मुंबई (प्रतिनिधी) : (Attack on Police) अंगावर उकळते पाणी फेकल्याने भाईंदर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह सहाजण गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच मीरा-भाईंदरमध्ये घडली. भाईंदर (प) येथील गीता नगर भागात असलेल्या वालचंद प्लाझा इमारतीच्या बी-विंगमधील फ्लॅट क्रमांक २०४ मधून मंगळवारी हा हल्ला झाला.
हे वाचलंत का? : राज ठाकरेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!
एका ३९ वर्षीय महिलेवर बॅट, गॅस सिलिंडर आणि कुकरने अमानुष हल्ला करणाऱ्या काही सदस्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक सोमवारी दुपारी या ठिकाणी गेले होते. संबंधित चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर मंगळवारी पोलिसांचे पथक घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी आणि आरोपींना अटक करण्यासाठी गेले असता आरोपींनी दार उघडले नाही. तेव्हा पोलिसांच्या पथकाने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी उकळते पाणी त्यांच्यावर फेकले. यात एक अधिकारी आणि पाच हवालदार गंभीर भाजले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. तर पोलिस पथकावर हल्ला केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला आहे. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना भाईंदर येथील भारतरत्न भीमसेन जोशी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.