एजेंटिक एआय : काम करून देणारा डिजिटल सहकारी

    13-Sep-2025
Total Views |

रविवारची सकाळ. हॉटेलात नेहमीप्रमाणे जयंतराव, आदित्य आणि मित्रमंडळी जमली होती. चहा-पोहे मागवले गेले आणि नेहमीप्रमाणे चर्चेचा विषय तंत्रज्ञानाकडे वळला. आदित्य, मागच्या वेळी तू ‘एजेंटिक एआय’बद्दल बोलला होतास. हा ‘एजेंट’ म्हणजे नक्की काय रे? माझ्या डोयात फक्त दोनच एजेंट येतात, एक ‘एलआयसी’ एजेंट आणि दुसरा रेल्वे तिकीट एजेंट, जयंतरावांनी हसत विचारले.

माधवकाका लगेच म्हणाले, अरे आणि तो ‘जेम्स बॉण्ड’सारखा एजेंट असतो ना, गुप्तहेर! तो तर जास्तच भारी असतो.

आदित्य हसला. आजोबा, तुम्ही बरोबर आहात. आपल्यासाठी एजेंट म्हणजे अशी व्यक्ती, जी आपल्यासाठी काहीतरी काम करते. ‘एलआयसी’ एजेंट तुमच्यासाठी पॉलिसी शोधतो, रेल्वे एजेंट तिकीट बुक करतो आणि गुप्तहेर एजेंट देशासाठी काम करतो. ‘एजेंटिक एआय’ ही अशीच एक प्रणाली आहे, जी तुमच्यासाठी काम करते पण, तो माणूस नाही, एक डिजिटल सहकारी आहे.

सध्याच्या ‘एआय’मध्ये तुम्ही फक्त प्रश्न विचारता आणि तो उत्तर देतो. तुम्ही त्याला ‘माझ्यासाठी जेवण ऑर्डर कर’ असं सांगू शकत नाही पण, ‘एजेंटिक एआय’मध्ये तुम्ही त्याला उद्दिष्ट सांगता आणि तो स्वतःच काम पूर्ण करतो. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं की, अAI will evolve from copilots that help you, to agents that work for you.. याचा अर्थ स्पष्ट आहे, ‘एआय’ आता आपल्याला मदत करणारा ‘सहप्रवासी’ नाही, तर आपल्यासाठी प्रत्यक्ष काम करणारा ‘सहकारी’ (Agent) बनत आहे.

हा डिजिटल ‘एजेंट’ नक्की काय करतो?


‘एआय एजेंट’ हा काही जादुई रोबोट नाही, तर एक अत्यंत प्रगत सॉफ्टवेअर आहे, जे भविष्यात आपल्या स्मार्टफोन किंवा संगणकावर उपलब्ध होईल. चला, एका उदाहरणातून समजून घेऊ.

समजा, आजोबांना आता जेवण ऑर्डर करायचं आहे. त्यांनी आपल्या फोनमधील डिजिटल एजेंटला फक्त एवढंच सांगितलं, अरे, दुपारी ३ वाजता गरमागरम मसाले भात ऑर्डर कर, जो खाण्यासाठी चांगला असेल आणि बजेटमध्येही बसेल.

आता हा डिजिटल एजेंट एखाद्या अनुभवी एजेंटप्रमाणे लगेच कामाला लागतो.

१. तो योजना आखतो : ३ वाजता ऑर्डर करण्यासाठी योग्य वेळ कोणती हे ठरवतो.

२. माहिती शोधतो :
तो झोमॅटो, स्विगी, इतर फूड अॅप्स आणि जवळपासच्या रेस्टोरेंटमध्ये ‘मसाले भात’ शोधतो.

३. विश्लेषण करतो : तो रिव्ह्यूज तपासतो, रेटिंग्स पाहतो आणि बजेटनुसार सर्वांत चांगला पर्याय निवडतो.

४. कृती करतो : एकदा निर्णय झाल्यावर, तो पेमेंट गेटवेला (गूगलपे, फोनपे, अमॅझॉनपेवगैरे) जोडून ऑर्डर करतो, पेमेंट करतो आणि डिलिव्हरीची वेळ कन्फर्म करतो.

