रालोआ आणि इंडी : बिहारवर दोघांची भिस्त

    18-May-2024   
Total Views |
Bihar Lok Sabha Elections

बिहारमध्ये मोठे यश मिळेल, असा ठाम विश्वास भाजपने व्यक्त केला आहे. बिहारचे राजकारण हाताळणार्‍या भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मते, यंदाही बिहारमध्ये गतवेळच्या यशाची पुनरावृत्ती करणे शक्य आहे. नितीशकुमार सोबत असल्याने साहजिकच भाजपचे बळ वाढले आहे. त्याचप्रमाणे बिहारमधील अतिशय किचकट अशा सामाजिक समीकरणे सोडवण्यातदेखील भाजपला यश आले आहे.

गुंतागुंतीची सामाजिक-राजकीय समीकरणे असलेले राज्य म्हणजे बिहार. एकेकाळी जयप्रकाश नारायण यांनी येथूनच नव्या क्रांतीचा नारा दिला होता. त्यानंतर कर्पुरी ठाकूर यांनी येथे सामाजिक न्यायाचा नवा अर्थ प्रस्थापित केला होता. अर्थात, त्यानंतर बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांचाही एक काळ होता, ज्यावेळी बिहारची ओळख ‘जंगलराज’ अशी झाली होती. त्यानंतर नितीशकुमार यांच्या रुपात बिहारमध्ये बदलाची आशाही निर्माण झाली होती. अर्थात, आपापल्या राज्यासह बिहारी नेत्यांनी राष्ट्रीय राजकारणातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. आतादेखील ‘इंडी’ आघाडीची सुरुवात नितीशकुमार यांनीच केली होती. अर्थात, त्यानंतर तेच त्यातून बाहेर पडले. मात्र, लालूप्रसाद यादव आणि त्यांचे पुत्र तेजस्वी यादव हे आजही ‘इंडी’ आघाडीची धुरा सांभाळत आहेत.
 
अशा या राज्यात लोकसभेच्या ४० जागा आहेत. उत्तर प्रदेशातील ८०, महाराष्ट्रातील ४८ आणि त्यानंतर बिहार हेच लोकसभा मतदारसंघांच्या दृष्टीने तिसरे सर्वात मोठे राज्य ठरते. त्यामुळे येथे विजय मिळविण्यासाठी प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) जागावाटपामध्ये भाजप १७, तर जदयु १६ जागा लढवणार आहे. त्याचप्रमाणे चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टी - ८, जीतनराम मांझी यांचा हिंदुस्थान आवाम मोर्चा आणि उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक समानता पार्टी प्रत्येकी एक जागा लढवणार आहे. तसेच ‘इंडी’ आघाडीमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलास (राजद) सर्वाधिक २६, तर काँग्रेसला नऊ जागा देण्यात आल्या आहेत, तर उर्वरित पाच जागा डाव्या आघाडीस देण्यात आल्या आहेत.
 
बिहारमध्ये भाजपसाठी कठीण वाटणारे समीकरण नितीशकुमार यांच्या रालोआमधील घरवापसीमुळे सोपे झाले आहे. अर्थात, नितीशकुमार यांच्या या घरवापसीमुळे एकप्रकारे त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मात्र, सध्या तरी नितीशकुमारांच्या घरवापसीमुळे त्यांच्या पक्षातही शांतता आहे. कारण, लालूपुत्र तेजस्वी यादव यांना नितीश यांच्यासह जदयुवरही कब्जा करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप जदयु नेत्यांकडून करण्यात येत होता. त्यामुळे नितीशकुमार यांच्या भाजपसोबत जाण्यामुळे पक्षांतर्गत आघाडीवर शांतता निर्माण करण्यात नितीश यांना यश आले आहे.कर्नाटक निवडणुकीनंतर बिहारमध्ये केलेल्या जात सर्वेक्षणाच्या आधारे लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्ष भाजपला कोंडीत पकडतील, असे मानले जात होते. मात्र, जात सर्वेक्षण करणारे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा रालोआ प्रवेश झाल्याने हा मोठा मुद्दा विरोधी पक्षांच्या हातातून बर्‍याच अंशी निसटला आहे.

