हिंदूंना हिंसक म्हणणाऱ्या राहुल गांधींचा त्रिवार धिक्कार! : मोहन सालेकर

    02-Jul-2024
Total Views |
mohan salekar on rahul gandhi
 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :      काँग्रेस खासदार तथा लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी संसदेच्या अधिवेशनात बोलताना हिंदू समाजाला हिंसक म्हणून संबोधले. राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांनी वेळोवेळी हिंदूंना अपमानित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हिंदू आतंकवादाचे नरेटीव्ह निर्माण करणारी पिलावळ यांच्याच कुळातील होती. हिंदूंना हिंसक म्हणणाऱ्या राहुल गांधींचा त्रिवार धिक्कार; अशा तीव्र शब्दांत विश्व हिंदू परिषदेचे प्रदेश मंत्री मोहन सालेकर यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

सालेकर पुढे म्हणाले, "राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्याने तमाम हिंदू धर्मियांच्या भावनांवर आघात केला आहे. तसेच त्यांच्या अशा प्रकारच्या बोलण्यातून हिंदू धर्माला आणि संस्कृतीला बदनाम करण्याची विकृत मानसिकताच प्रकट होते. विरोधी पक्षनेते झाल्यावरतरी ते जबाबदारीने वागतील, बोलतील अशी अपेक्षा असणाऱ्यांची त्यांनी घोर निराशा केली आहे."
 

राहुल गांधींनी संसदेत भगवान शंकरांचा फोटो दाखवत 'अभय मुद्रे'चा उल्लेख केला. त्यावर बोलताना मोहन सालेकर म्हणाले, "भगवान शंकराला तिसरा नेत्र आहे आणि तो उघडला तर सर्व काही भस्मसात होते. हिंदू धर्माला वारंवार अपमानित करणाऱ्यांनी हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, हिंदू समाजाने आपला तिसरा नेत्र उघडला तर राहुल गांधींची काँग्रेसी विचारधारा त्या क्रोधाच्या अग्नीत जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही."

संसद सभागृहात विरोधी पक्षनेता या नात्याने बोलताना त्यांनी केवळ हिंदूंचा अपमान केला नाही तर घटनेच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वांचीही पायमल्ली केली आहे. म्हणून लोकसभेच्या अध्यक्षांनी राहुल गांधींचे सदस्यत्व तात्काळ रद्द करून संसदेच्या आणि घटनेच्या प्रतिष्ठेचे रक्षण करावे, अशी आग्रही मागणी मोहन सालेकर यांनी केली आहे.