इस्रायलने पाकिस्तानचे पितळ उघडे पाडले!

    16-Sep-2025
Total Views |

पाकिस्तान हा देश कायम स्वतःच दहशतवादाचा बळी ठरल्याचे ढोंग करत असतो. तसेच, दुसर्‍यांना शांततेचे कोरडे उपदेश देताना, स्वत: मात्र इतर देशात दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेला दिसतो. या पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांत इस्रायलची खोडी काढण्याची आगळीक केली. त्यावर इस्रायलने सगळ्या पापांचा पाढा वाचत पाकिस्तानला आरसा दाखवला.

दहशतवादासंदर्भात पाकिस्तान सातत्याने जी दुटप्पी भूमिका घेत आहे, त्यावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत इस्रायलने पाकिस्तानवर सडकून टीका केली आहे. सुरक्षा परिषदेत इस्रायलने कतारची राजधानी दोहा येथे ‘हमास’च्या बैठकस्थानावर केलेल्या हल्ल्यावरून, पाकिस्तानने इस्रायलवर टीका केली. त्या टीकेस इस्रायलने जोरदार उत्तर दिले. दहशतवादाबाबत दुटप्पी भूमिका घेणार्‍या याच पाकिस्तानने, आपल्या देशात ओसामा बिन लादेन यास आश्रय दिला होता. अत्यंत कुप्रसिद्ध दहशतवादी असलेल्या ओसामा बिन लादेन याचा शोध घेतला जात असताना, पाकिस्तानने त्यास आपल्या देशात आश्रय दिला होता याकडे इस्रायलच्या प्रतिनिधीने लक्ष वेधले.

सुरक्षा परिषदेतील चर्चेच्या वेळी पाकिस्तानचे प्रतिनिधी असीम इफ्तिकार अहमद यांनी इस्रायलने दोहावर केलेला हल्ला म्हणजे, बेकायदेशीर आणि कोणतीही आगळीक झालेली नसताना केलेले आक्रमण असल्याचे म्हटले. इस्रायल सातत्याने आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करीत आहे आणि त्या देशाकडून सीरिया, इराण, लेबेनॉन आणि येमेन यांच्यावर हल्ले केले जात आहेत, अशी टीकाही पाकिस्तानने केली. त्या टीकेला संयुक्त राष्ट्रांतील इस्रायलचे कायम प्रतिनिधी डॅनी डनॉन यांनी सडेतोड उत्तर देताना, पाकिस्तानचे वाभाडे काढले. पाकिस्तान स्वतः दहशतवादात गुंतला आहे. अन्य देशांच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक एकात्मतेचे उल्लंघन करीत आला आहे. सर्व जग ओसामा बिन लादेनचा शोध घेत असताना, पाकिस्तानने या दहशतवाद्यास आश्रय दिला होता. पाकिस्तानचे वर्तन दुटप्पी आहे, अशी टीका इस्रायलच्या प्रतिनिधीने केली. एका दहशतवाद्यास आश्रय दिलाच कसा जातो? असा प्रश्न करून, ओसामा लादेन याच्याबाबत जशी दयामाया दाखविली गेली नाही, तशीच दयामाया ‘हमास’बाबतही दाखविली जाणार नाही, अशा शब्दांत इस्रायलच्या प्रतिनिधीने पाकिस्तानला ठणकावले. असे करून दुटप्पी भूमिका घेणार्‍या पाकिस्तानचे पितळ इस्रायलने सुरक्षा परिषदेत उघडे पाडले. एकीकडे दहशतवाद्यांना आश्रय द्यायचा आणि दुसरीकडे इस्रायलवर टीका करायची, असे वर्तन करणार्‍या पाकिस्तानचे दात इस्रायलने घशात घातले हे चांगलेच झाले!

इस्रायल देश आपल्या ओलीस ठेवलेल्या नागरिकांची ‘हमास’च्या विळख्यातून सुटका करण्यासाठी, अत्यंत आक्रमकपणे शेजारी देशांवर हल्ले करीत आहे. इस्रायलचे काही ओलीस अजूनही ‘हमास’च्या ताब्यात आहेत. ‘हमास’ही नमते घेण्यास तयार नाही. ऑटोबर २०२३ सालापासून ‘हमास’ने ज्यांना ओलीस ठेवले, त्यांची सुटका करायचीच या निर्धाराने जगातील अनेक देशांचा विरोध असतानाही इस्रायल लढत आहे. या संघर्षातून काय निष्पन्न होते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे.

