खेळ फुलराणीच्या शुभ्र फुलांचा...

    12-May-2024
Total Views |
 badmintan
 
 
बॅडमिंटन हा कधीही आणि कुठेही खेळता येणारा, सामान्य लोकांच्या जीवनात क्रिकेटनंतर जागा मिळवलेला मैदानी खेळ. भारतातील प्रत्येक जण कधीतरी बॅडमिंटन खेळला आहेच. आज भारतीय बॅडमिंटन खेळाडू आपल्या पराक्रमाचा डंका पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये गाजवायला तयार झाले असताना, त्याच पार्श्वभूमीवर या खेळाविषयी या लेखातून जाणून घेऊया...
 
लहान थोर असोत, गृहस्थ असोत, नोकरदार असोत, आयटीवाले असोत, अगदी गृहिणीसुद्धा या सगळ्यांचा लाडका, कमी खर्चाचा, जोडीला अजून एक सवंगडी किंवा त्याहून अधिक असले तरी चालणारा क्रीडाप्रकार आणि ऑलिम्पिकमध्ये भारताचे नाव झळकविणारा, भारताच्या फुलराणीचा क्रीडाप्रकार म्हणजे शटलकॉक अर्थात फुल-रॅकेटचा खेळ बॅडमिंटन. आपल्याला फुलराणी म्हणून माहिती असलेली सायना नेहवाल, तशीच पी. व्ही. सिंधू या भारतीय युवतींनी नावारुपाला आणलेला खेळ बॅडमिंटन. ती शुभ्र फुलं पुरुषांनाही तेवढीच मोहवत असतात.
 
सोसायटीच्या क्रीडागारात आपली नावनोंदणी करून, ठरविलेल्या वेळात आपापली रॅकेट पाठीला टांगून जाणारे, तसेच घराबाहेरील कोणत्याही जागेत, अगदी नेट (जाळं) असो अथवा नसो, तिथे दोरी बांधून दोन बाजू तयार करून, एवढेच नव्हे तर वेळप्रसंगी जमिनीवर आखून अथवा कल्पना करत केलेल्या जागेत खेळला जाणारा बॅडमिंटनचा खेळ आपल्यात प्रचंड लोकप्रिय आहे. रॅकेट व फूल (शटलकॉक) हा खेळ खुल्या मैदानात खेळता येत असला, तरी वार्याचा उपद्रव होत असल्याने प्रायः बंदिस्त प्रांगणामध्येच तो खेळला जातो.
 
जसा शटलकॉकचा हा खेळ असतो, तसाच शटलचा अजून एक खेळ म्हणजे शटलबॉल. शटलबॉलदेखील बॅडमिंटनच. या दोहोत काय फरक आहे ते बघून, मग फुलराणीच्या विषयाकडे आपण वळू. रोजच्या बॅडमिंटनपेक्षा भिन्न असलेला, शटलबॉल अर्थात बॉल बॅडमिंटन हा मूळचा भारतीय क्रीडाप्रकार. हा रॅकेट स्पोर्ट गेम लोकरीपासून बनविलेल्या पिवळ्या चेंडूने खेळतात. एका निश्चित आकारमानाच्या नेटने (१२ बाय २४ मीटर जाळीने) कोर्टवर विभागलेला हा खेळ, भारतातील तमिळनाडूमधील तंजावर जिल्ह्याची राजधानी असलेल्या तंजोर येथे १८५६च्या सुमारास राजघराण्यात खेळला जात होता. टेनिस आणि बॅडमिंटन या जातकुळीतल्या या बॉल बॅडमिंटनच्या वेगवान खेळासाठीही कौशल्य, तत्काळ प्रतिसाद, चांगला निर्णय, चपळता आणि मनगटाने चेंडू नियंत्रित करण्याची क्षमता आवश्यक असते.
 
बॅडमिंटनची फूलं हौशी खेळाडूंसाठी वेगळी आणि स्पर्धात्मक आणि व्यावसायिक खेळात वापरायला वेगळी असतात. बॅडमिंटनच्या शटल्सचे शंकू गोलाकार कॉर्कच्या पायावर बसविलेल्या १६ आच्छादित पंखांपासून बनविलेले असतात. बॅडमिंटनसाठी बूचाच्या झाडाच्या पातळ चांबड्यात किंवा कृत्रिम फुलांचा (शटल्सचा) वापर हौशी खेळाडूंद्वारे, त्यांचा खर्च कमी करण्यासाठी केला जातो. कारण पंख असलेले शटल सहजपणे तुटतात. हौशी खेळाडूंचे शटल्स नायलॉन, नैसर्गिक कॉर्क किंवा सिंथेटिक फोम बेस आणि प्लास्टिक स्कर्टसह बांधले जातात. पिसे किंवा प्लास्टिकचा वापर या बॅडमिंटनच्या फुलांत केला जातो. अनेक वर्षांपूर्वीपर्यंत शटलकॉक तयार करायला लागणारी पिसे, जीवंत पक्ष्यांची तोडली जायची, ज्यामुळे पक्ष्यांना वेदना होत असे.
 