आज जातजनगणनेचा मुद्दा फारसा प्रभावी ठरत नसल्याचे दिसते. याशिवाय कर्पुरी ठाकूर यांना ‘भारतरत्न’ देऊन भाजपने बिहारचे जातीय गणित सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. नितीश यांच्या प्रवेशानंतर मतदारांच्या मोठ्या वर्गावर भाजप आघाडीचा प्रवेश अगदी सहज दिसतो. जे काही काळापूर्वी भाजपसाठी कठीण काम दिसत होते. त्याचप्रमाणे जीतनराम मांझी, उपेंद्र कुशवाह, चिराग पासवान यांसारखे नेते रालोआसोबत असल्याने रालोआचे मताधिक्य ६० टक्क्यांच्या पुढे जाऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे.बिहारमध्ये मोठे यश मिळेल, असा ठाम विश्वास भाजपने व्यक्त केला आहे. बिहारचे राजकारण हाताळणार्‍या भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मते, यंदाही बिहारमध्ये गतवेळच्या यशाची पुनरावृत्ती करणे शक्य आहे. नितीशकुमार सोबत असल्याने साहजिकच भाजपचे बळ वाढले आहे. त्याचप्रमाणे बिहारमधील अतिशय किचकट अशा सामाजिक समीकरणे सोडवण्यातदेखील भाजपला यश आले आहे.
 
बिहारमध्ये प्रत्येक समुदायास प्रतिनिधित्व देणे अतिशय महत्त्वाचे ठरते. त्यामुळे भाजपने बहुतांशी समुदायांना लोकसभेतच प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासोबतच ज्यांना आता प्रतिनिधित्व देणे शक्य नाही, त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये प्रतिनिधित्वाचे आश्वासन दिले आहे. याद्वारे तेजस्वी यादव यांच्या रणनीतीस शह देण्यात यश आले आहे, असा दावाही भाजपतर्फे करण्यात आला आहे. भाजपने बिहारमध्ये नितीशकुमार यांना अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळून घेतले आहे. भाजपने आपल्या प्रचाराचा भर मोदी सरकारच्या लोककल्याणकारी योजनांवरच ठेवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जाहीर सभांमध्ये काँग्रेसच्या मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर भरपूर जोर दिला आहे. त्यातच तेजस्वी यादव यांनीदेखील मुस्लीम आरक्षणाच्या समर्थनार्थ वक्तव्य केल्यामुळे भाजपला त्याचा लाभच होणार असल्याची चिन्हे आहेत.
 
एकीकडे काँग्रेस लोकसभा निवडणुकीत देशात सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहे. मात्र, दुसरीकडे काँग्रेसचे स्टार प्रचारक बिहारच्या मैदानातून गायब आहेत. बिहारमध्ये ४० जागांवर होत असलेल्या निवडणुकीत आघाडीसह काँग्रेस ४० जागांवर विजयाचा दावा करत आहे. परंतु, शब्द आणि कृतीतील फरक त्यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. किंबहुना, बिहार लोकसभा मतदारसंघातील प्रचाराला धार देण्यासाठी काँग्रेसने स्टार प्रचारकांची मोठी फौज जाहीर केली होती. बिहारमध्ये प्रचारासाठी काँग्रेसने ४० नावांची मोठी यादी तयार केली होती. बिहारमध्ये प्रचार करणार्‍यांच्या यादीत सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचा समावेश आहे. कन्हैया कुमार, मिसा कुमार, अखिलेश प्रसाद सिंग यांच्यासह अनेक बड्या चेहर्‍यांचा स्टार प्रचारकांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

मात्र, आजपर्यंत बिहारमध्ये एक-दोन वगळता कोणीही प्रचारासाठी आलेले नाही. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी अमेठी आणि रायबरेलीच्या जागांवर आपली प्रतिष्ठा वाचवण्यात व्यस्त आहेत.लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे स्टार प्रचारक गायब दिसत आहेत, तर तेजस्वी यादव हे आरजेडीसोबत काँग्रेसच्या जागांवर प्रचार करताना दिसत आहेत. आतापर्यंत बिहारमधून काँग्रेसचे मोठे चेहरे गायब झाले होते. मात्र प्रत्येक जागेवर प्रचारासाठी काँग्रेस फक्त तेजस्वी यांनाच बोलावत आहे. काँग्रेसला बिहारपेक्षा स्वत:पेक्षा तेजस्वी यादव यांच्यावर जास्त विश्वास आहे. बिहारमध्ये काँग्रेस आरजेडीची व्होट बँक आणि तेजस्वीच्या आक्रमक प्रचार शैलीवर अधिक अवलंबून असल्याचे दिसते.