताबा मिळवला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी आरमाराने हे बेट जिंकून घेतले. त्यानंतर साधारण १८व्या शतकाच्या सुरुवातीपासून ते भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत, हा संपूर्ण भाग इंग्रजांच्या अधिपत्याखाली होता. पोर्तुगीजांच्या काळात, तिथे असणार्‍या मोठ्या हत्तीवरून घारापुरीला ‘एलिफंटा केव्हज’ हे आजचे नाव मिळाले. आज तो प्रचंड मोठा हत्ती जिजामाता उद्यानात (राणीची बाग) ठेवलेला आहे.
घारापुरीमध्ये अनेक लेण्यांचा समूह आहे पण, यातले सर्वांत महत्त्वाचे प्रमुख लेणे हे क्रमांक एकचे आहे. या प्रचंड मोठ्या लेणीमध्ये सर्वतोभद्र गर्भगृह आहे. म्हणजेच चारही बाजूंनी प्रवेश करता येईल असे गर्भगृह इथे असून, आतमध्ये शंकराची भव्य पिंडी दिसते. लेणीमधील भव्य मंडप, एका वेगळ्याच विश्वात आपल्याला घेऊन जातो. एकूण २६ खांबांवर उभा असणारा हा मंडप, अनेक वेगवेगळ्या कक्षांमध्ये विभागला गेला आहे. मंडपाच्या भिंतीवरती अतिविशाल पण तरीही अतिशय सूत्रबद्ध शिल्पं कोरलेली आहेत. अभ्यासक, पर्यटक, कलाकार अशा सर्वांनाच ही शिल्पं मंत्रमुग्ध करून टाकतात.

या शिल्पांना मिळालेल्या अमानुष वागणुकीचे वर्णन, एका पोर्तुगीजानेच करून ठेवलेले आहे. पोर्तुगीज सैनिक मूर्तींवरती बंदुकीतून गोळ्या चालवत असत. आवाजाचा प्रतिध्वनी कसा येतो हे बघण्यासाठी त्यांनी, या शिल्पांवर तोफादेखील उडवल्या होत्या. या शिल्पांचे अवयव तोडणे त्या सैनिकांना आनंद देत होते, हे ‘डी कौटी’ नावाच्या एका पोर्तुगीज अधिकार्‍याने लिहून ठेवलेले आहे. मानवी अत्याचार, समुद्राच्या खारेपणाचा परिणाम आणि ऊन, वारा, पाऊस असे सगळे सहन करत या लेणी आजही उभ्या आहेत. आपल्यात सामावलेली कला समजून घेणार्‍या प्रवाशांची वाट बघत.

घारापुरी लेण्याची मुख्य देवता महादेव आहे. शिवाशी निगडित अनेक वेगवेगळे प्रसंग इथल्या भिंतीवर कोरलेले आढळतात. शिव परिवार मूर्ती, सृष्टीच्या निर्मितीचे दर्शन घडवणारे तांडव नृत्य, असुरांचा संहार करणारा शिव, भगीरथाच्या तपश्चर्येमुळे गंगेला पृथ्वीवर आणणारा शिव, पुरुष आणि प्रकृती यांचे एकत्रित रूप म्हणजे अर्धनारी नटेश आणि सर्वांत महत्त्वाचे तीन मुखांचा सदाशिव अशी अनेक रूपं इथे दिसतात. या सदाशिवाच्या शिल्पाचे एवढे महत्त्व आहे की, महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच या सदाशिवाची भली मोठी प्रतिकृती ठेवली आहे. यातल्या काहींचा विस्तृत परिचय आपण आता करून घेऊयात.

