
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात संघाच्या शतकी वाटचालीचा, कामगिरीचा आणि राष्ट्रजीवनात असणाऱ्या योगदानाचा वेध घेणारे विपुल साहित्य प्रकाशित होत आहे. भारतात गेल्या १०० वर्षांत अनेक चळवळी आणि संघटना जन्माला आल्या. मात्र, कालांतराने त्यांचे अस्तित्व तरी संपुष्टात आले किंवा त्या निष्प्रभ तरी ठरल्या. संघाने मात्र अनेक संकटांचा सामना करीतही आपले कार्य वर्धिष्णू ठेवले. त्यामुळेच संघाच्या या वाटचालीच्या रहस्याचा शोध अनेक अभ्यासक घेत असतात. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ते संघाचा अभ्यास करीत असतात. प्रा. डॉ. विजय धारूरकर यांनी ‘सहा सरसंघचालक’ या पुस्तकातून संघाला लाभलेल्या नेतृत्वाचा वेध घेतला असला, तरी त्यातून उलगडतो तो संघाच्या वाटचालीचा पट.
डॉ. वि. रा. करंदीकर यांचे ‘तीन सरसंघचालक’ हे पुस्तक नावाजले गेले होते. पहिल्या तीन सरसंघचालकांच्या नेतृत्वाचा व कार्याचा सविस्तर आणि साक्षेपी धांडोळा डॉ. करंदीकर यांनी त्या पुस्तकातून घेतला होता. त्या पुस्तकाचा हिंदी अनुवादही उपलब्ध आहे. डॉ. धारूरकर यांचे प्रस्तुत पुस्तक डॉ. करंदीकर लिखित पुस्तकाइतके तपशीलवार नसले, तरी डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्यापासून विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्यापर्यंतच्या १०० वर्षांच्या काळाचा पट त्यांनी सुमारे २०० पृष्ठांतून उलगडून दाखविला आहे, हे या पुस्तकाचे वेगळेपण. पुस्तकात ११ प्रकरणे आहेत आणि त्यांतील सहा ही अर्थातच पुस्तकाच्या शीर्षकाला साजेशी म्हणजे सहा सरसंघचालकांच्या कार्याचा धांडोळा घेणारी आहेत. या सहा प्रकरणांना जोड मिळाली आहे, ती संघाच्या प्रारंभीच्या काळातील वाटचालीचा मागोवा घेणाऱ्या तसेच, शतकोत्तर वाटचाल करणार्या संघासमोर येणार्या काळात असणार्या संधी व आव्हाने यांचा वेध घेणाऱ्या प्रकरणांची.
लेखकाने पहिल्या दोन प्रकरणांतून संघाच्या वाटचालीचा मागोवा घेतला आहे. त्यात संघ स्थापनेमागील डॉ. हेडगेवार यांची मनोभूमिका, संघाची पहिली शाखा, संघावर आलेल्या बंदी इत्यादी वर्णने येणे स्वाभाविक. मात्र, त्यावरच न थांबता, लेखकाने ‘स्वातंत्र्य चळवळीत संघ कुठे होता,’ या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः स्वतः डॉ. हेडगेवार यांच्या त्या लढ्यातील सहभागाची उदाहरणे लेखकाने दिली आहेत. पुढील प्रकरणांत सहा सरसंघचालकांनी संघाचा संख्यात्मक आणि गुणात्मक विकास कसा केला, याचा वेध लेखक घेतो. त्यातून मुळात डॉ. हेडगेवार यांच्या द्रष्टेपणावर लेखकाने भर दिला आहे. संघटन उभे करताना डॉ. हेडगेवार यांनी प्रचारकांची फळी तयार केली, हा अगदी निराळा प्रयोग होता, याकडे लेखक लक्ष वेधतो. गोळवलकर गुरुजींच्या कार्यकाळात संघासमोर अत्यंत कठीण अशी आव्हाने होती. संघटन कार्याचा आदर्श वस्तुपाठ गोळवलकर गुरुजींनी नवभारतापुढे ठेवला, असे लेखक लिहितो. बाळासाहेब देवरस यांचा उल्लेख लेखकाने ‘समरसतेचा दीपस्तंभ’ असा केला आहे; तो सार्थ असाच. सुमारे दोन दशके देवरस यांनी संघाचे नेतृत्व केले. भारतासमोरील आर्थिक, सामाजिक, राष्ट्रीय समस्यांच्या निराकरणासाठी देवरस यांनी ‘सामाजिक समरसता’ हे तत्त्वसूत्र मांडले, असे निरीक्षण नोंदवितानाच लेखकाने बाळासाहेबांनी संघ नेतृत्वास भारताच्या राजकीय पटलावर लोकमान्यता व राजमान्यता प्राप्त करून दिली, असे नमूद करतो. प्रा. राजेंद्र सिंह, सुदर्शनजी यांच्या काळात संघाचे स्वरूप अधिक विराट झाले, त्याचा वेध लेखक घेतो. विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या ‘भविष्यातील भारत’ या ग्रंथाचा उल्लेख लेखक करतो आणि एका अर्थाने भविष्यकालीन भारताचे स्वप्न आणि त्यासाठी संघाचे योगदान यांचा मेळ डॉ. भागवत घालत आहेत, असे सूचित करतो.
संघाने गेल्या १०० वर्षांत राष्ट्रजीवनात मूलभूत योगदान दिले आहे. नव्या युगाची आव्हाने निराळी आहेत. त्यादृष्टीने ‘शाश्वत विकासात संघ’ हे प्रकरण उल्लेखनीय. लेखकाने १७ विकास-लक्ष्यांचा उल्लेख त्यात केला असून, त्यात दारिद्य्र उच्चाटनापासून दर्जेदार शिक्षणापर्यंत आणि शाश्वत शहरांपासून पायाभूत सुविधांपर्यंत अनेक लक्ष्ये आहेत. या सर्वांत संघाने प्रत्यक्ष सहभाग घ्यावा, असे लेखकाला अभिप्रेत नाही. मात्र, या नव्या आव्हानांना भिडण्यासाठी संघाने दिशा द्यावी. एकूणच ‘संघाच्या वाटचालीचा धावता आढावा’ असे या पुस्तकाचे वर्णन करता येईल.
पुस्तकाचे नाव : सहा सरसंघचालक
लेखक : प्रा. डॉ. विजय धारूरकर
प्रकाशक : वरदा प्रकाशन, पुणे
पृष्ठसंख्या : १८३
मूल्य : २५० रुपयेराहूल गोखले