आपल्याकडे सतत क्रिकेटची चर्चा चालूच असते की, जे जणू खेळाचे एक गृहीतकच आहे. तशातही अधूनमधून काही क्रीडाप्रकारांच्या चर्चा देखील होताना आढळतात. त्यातील फुलराणीचे बॅडमिंटन सध्या गेल्या काही दिवसात, क्रीडाप्रेमींच्या चर्चेत होते. दि. २७ एप्रिल ते दि. ५ मे या कालावधीत चीनमधील चेंगडू येथे ‘जागतिक बॅडमिंटन नियामक मंडळ’, ‘बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन’ (इथऋ) द्वारे आयोजित केल्या जाणार्या, थॉमस व उबेर आणि सुदिरमन चषक या द्वैवार्षिक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा नुकत्याच चर्चेत होत्या. चिनी संघाने पुरुषांचा ‘थॉमस चषक’ आणि ‘महिलांचा उबेर’ चषक, असे दोन्ही जिंकून या खेळातील आपले वर्चस्व निश्चित केले.
 
२०२४च्या थॉमस आणि उबेर चषकाचा अंतिम सामना, दि. ५ मे रोजी चीनमधील चेंगडू शहरात खेळला गेला. ‘थॉमस‘ आणि ‘उबेर चषक‘ या दोन्ही स्पर्धांमध्ये, तीन एकेरी आणि दोन दुहेरी सामने खेळले जातात. तथापि, जर एखाद्या संघाने सलग पहिले दोन एकेरी आणि पहिले दुहेरी सामने जिंकले, तर इतर सामने खेळले जात नाहीत. ‘सुदिरमन चषक‘ स्पर्धेमध्ये पाच सामने असतात, ज्यात पुरुष आणि महिला एकेरी, पुरुष आणि महिला दुहेरी, आणि मिश्र दुहेरी यांचा समावेश असतो. इंडोनेशियाचा माजी बॅडमिंटनपटू ‘सुदिरमन‘ याच्या नावावरून, या चषकाला नाव देण्यात आले आहे. हा चषक जिंकणारा यावेळचा देशही चीनच होता. ‘थॉमस चषक‘ स्पर्धेत भारतासह १६ संघ सहभागी झाले होते. मात्र, गतविजेता भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीतच, चीनकडून ३-१ तर, भारतीय महिला संघ जपानकडून ३-० असा पराभूत होऊन विजेतेपदातून बाहेर फेकला गेला.
 
बार्सिलोनामधल्या १९९२ च्या ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंट या खेळाने चार स्पर्धांसह पदार्पण केले ते म्हणजे, पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी आणि महिला दुहेरी. चार वर्षांनंतर मिश्र दुहेरी जोडण्यात आली. बार्सिलोना १९९२ ऑलिम्पिकमध्ये ‘दीपांकर भट्टाचार्य‘ आणि ‘यू विमल कुमार‘ यांनी पुरुष गटात, तर महिलांचे ‘मधुमिता बिष्ट‘ हिने बॅडमिंटनमध्ये भारताचे प्रथम प्रतिनिधित्व केले होते. भारतात दर्जेदार खेळाडूंची मोठी परंपरा आहे. नंदू नाटेकर (नंदकुमार महादेव नाटेकर), प्रकाश पदुकोण, सईद मोदी, पुलेला गोपीचंद, परुपल्ली कश्यप, अपर्णा पोपट, ज्वाला गुट्टा इ. दर्जेदार खेळाडू झाले आहेत.
 
‘लंडन २०१२‘ ऑलिम्पिकमध्ये सायना नेहवालने, महिला एकेरीचे ब्राँझ पदक जिंकले. नंतर पुल्लेला गोपीचंदच्या प्रशिक्षणाखाली खेळलेली ‘पुसारला वेंकट सिंधू‘ अर्थात ‘पी. व्ही. सिंधू‘ हिने ‘रिओ २०१६‘ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक ,आणि ‘टोकियो २०२०‘ मध्ये कांस्यपदक जिंकले. त्यानंतर तीन वर्षांनी जागतिक विजेतेपद जिंकत असताना, सायना हीच भारतीय बॅडमिंटनचा चेहरा होती. ‘किदंबी श्रीकांत‘ने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले, त्यानंतरही प्रकाशझोतात श्रीकांतपेक्षा सायनाच जास्त होती. बॅडमिंटनच्या क्षेत्रात आज आपण सहज डोकावले तर आपल्याला आढळून येईल की, आंध्रप्रदेश, तेलंगणातून बॅडमिंटन खेळातील नामवंतांची रसद भारतीय बॅडमिंटनला आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी पुरविली जात असते.
 
