अभिनेता, व्यक्तिरेखा आणि नाटकाचे तिसरे नेत्र

    14-Sep-2025
Total Views |

नाटक म्हणजे प्रेक्षकांसमोर थेट सादर होणारी कथा, जिथे कलाकार आणि प्रेक्षक दोघेही एका मानसिक अवस्थेत प्रवेश करतात. रंगमंचावरील घडामोडी खर्‍याखुर्‍या, जिवंत भासतात. नाटक आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातं. अशा जगात, जे केवळ सादरीकरणाच्या कौशल्याने निर्माण झालेलं असतं. कल्पक भावनांचा प्रवास कथा रूपात मांडला जातो आणि नाटकाद्वारे प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचतो. विशेषतः व्यक्तिरेखांद्वारे...

विध रंगमंचीय घटकांचा समावेश नाटकात असतो. जसे की, सहकलाकार, संगीत, प्रकाश, ध्वनी परिणाम, मेकअप, वेशभूषा. या प्रत्येक गोष्टीमुळे नाट्यगृहात जिवंतपणा येतो, ऊर्जा निर्माण होते आणि या सार्‍या अनुभवाच्या केंद्रस्थानी असतो कलाकार. कलाकार म्हणजे भावनांचा वाहक, विचारांचे माध्यम आणि परिस्थितींचा प्रवासी. कलाकार म्हणजे वाहनचालक आणि प्रेक्षक म्हणजे सहप्रवासी. या प्रवासाचा शेवट काय असतो? आनंद, शांतता, अंतर्मुखता किंवा समाधान, नाटकाचा हेतू जो काही असेल तो. कलाकाराची जबाबदारी म्हणजे, हा प्रवास थरारक, भावनिक, मनोवेधक किंवा विचार करण्यास प्रवृत्त करणारा करणे. हे सर्व कथानकाच्या स्वरूपानुरूपच आधारित असते.

पात्र - या प्रवासाचा खरा मालक

कलाकार हे वाहन चालवत असतो. पण, प्रवासाचे नियंत्रण पात्राकडे असते. पात्रच ठरवतं की, प्रेक्षकांनी काय अनुभवावं. रंगमंचावर उमटणारी प्रत्येक भावना हे कलाकार किती खोलवर त्या पात्रात एकरूप झाला आहे, यावर अवलंबून असते. हे साध्य करण्यासाठी, एक विशिष्ट प्रक्रिया आवश्यक असते;
१. स्वतःला जाणून घ्या
२. पात्र समजून घ्या
३. पात्र बना
४. आणि सादरीकरणानंतर पात्रापासून स्वतःला वेगळं करा

कलाकाराची दुहेरी भूमिका

कलाकार जेव्हा अभिनय करतो, तेव्हा तो दोन स्तरांवर जगतो. एका पातळीवर तो साक्षी असतो; मंच, प्रकाश, संकेत यांची जाणीव ठेवणारा. दुसर्‍या पातळीवर तो पात्राशी एकरूप होतो त्या पात्राच्या भावनांमध्ये, विचारांमध्ये. याच क्षणी खरा अभिनय जन्म घेतो.त्यावेळी प्रेक्षक म्हणतात, तो तर पूर्ण पात्रातच शिरला होता किंवा पात्र जणू काही जिवंत झालं!

अभिनयाचे तिसरे नेत्र

एक उत्कृष्ट कलाकार अभिनय करताना मनाचे डोळे उघडे ठेवतो. तो पात्राच्या भावना, विचार, आणि मानसशास्त्रीय स्थितीमध्ये पूर्णपणे शिरतो. पण, एकाच वेळी तो बाह्य वास्तवाची जाणीवही ठेवतो. ही भावनिक उपस्थितीतून आलेली जाणीव म्हणजेच अभिनयातील तिसरे नेत्र.

तर हे तिसरं नेत्र म्हणजे काय?

हे आहे साक्षीभाव आणि सहभाग यांचं एकत्रित अस्तित्व. भावना, शरीर, आणि मन पात्राशी जोडलेले असतानादेखील सादरीकरण समजून, निरीक्षण करून, आवश्यकतेनुसार बदल करून अभिनय करणे. या अवस्थेत कलाकार आणि पात्र यांचे विलीनीकरण होते. कलाकाराच्या ‘खव’ मध्ये जिथे अहंभाव नाही, फक्त शुद्ध अस्तित्व असते. या प्रक्रियेत, अहंभाव लोपतो, व्यक्तिमत्त्व सैल होते आणि तिसरे नेत्र जागृत होते. हेच तिसरे नेत्र कलाकाराला प्रामाणिक, सच्चा आणि प्रभावी अभिनय करण्याची ताकद देते.