सदाशिव : अनेक मंडळी अनावधानाने या शिल्पाला ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांची एकत्रित त्रिमूर्ती असे समजतात. पण, हे ते शिल्पं नसून, अघोर, तत्पुरुष, वामदेव, सद्योजात आणि ईशान अशी शिवाची पाच तत्त्व सांगणारी सदाशिव मूर्ती आहे. ही तत्त्व म्हणजेच पंचमहाभूतांचे आकार होय. या मूर्तीमध्ये आपल्याला तीन चेहरे दिसतात. तिन्ही चेहर्‍यांची ठेवण वेगळी असून, भावदेखील वेगवेगळे आहेत. डोयावर जटामुकुट असून, सर्वांत समोरचा चेहरा तत्पुरुष, डावीकडचा अघोर, तर उजवीकडचा वामदेवाचा आहे. या शिल्पामध्ये शिवाचे दागिनेदेखील अतिशय सुंदर कोरलेले दिसतात.

गंगावतरण - कपिल ऋषींच्या श्रापाने भस्म झालेल्या सगर पुत्रांना मोक्ष मिळावा, म्हणून स्वर्गामध्ये असणार्‍या गंगेला भगीरथाने पाताळापर्यंत आणले अशी ही कथा आहे. गंगेच्या प्रवाहाने अखंड पृथ्वी वाहून जाईल, म्हणून शिवाची आराधना करून आपल्या जटांमध्ये गंगेला स्थान देण्याचीदेखील विनंती त्याने केली. या संपूर्ण कथेचे शिल्पांकन घारापुरीमध्ये अतिशय सुंदर केलेले आहे. शिवपार्वती एकत्र उभे राहिलेले असून, पायाशी हात जोडून बसलेला भगीरथ आपल्याला दिसतो. पण, या शिल्पातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शिवाच्या जटमकुटावर कोरलेली तीन मुखं असलेली गंगा. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ अशा तिन्ही लोकांमध्ये ती वाहते, म्हणून शिल्पामध्ये तिला तीन मुखे दाखवलेली आहेत. मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक किरीट मंकोडी या गंगेला ‘त्रिपथगामिनी’ असे म्हणतात. आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून, भगीरथाने खूप कठीण तपश्चर्या केली. कदाचित यामुळेच आजही खूप कठीण काम पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या कष्टाला, भगीरथ प्रयत्न म्हणत असावेत.

या शिल्पांबरोबर इथे गणपती, कार्तिकेय, मातृका आणि इतर देवीदेवतांचीदेखील सुंदर शिल्पं कोरलेली आहेत. प्राचीन भारतीय कलाकार आणि स्थपती यांनी, संपूर्ण विश्वाला दिलेली घारापुरी ही अमूल्य भेट आहे. शिवाची व्यक्त आणि अव्यक्त अशी दोन्ही रूपे आपल्याला बघायला मिळतात. एका बाजूला असुरांचा संहार करणारा शिव दिसतो, तर दुसर्‍या बाजूला समाधीस्थ बसलेला महादेव दिसतो.

शतकानुशतके मोक्षाची वाट बघत बसलेल्यांना गंगेच्या माध्यमातून मुक्ती देतो, तर एका बाजूला आपल्या तांडवातून या सृष्टीच्या निर्मितीचे कारण ठरतो. हे सगळे एकत्र ज्याठिकाणी आहे, त्याला या ब्रह्मांडाचे छोटे रूपच आपल्याला म्हणावे लागेल. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या ठिकाणी आपल्याला भेट देता येते. गेटवे ऑफ इंडिया येथून फेरी बोटीने आपण घारापुरी लेण्यांपर्यंत जाऊ शकतो. काही अंतर चालत तर काही अंतर पायर्‍या चढून आपल्याला जावे लागते. सोमवार वगळता बाकी सर्व दिवस या लेणी खुल्या असतात. भारतीय कलाकारांच्या कौशल्याचे प्रतीक असणार्‍या लेणी, प्रत्येकाने एकदा तरी बघाव्यात अशाच आहेत. ज्यांनी बघितल्या आहेत, त्यांनी नवीन दृष्टीने परत याठिकाणी नक्की भेट द्या.

- इंद्रनील बंकापुरे