पाण्यासाठी झटणारे सतीश खाडे

    10-Jun-2024
Total Views |
 Satish Khade

पाणी वाचवणे हे सध्याचे सगळ्यात मोठे आव्हान आहे. पाण्याचा अपव्यय वाढल्याने, भविष्यात तीव्र पाणी टंचाई आ वासून उभी आहे. हे होऊ नये यासाठीच काम करणार्‍या सतिश खाडे यांच्याविषयी...

माणसाला ठोकरा बसल्या की, तो शहाणा होतो. हे कितीही खरे असले तरी, माणूस प्रगल्भ असला की त्याला इतरांसाठीही काही चांगलं करण्याची जाणीव होते, त्यावेळी समाजहिताचे सर्वोत्तम काम होत असल्याचे ते उदाहरण असते. सतीश खाडे हे उच्चशिक्षित व्यक्तिमत्त्व. त्यांचे बालपणदेखील समृद्ध अशा नगर जिल्ह्यातील, राहता या गावी गेले. पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या खाडे यांनी, प्रवरानगर येथून बी.ई. सिव्हील ही पदवी प्राप्त केली. तसा हा सगळा भाग पाण्यांनी समृध्द असाच. त्यामुळे त्यांना पाण्याच्या टंचाईची तीव्रता भासण्याचा, जाणवण्याचा प्रश्नच नव्हता. आज मात्र हा माणूस भविष्यातील भीषण पाण्याच्या संकटांची चाहूल लागल्याने, सतर्क झाला आहे. अक्षरशः झपाटल्यागत सर्वांसाठी, पाणी या एकाच तत्वासाठी कार्य करीत आहे. महाविद्यालयीन जीवनात अस्वस्थ करणारं लिखाण वाचण्यात आलं, मग अशाच वास्तववादी लिखाणाची आवड जडली. वाचकप्रिय असलेल्या सतीश खाडे यांचे समाजसेवेत मन रमले.

 हे काम करताना त्यांना सामाजिक प्रश्नाचे मूळ हे पाणी आहे, याची प्रकर्षाने जाणीव होऊ लागली. मग त्यांचा पाण्यासाठी जीवन समर्पित करण्याचा प्रवास सुरू झाला. पाण्यामुळे गावातून होणारे माणसांचे स्थलांतर त्यांना अस्वस्थ करीत असे. लोकांना ही जाणीव तीव्र करून देण्यासाठी, समाजमाध्यमांचा त्यांनी उपयोग केला. पाणीव्यवस्थापनाच्या संदर्भातील सकारात्मक संदेशांचे आदानप्रदान होत असताना, लोकांकडूनच काही उपयुक्त सूचना येऊ लागल्या. मग सतीश खाडे नावाचे व्यक्तिमत्त्व हे खर्‍या अर्थाने समाजासाठी जलमय झाले. पाणी वाचविणे, ही काळाची गरज आहे हे ख्यात झालेले वाक्य, त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सार्थ करण्याचा ध्यास घेतला. आपल्या आगामी पिढ्यांना जगवायचे असेल, तर त्यांच्यावर पाणी व्यवस्थापनाचा संस्कार रुजला पाहिजे, ही त्यांची तळमळ आहे. भारतीय जलसंस्कृती मंडळाच्या पुणे शाखेचे अध्यक्ष असलेले सतीश खाडे, यांनी रस्ते, छोटी धरणे, तळी,खाजगी क्षेत्रातील कामे केली आहेत. त्यांनी गेल्या १२ वर्षांत पाणी व पर्यावरण जागृतीसाठी महाराष्ट्रभर ५५० पेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत. पाणी विषयावर विविध ठिकाणी त्यांचे शंभरहून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. ‘निसर्गाची नवलाई’ या विषयावर रोचक माहिती सांगणार्‍या पॉडकास्टची निर्मिती त्यांनी केली आहे.
 
त्यांच्या या कार्याची दखल घेत, अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कार बहाल केले आहेत. भरतपूरच्या लुपिन फाउंडेशनचा ग्रामोदय पुरस्कार, अलवरच्या तरुण भारत संघाकडून दिलेल्या पर्यावरणरक्षक सन्मान, पी.ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता पुरस्कारा इत्यादीचे ते मानकरी ठरले आहेत. रोटरीच्या माध्यमातून त्यांनी पाणी आणि पर्यावरणविषयक केलेली कामे अनेक आहेत. यात महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांत वॉटर बजेटिंगवर, ६० पेक्षा अधिक कार्यशाळा घेऊन प्रबोधन केले आहे. जलयुक्त शिवार योजनेत पुणे जिल्ह्यातील ११२ गावाच्या प्रतिनिधींना, वॉटर बजेटिंग प्रशिक्षण त्यांनी दिले आहे. महाराष्ट्रातील पहिला फेरोसिमेंट बंधारा डी.बी.एम.जी.फाउंडेशनच्या माध्य मातून बांधण्यात आला. त्याच्याविषयी फेरोसिमेंटच्या राष्ट्रीय परिषदेत, शोधनिबंधाचे वाचन देखील केले आहे. पुणे जिल्ह्यात ’कुंड प्रोजेक्ट’च्या माध्यमातून रोटरी ३१३१ च्या भरघोस सहकार्याने भोर, मुळशी, आंबेगाव तालुक्यातील डोंगरकपारीत पिण्याच्या पाण्याची वर्षभराची सोय करताना, त्यांनी १६ गावांचा जलविकास केला आहे. तसेच क्षारमुक्त व जंतूमुक्त पाणी, यासाठी आरओ प्लांटची उभारणी १८ गावांमध्ये केली आहे.
 
१६ गावांत बंधारा दुरुस्ती, बंधारे बांधणे, यातून गावांना शेतीच्या पाण्याची उपलब्धता वाढवणे, तीन गावांत जलस्रोत जीवंत करणे, दोन गावांत सीसीटी माध्यमातून जलसंवर्धन करणे, तसेच तीन गावात बोअरवेल रिचार्जिंगची कामे करण्यात, त्यांचे मोठे योगदान आहे. याशिवाय महत्वाचे म्हणजे भिगवण गावात शोषखड्डे घेऊन ८० टक्के भिगवण गटारमुक्त व डासमुक्त करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. याशिवाय, आपद्ग्रस्तांसाठी त्यांनी पाणी वाचविण्यासाठी पथदर्शी हायड्रोपोनिक प्रकल्प, झिम्बावे येथील चक्रीवादळात आपद्ग्रस्तसाठी सहा वॉटर फिल्टर पाठवले, ओरिसा चक्रीवादळातील आपद्ग्रस्तांसाठी, पाच कम्युनिटी वॉटर फिल्टर प्लांटची रवानगी केली. तसेच पुणे शहरातील दहा हजार नळांना फ्लो रेग्युलेटर्स बसवून, रोज लाखो लिटर पाणीबचत केली. वॉटरलेस युरिनल्सचा प्रसारदेखील ते करतात. शिवाय, निर्माल्याचे व मेेकॅनिकल कंपोस्टचा वापर करून, खतनिर्मिती करणार्‍या पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात त्यांनी केली आहे. भविष्यात ’मियावाकी फॉरेस्ट प्रकल्प’ उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याशिवाय, जलसाक्षरतेसाठीच्या जागराणासाठी जलोत्सव ,जलसप्ताहाचे आयोजन ते करीत असतात. त्यांच्या या कार्यास ‘दै. मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा.
 
 
अधिक माहिती साठी संपर्क - ९८२३०३०२१८
अतुल तांदळीकर