केवळ भारतातील काही ठराविक राज्येच नव्हे, तर महाराष्ट्रातीलदेखील काही महानगरे बॅडमिंटनसाठी वाखाणली जातात. अशा नामावलीत पुण्याचे नाव आपण दिमाखात घेऊ शकतो. याचे प्रमुख कारण म्हणजे बॅडमिंटन हा खेळ, पुण्यात उगम पावला असल्याचा इतिहास आहे. प्रारंभी तो ‘पूना गेम’ या नावाने ओळखला जात असे. भारतात आलेल्या ब्रिटिशांनी फावल्या वेळात खेळण्यासाठी, हा खेळ १८६०च्या सुमारास शोधून काढला. १८७१ साली त्यांनी इंग्लंडला हा खेळ नेला. १८७३ मध्ये ग्लॉस्टरशर परगण्यातील बोफर्टच्या उमरावाने आपल्या बॅडमिंटन नामक निवासस्थानी या खेळाचा परिचय मेजवानीनिमित्त जमलेल्या पाहुणेमंडळींना करून दिला. त्यावरून या खेळाचे ‘बॅडमिंटन’ हे नामकरण रूढ झाले. या खेळाचे आद्य नियम ’कराची’ येथे १८७७ साली ‘कर्नल सेल्बी‘ यांनी तयार केले.
 
१९२५ पासून खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय दौरे सुरू झाले. ‘द इंटरनॅशनल बॅडमिंटन फेडरेशन’ (आयबीएफ) ही या खेळाचे जागतिक नियंत्रण करणारी संस्था १९३४ मध्ये स्थापन झाली. तिच्यामार्फत पुरुषांसाठी ‘थॉमस चषक’ स्पर्धा १९४० पासून सुरू झाल्या. स्त्रियांसाठी ‘उबेर चषक’ १९५७ पासून सुरू झाल्या. भारतातील या खेळाचे नियंत्रण करणारी ‘बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया’ ही संस्था १९३४ साली स्थापन झाली, व १९३५ पासून या खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धाही सुरू झाल्या. २००८ सालातील कनिष्ठांची‘विश्व बॅडमिंटन स्पर्धा’ पुणे येथे घेण्यात आली होती. पुण्यानंतर आता २०२४च्या कनिष्ठांच्या‘ विश्व बॅडमिंटन करंडक स्पर्धेत’ सांघिक आणि वैयक्तिक सामने खेळविले जातील. सदर स्पर्धा गुवाहाटीच्या ‘राष्ट्रीय बॅडमिंटन संकुला’त होणार आहेत. दि. २८ एप्रिल रोजी ‘विश्व बॅडमिंटन संघटने’ची कार्यकरणी पार पडली होती. त्यात काही घोषणा करण्यात आल्या, त्यानुसार २०२६च्या ‘थॉमस‘ आणि ‘उबेर चषक‘ स्पर्धेचे यजमानपद, डेन्मार्क भूषविणार आहे. २०२१ साली डेन्मार्कमध्ये पहिल्यांदा जागतिक दर्जाची, पुरुष आणि महिलांची सांघिक बॅडमिंटन स्पर्धा घेतली होती.
 
आत्ता पार पडलेल्या ‘थॉमस‘ व ‘उबेर चषक‘ स्पर्धेत भारतीयांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. पण मग परत दोन वर्षांनंतर ’डेन्मार्क‘ येथे आपले बॅडमिंटनपटू नक्कीच चांगली कामगिरी करून दाखवतील, असा आपल्या सगळ्यांना विश्वास आहे. कारण, भारताने २०२२ रोजी पहिल्यांदाच ‘थॉमस चषक‘ जिंकला होता. १९८० मध्ये प्रकाश पदुकोण जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. त्याच वर्षी त्यांनी ऑल इंग्लंड स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्यानंतर पुलेला गोपीचंदने २००१ मध्ये, ‘ऑल इंग्लंड स्पर्धेचे विजेतेपद पटकविण्यापासून ते सायना नेहवाल जागतिक क्रमवारीत अव्वल बनण्यापर्यंत, आणि पीव्ही सिंधू विश्वविजेती बनण्यापर्यंतचा हा प्रवास आपण पाहिला आहे. पण, ‘थॉमस चषक‘ जिंकणे ही भारतीय बॅडमिंटनची सर्वोत्तम कामगिरी होती, असे आपण म्हणू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही २०२२ मध्ये, दूरध्वनीवरून वैयक्तिकरित्या त्या विजयी संघाचे अभिनंदन केले होते. तर केंद्रीय क्रीडामंत्री ‘अनुराग ठाकूर‘ यांनी त्या २०२२च्या संघाला एक कोटी रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. पंतप्रधान व क्रीडामंत्र्यांची ही २०२४ साठी चुकलेली संधी २०२६ रोजी नक्की मिळेल, अशी आपण आशा करत आहोत.
 
आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका, ओशियाना या पाच खंडांतले १९४ देश, जागतिक बॅडमिंटन संघटनेचे सदस्य आहेत. आशियाई देशांनी बॅडमिंटन जगतात सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले आहे. बॅडमिंटन हा इंडोनेशियाचा राष्ट्रीय खेळ आहे, आणि या देशाने प्रतिष्ठित ‘थॉमस चषक‘ १४ वेळा जिंकला आहे. चीनने हा चषक ११ वेळा जिंकला आहे. ‘थॉमस चषक‘ पहिल्यांदाच जिंकून भारतही त्या देशांच्या पंक्तीत २०२२ साली जाऊन बसला आहेच.
 
आता दि. २६ जुलै ते दि. ११ ऑगस्ट दरम्यान ‘पॅरिस ऑलिंपिक २०२४‘ होणार आहे. त्यात ‘थॉमस व उबेर चषक‘ स्पर्धेत सहभाग घेतलेल्या चमूतले, भारतीय बॅडमिंटनपटूही असतील. त्यांच्याकडून आपण पदकांच्या अपेक्षा ठेवून आहोतच. दोन ऑलिंपिक पदकविजेत्या, पी. व्ही. सिंधूसह सात भारतीय बॅडमिंटनपटूंनी क्रमवारीच्या आधारे, चार गटांत पॅरिस ऑलिंपिकसाठी अधिकृतपणे पात्रता मिळविली आहे. सिंधू आणि एकेरीत आघाडीचा खेळाडू एच. एस. प्रणॉय, तसेच लक्ष्य सेन यांनी यापूर्वीच ऑलिंपिकमधील आपले स्थान निश्चित केले होते. मात्र, याची औपचारिकता आता पूर्ण झाली. नियमानुसार ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या पात्रता क्रमवारीनुसार, पुरुष व महिला एकेरीतील शीर्ष १६ बॅडमिंटन खेळाडू, हे ऑलिंपिकसाठी पात्रता मिळवितात. नियमानुसार सिंधू ही १२ व्या स्थानी होती, तर पुरुष एकेरीत प्रणॉय व लक्ष्य अनुक्रमे ९ व्या आणि १३ व्या स्थानी होते. सात्त्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी ही जोडी तिसर्या स्थानी राहिली. या जोडीकडून भारताला पदकाची सर्वाधिक अपेक्षा आहे. महिला दुहेरीत तनिषा क्रॅस्टो व अश्विनी पोनप्पा ही जोडी १३ व्या स्थानी राहिली. ट्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद या महिला दुहेरी जोडीला मात्र पात्रता मिळविता आली नाही.
 
आता आगामी पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये पदक मिळविण्यासाठी खात्रीचा क्रीडाप्रकार, हे फुलराणीचे शुभ्र फूल असेल. पॅरिसमधील बॅडमिंटन क्रीडागारात प्रतिस्पर्ध्यांच्या नाकीनऊ आणण्यासाठी, आपापल्या रॅकेट्स घेऊन सज्ज झाला असेल. सुवर्ण-रौप्य-कांस्य ही किंवा यातील एखाददोन पदके पटकाविण्यासाठी आम्ही लवकरच पॅरिसला जाणार आहोत. तुमच्यापैकी अनेकांचे बोर्डींग पास तयार ठेवले आहेत. हे तुमचे बोर्डिंग पास घेऊन, तुम्ही सगळे बॅडमिंटनपटू पॅरिसमध्ये यशस्वी होऊन बॅडमिंटन इतिहासात एक नवीन पान लिहून परत या. फुलराणीच्या शुभ्र फुलांचा हा खेळ असाच बहरत राहो, असे तुमच्याकडे मागणे मागताना तुम्हा बॅडमिंटनपटूंना आम्हा भारतीय क्रीडाप्रेमींच्या मनापासून शुभेच्छा व आशीर्वाद देत आहोत.
 
श्रीपाद पेंडसे 
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत )
९४२२०३१७०४