युसूफ पठाणचे अतिक्रमण बेकायदा

क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचा विद्यमान खासदार युसूफ पठाण याने शासकीय जमिनीवर बेकायदा अतिक्रमण केले असल्याचा निकाल, गुजरात उच्च न्यायालयाने दिला आहे. वडोदरा येथील या शासकीय जमिनीचा वाद प्रदीर्घ काळापासून सुरू होता. "युसूफ पठाण प्रसिद्ध व्यक्ती असली, तरी कायद्यातून तिची सुटका होऊ शकत नाही,” असे न्या. मौना भट्ट यांनी आपला निकाल देताना म्हटले आहे. "युसूफ पठाण याने ही जमीन आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रकार बेकायदेशीर आहे,” असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने आपला निकाल देताना, "प्रसिद्ध व्यक्ती असतात, त्यांनी आपले सामाजिक स्थान लक्षात घेऊन, अधिक जबाबदारीने वागावयास हवे. अशा व्यक्तींकडून कायद्याचे उल्लंघन झाल्याने समाजात चुकीचा संदेश जातो,” असे म्हटले आहे. "वडोदरा शहरातील युसूफ पठाणच्या बंगल्यालगतचा ९८७ चौमीचा हा भूखंड असून, तो भूखंड ९९ वर्षांच्या कराराने आपणास देण्यात यावा,” अशी विनंती त्याने वडोदरा पालिका आयुक्तांना केली होती. वडोदरा पालिकेने ही विनंती मान्य केली होती पण, गुजरात सरकारने २०१४ साली ती अमान्य केली. सरकारने पठाण याची विनंती अमान्य केली असतानाही, त्याने त्या जागेस कुंपण घातले आणि त्या जमिनीचा ताबा घेतला. त्यानंतर हे सर्व प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर पठाण याच्या वकिलांनी, विद्यमान खासदार आणि क्रिकेटपटू असलेल्या पठाण यास सदर जमीन व्यक्तिगत आणि कौटुंबिक सुरक्षिततेसाठी आवश्यक असल्याचा युक्तिवाद केला. पण, न्यायालयाने तो अमान्य केला. त्या जागेची बाजारभावाप्रमाणे किंमत देण्याची तयारी पठाणच्या वकिलांनी दर्शविली होती. पण, तीही न्यायालयाने अमान्य केली. असे केल्याने अनधिकृत अतिक्रमणे नियमित केल्याचा चुकीचा पायंडा पडेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. शासकीय जमीन १२ वर्षे बळकावून बसलेल्या युसूफ पठाण याने त्या जमिनीबाबत एक रुपयाही शासनास दिला नाही, अशी माहिती खटल्याच्या निमित्ताने पुढे आली.

पाकिस्तानी गीताने राहुल गांधी यांचे स्वागत!

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच, गुजरात राज्याचा दौरा केला. त्या दौर्‍यावेळी राहुल गांधी यांचे स्वागत पाकिस्तानी गीत वाजवून केल्याची एक चित्रफीत प्रदर्शित झाल्यानंतर, गुजरात राज्यात राजकीय वादळ उठले. "हा सर्व प्रकार अत्यंत लज्जास्पद आहे. त्यामुळे भारताचा आणि भारतीय सैनिकांचा अवमान झाला आहे” असा आरोप, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी केला. राहुल गांधी हे दि. १२ सप्टेंबर रोजी गुजरातमधील जुनागढला गेले होते. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी, पाकिस्तानी गीत लावल्याची चित्रफीत झळकली. समाजमाध्यमांवर सर्वत्र ही चित्रफीत दिसली. भारतीय जनता पक्षाने या घटनेचा तीव्र निषेध केला. "आमचे जवान पाकिस्तानी सीमेवर जागता पहारा देत आहेत आणि काँग्रेसचे समर्थक आपल्या नेत्याच्या स्वागतासाठी, पाकिस्तानचे गीत वाजवितात हे अत्यंत निषेधार्ह आहे,” असे भाजपने म्हटले आहे. पण, आपल्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी गीत वाजवल्याचे राहुल गांधी यांना काही सोयरसुतक असल्याचे दिसून आले नाही. आपल्या भाषणात त्याचा साधा उल्लेखही राहुल गांधी यांनी केला नाही. त्याचा निषेध करणे तर दूरच! त्या सभेत भाजपवर तोंडसुख घेत आपली तीच ती ‘व्होटचोरी’ची टेप लावून, आपल्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पाकिस्तानी गीत आपल्या स्वागतासाठी वाजवले गेल्याचा कसलाही खेद राहुल गांधी यांना झाला नाही!

दि. २१ सप्टेंबर रोजीपासून लडाख महोत्सव!

लडाखची संस्कृती आणि परंपरा यांचे दर्शन घडविणारा लडाख महोत्सव, येत्या दि. २१ सप्टेंबर रोजीपासून सुरू होत आहे. हा महोत्सव चार दिवसांचा असून, तो लडाखचे प्रमुख शहर असलेल्या लेह येथून सुरू होत आहे. केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखचे प्रशासन, पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग आणि अन्य संस्थांच्या मदतीने, या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २१ ते दि. २४ सप्टेंबर असे चार दिवस चालणार्‍या या महोत्सवात, लडाखची समृद्ध परंपरा, कला, संगीत, क्रीडा यांचे दर्शन होणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने, पर्यटकांना आणि स्थानिक जनतेला या प्रदेशाच्या वैशिष्ट्यपूर्ण जीवनाचा परिचय होणार आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाकडून, लेह पॅलेसमध्ये ‘फ्रॉम रुइन्स टू रिव्हायवल’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचवेळी लेहमधील एको पार्क येथे हस्तकला, हातमागावर विणलेल्या वस्तूंचे प्रदर्शन योजण्यात आले आहे. यानिमित्ताने लडाखमधील विविध प्रतिष्ठित व्यक्ती, बौद्ध भिक्खू, कलाकार यांची एक सांस्कृतिक मिरवणूक काढण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने, पर्यटनविषयक बरेच माहितीपट दाखविण्यात येणार आहेत. लडाखमध्ये लामायुरू, स्पितुक, ठिकसे, दिकसित, हेमिस असे प्रसिद्ध बौद्ध मठ आहेत. त्यातील हेमिस येथे दरवर्षी उन्हाळ्यात वार्षिक उत्सवाचे आयोजन केले जाते. तसेच, गेल्या काही दशकांपासून जी ‘सिंधूदर्शन यात्रा’ आयोजित केली जाते, तीही संपूर्ण भारतातील पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे.

दत्ता पंचवाघ
९८६९०२०७३२