सरस्वती विद्यामंदिर शाळेचे अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण

    11-Jul-2024
Total Views |

saraswati school  
 
मुंबई : सर्व स्तरातील विद्यार्थ्यांची उज्वल भविष्याची स्वप्ने साकार करण्याचे बळ देणारी सरस्वती विद्यामंदिर ही शाळा यंदाच्या वर्षी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करते आहे. यानिमित्ताने शाळेने यंदाच्या वर्षी विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे.
शाळेच्या संस्थापिका मुक्ता कोटणीस यांनी या शाळेची पायाभरणी केली. तेव्हापासून आजपर्यंत शाळेचा आलेख चढता आहे. ७५ वर्षांपूर्वीचे शाळेचे विद्यार्थी अजूनही शाळेशी उत्तम संपर्क ठेवून आहेत.
 
साली हे विद्यार्थी सांगतात,"१९५० साली माहीम पश्चिम भागात सारस्वत कॉलनी नावाच्या गृहसंकुलात केवळ बालवाडीतील बारा मुलांच्या पटसंख्येने शाळेची सुरुवात झाली. मुले उत्तीर्ण होत गेली तसे शाळेचे वर्ग वाढत गेले. १९६१ साली १७ मुलांचा पहिला वर्ग मॅट्रिकच्या परीक्षेला बसला. मराठी बरोबर इंग्रजी माध्यम सुरु झाले, विद्यार्थीसंख्या वाढत गेली तसे मजल्यावर मजले चढत गेले आणि २००७ सालापासून शाळेची पाच मजली इमारत दिमाखात उभी राहिली जिथे आज २७०० विद्यार्थी शिकत आहेत."
 
 आजही या शाळेतील विद्यार्थ्यांपैकी अनेक त्यांच्या कुटुंबातील शिक्षण घेणारी पहिली पिढी आहेत. तरीही शैक्षणिक आणि शिक्षणेतर उपक्रमांमध्ये शाळेला मिळणारे यश लक्षणीय आहे. शाळेचा दहावीचा निकाल ९७-९९ टक्क्यांपर्यंत लागतोच, पण महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा, होमी भाभा बाल वैज्ञानिक पुरस्कार, नॅशनल टॅलेंट सर्च स्पर्धा इंग्लिश आणि गणित ऑलिम्पियाड अशा अनेक परीक्षांमध्ये या शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
 
भारतीय नौसेना विशेष दलात मार्कोस कमांडो म्हणून कार्यरत असलेला आदित्य तेरवनकर, चांद्रयान मोहिमेतील चिन्मय शिरोडकर, मत्स्य संशोधन क्षेत्रातील संशोधक डॉ पूजा विंदे असे माजी विद्यार्थी हा शाळेचा अभिमान आहे. सर्वोत्कृष्ट शाळा (२०१९-२०); स्वच्छ शाळा (२०२२), शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार अशा पुरस्कारांनी शाळेला गौरवले आहे.
 
तसेच, आदर्श शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक अशा मानचिन्हांनी इथल्या शिक्षकवृंदाला सन्मानित करण्यात आले आहे. ७५ वर्षातील सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमेळावा, विविध स्पर्धांचे आयोजन, क्रीडा स्पर्धांचे आयोजन विशेषतः खो खो मॅचेस, आजपर्यंत शाळेत पहिले आलेल्या ६५ विद्यार्थ्यांचा सन्मान आणि येत्या शिक्षक दिनी विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शाळा प्रशासनाने दिली आहे.