५. अहवाल देतो :
शेवटी, तो जयंतरावांना एक मेसेज पाठवतो, तुमची ऑर्डर कन्फर्म झाली आहे. डिलिव्हरी वेळेवर मिळेल.

हे सगळं काही सेकंदात होतं, ज्यात कोणताही मानवी हस्तक्षेप नसतो. गूगल डीपमाईंडचे प्रमुख डेमिस हासाबिस म्हणतात, Agents are where AI meets action. They combine reasoning with the ability to operate in the real world.. म्हणजे ‘एआय’ आता केवळ विचार करत नाही, तर तो प्रत्यक्ष कृती करतो.

‘एजेंटिक एआय’ एका लूपमध्ये किंवा साखळीमध्ये काम करतो. तो फक्त एकच काम करून थांबत नाही, तर तो सातत्याने उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी काम करतो. यात उद्दिष्ट ठरवणे, योजना तयार करणे, कृती करणे आणि पुनरावलोकन करणे, या चार महत्त्वाच्या पायर्या असतात. तो स्वतः केलेल्या कृतीचे विश्लेषणही करतो आणि भविष्यात अधिक चांगले काम कसे करता येईल, याचाही विचार करतो.

दैनंदिन जीवनातील वापर आणि व्यवसायातील क्रांती

‘एजेंटिक एआय’ची ताकद फक्त मोठ्या कामांमध्ये नाही, तर आपल्या रोजच्या जीवनातील लहान-सहान गोष्टींमध्येही दिसते.

वैयक्तिक मदतनीस म्हणून :
तुमचा एजेंट तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर आजच्या दिवसाचे वेळापत्रक सांगू शकतो, महत्त्वाची बिलं भरण्याची आठवण करून देऊ शकतो आणि तुमच्यावतीने ती भरूही शकतो. तो तुमच्या आवडत्या शॉपिंग वेबसाईटवरून तुमच्यासाठी ऑर्डर देऊ शकतो.

ऑफिसमधील कामांसाठी : ऑफिसमध्ये येणारे शेकडो ईमेल्स वाचून त्यातील महत्त्वाच्या गोष्टींचा सारांश तयार करणे, एसेल शीटमधील डेटा वापरून रिपोर्ट बनवणे, मीटिंगचा अजेंडा तयार करणे किंवा मीटिंग नोट्स तयार करणे, ही कामे ‘एजेंटिक एआय’ काही मिनिटांत करू शकतो.

व्यवसायातील क्रांती :
मोठ्या व्यवसायांमध्ये ‘एजेंटिक एआय’ची उपयुक्तता प्रचंड आहे.

वित्तविभाग : एखादा ग्राहक पेमेंट करण्यास उशीर करत असेल, तर एजेंट आपोआप आठवण करणारी मेल पाठवतो, पेमेंटचा पाठपुरावा करतो आणि अकाऊंटंटसाठी एक तपशीलवार रिपोर्टही तयार करतो.

उत्पादनविभाग : गोदामात कच्चा माल कमी झाल्यावर, एजेंट स्वतःच नवीन मालाची ऑर्डर देतो आणि पुरवठादाराशी किंमत आणि डिलिव्हरीच्या वेळेबद्दल वाटाघाटीही करू शकतो.

आरोग्यसेवा : रुग्णाचे रिपोर्ट तपासणे, डॉटरांना सारांश देणे, लॅबचे रिपोर्ट तपासणे आणि त्यानुसार फॉलो-अप अपॉईंटमेंट बुक करणे ही कामे तो सहज करतो.

कायदेविभाग :
करार तपासणे, त्यातील धोके अधोरेखित करणे आणि कागदपत्रांचा सारांश तयार करण्याचे काम वकील एजेंटकडून करून घेऊ शकतात.

यामुळे डॉटर, वकील, अकाऊंटंट किंवा इतर कोणत्याही व्यावसायिकाची नोकरी धोयात येणार नाही, उलट त्यांची कार्यक्षमता अनेक पटींनी वाढेल.