समजून घेणे; अभिनयाची खरी सुरुवात

आपण अभिनयाबद्दल बोलताना निरीक्षण, लक्ष, मांडणी आणि सादरीकरण यांसारखे शब्द वापरतो. हे सगळे घटक महत्त्वाचे असले, तरी यांच्यात एक दुवा आहे तो म्हणजे समज. मी समज या संकल्पनेला वेगळे मानते. कारण, निरीक्षण आणि लक्ष सहजस्फूर्त असू शकतात आणि सादरीकरण सरावातून येते. पण, समज ही सर्जनशील विचारसरणीची देण आहे. पात्र म्हणजे काय? शब्दकोशात त्याला एक अशी व्यक्ती म्हटले आहे, जी कथा, नाटक किंवा चित्रपटात विशिष्ट व्यक्तिमत्त्व, उद्दिष्टे आणि प्रेरणा घेऊन वागत असते. पण, खर्‍या अर्थाने पात्र समजून घेणे म्हणजे काय?

पात्र समजून घेण्याची सुरुवात : कल्पना आणि चौकशीच्या माध्यमातून हे लहान कलाकार नेहमी विचारतात, "हे पात्र मी समजावं तरी कसं?” या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक मुलाचं वय, लिंग, शरीरबांधा, सामाजिक पार्श्वभूमी आणि अनुभवावर अवलंबून असतं. पात्र हे काल्पनिक, वास्तविक, पौराणिक, चमत्कारिक किंवा ऐतिहासिक असू शकते. पण, समजून घेणे आवश्यक असतेच. स्वतःच्या अनुभवातून नाट्यकला शिकवताना आणि भरतमुनींच्या नाट्यशास्त्राच्या अभ्यासातून मी एक पद्धत विकसित केली आहे, जी मुलांना पात्र समजून घेण्यास मदत करते. मी त्यांना वेगवेगळ्या विषयांच्या दृष्टिकोनातून पात्राचा अभ्यास करायला सांगते.

शैक्षणिक दृष्टिकोनातून पात्र समजून घेणे

इतिहास-पात्राचा भूतकाळ काय आहे?
कोणते प्रसंग त्याच्या आयुष्यात घडले?
भूगोल-पात्र कुठे राहते? त्याचे वातावरण आणि जीवनशैली कशी आहे?
जीवशास्त्र-त्याच्या नैसर्गिक सवयी, प्रतिक्रियांचा प्रकार काय आहे?
भौतिकशास्त्र-शरीरयष्टी, हालचाल, उभे राहण्याची शैली कशी आहे?
रसायनशास्त्र-इतर पात्रांशी त्याचे संबंध, नातेसंबंध आणि भावना काय आहेत?
मानसशास्त्र-पात्राच्या मनात काय आहे? त्याच्या प्रेरणा, भीती, इच्छा कोणत्या आहेत?

अशा शब्दात समजावून सांगितले की, त्यांना मजा वाटते. मग मुलांना व्यक्तिरेखेचा स्वतःशी तुलनात्मक विचार करायलाही सांगते. तू कसा आहेस आणि व्यक्तिरेखा कशी आहे, याचा विचार करायला सांगते. मग तू जर ती व्यक्ती असती, तर काय केले असते,काही वेगळे केले असते का?

मग आता तू, तू नसून ते पात्र आहेस. आता ते पात्र तुझ्याकडे बघते आहे, त्याला तू कसा वाटतो आहेस, असे सगळे मनाचे खेळ खेळत, हळूहळू त्या पात्रात शिरायला मदत होते. हा प्रवास मोठा जरी वाटत असला, तरी फारच आल्हाददायक असतो. एकदा का भूमिकेची नस सापडली की, मग कधी एकदा रंगमंचावर ती सादर करतो आहोत, असे होते.

त्याचे चरित्र दर्शन नाटकाच्या कथेतून होते. नाटकाची तालीम होत जाते, तसे चरित्रातले गुण आणि अवगुण जाणवायला लागतात. त्याच्या क्षमता आणि कमतरता दिसायला लागतात. हे सगळं उलगडायला वेळ द्यावा लागतो, घ्यावा लागतो. मग पक्की पकड बसते. भूमिका वाढवण्यासाठी ऊर्जा लागते, कामातला उत्साह लागतो आणि सातत्य ही!

- रानी राधिका देशपांडे