आव्हाने आणि सुरक्षितता

‘एजेंटिक एआय’चे अनेक फायदे असले तरी, काही गंभीर प्रश्नही समोर येतात.

जबाबदारी : जर एजेंटने चुकीचा निर्णय घेतला, जसे की चुकीचे बिल भरले किंवा चुकीची औषध ऑर्डर केली, तर त्याची जबाबदारी कोणाची? कायद्याच्या दृष्टीने या प्रश्नांची उत्तरे देणे अजूनही बाकी आहे.

गोपनीयता : एजेंटला आपल्या अनेक वैयक्तिक माहितीची, जसे की बँक डिटेल्स, आरोग्य माहिती, आणि खासगी संभाषणे यांची गरज असेल. ही माहिती किती सुरक्षित राहील, हा एक मोठा प्रश्न आहे.

पारदर्शकता : एखाद्या ‘ब्लॅक बॉस’प्रमाणे एजेंटने कोणताही निर्णय का घेतला, हे समजून घेणे कठीण असू शकते. त्याने एका विशिष्ट शेअर्समध्ये गुंतवणूक का केली किंवा ठराविकच रेस्टोरंटमधून जेवण का ऑर्डर केल?े, हे आपल्याला कळायला हवे.

या प्रश्नांमुळे हे स्पष्ट होते की, अंतिम निर्णय नेहमीच माणसाने घ्यायला हवा. तंत्रज्ञान कितीही प्रगत असले, तरी मानवी बुद्धिमत्ता, भावना आणि नैतिक मूल्यांची जागा घेऊ शकत नाही.

भारतीय संदर्भ आणि भविष्याची झलक

भारत हा एक प्रचंड मोठा आणि वैविध्यपूर्ण देश आहे. ‘एजेंटिक एआय’चा वापर भारतातही हळूहळू, पण प्रभावीपणे सुरू झाला आहे.

लघु आणि मध्यम उद्योगांसाठी : छोट्या व्यावसायिकांसाठी नेहे, ढरश्रश्रू यांसारख्या अॅप्समध्ये, बिलिंग आणि पेमेंट रिमाईंडर्स आपोआप पाठवले जातात.

शेती :
हवामान आणि किडींच्या अंदाजावर आधारित ‘एआय’ एजेंट, शेतकर्याला योग्य वेळी फवारणी करण्याचा सल्ला देऊ शकतो.

न्यायालयीन क्षेत्र : न्यायालयातील दस्तऐवज तपासणे, नोट्स तयार करणे, जुने निकाल शोधणे ही कामे एजेंट वकिलांना जलद गतीने करून देतात.

ही एक भविष्याची झलक आहे. सध्या अस्तित्वात असलेले ‘एआय’ अॅप्स आणि प्रणाली हे या ‘एजेंटिक एआय’ तंत्रज्ञानाची फक्त पहिली पायरी आहे पण, हे सर्व एका रात्रीत घडणार नाही. आज अनेक कंपन्या आणि संशोधक या दिशेने काम करत आहेत.

जयंतराव म्हणाले, असं वाटतंय, आपलं जग आता खरंच बदलणार आहे.

‘एजेंटिक एआय’ हे बदलाचे सर्वांत मोठे कारण असेल. भविष्यात आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये एक ‘एआय मॅनेजर’ असेल, जो आपल्या दैनंदिन कामांची जबाबदारी उचलेल. कंपन्यांमध्ये ’Procurement Agent', 'HR Agent', 'Finance Agent' असे स्वतंत्र एजेंट्स काम करतील. घराघरात डिजिटल साहाय्यक आपल्या दैनंदिन निर्णयांची जबाबदारी उचलतील.

आदित्य हसला. हो आजोबा आणि बदलाच्या या प्रवासात ‘एजेंटिक एआय’ हा आपला नवीन सोबती असेल. जो फक्त बोलणार नाही, तर काम करून दाखवेल!

(डॉ. कुलदीप देशपांडे हे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्यांना अॅनेलिटिस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रातील २५ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘एलिशियम सोल्युशन्स’ या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काम करणार्या जागतिक स्तरावरील कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.)
९९२३४०२००१