वसई विजय दिन

    11-May-2024   
Total Views |
 
vasai fort
 
आज मी तुम्हाला वसईची गोष्ट सांगणार आहे. ११ मे म्हणजे वसई विजय दिन. खरेतर वसई म्हणजे पोर्तुगीज आणि पर्यायाने ख्रिस्ती वस्ती असं समीकरण झालेलं आहे. पण वसईचा किल्ला मात्र या दुहीचा जोडून ठेवणारा आणि धर्म बदल झालेल्या मूळ हिंदू ख्रिस्तींची संस्कृती त्यांच्याशी एकसंध ठेवणारा दुवाच आहे. तसे पहिले तर हा किल्ला गॉथिक शैलीत बांधलेला आहे. म्हणजे पोर्तुगीज शैली. पण त्याचा इतिहास मात्र अनेक वळणे घेतो. तो केवळ पेशवे पोर्तुगीज असा नाही. या व्हिडिओमध्ये मी काही अभ्यासपूर्ण माहिती सांगेन तरीसुद्धा तुम्हाला कंटाळा येणार नाही याची काळजी घेईन.
 
कोणे एके काळी मुंबईपेक्षाही अत्यंत महत्वाचे बंदर असलेल्या वसईच्या दुर्दैवाला सुरुवात झाली ती गुजरातच्या बहादुरशहा ने स्वारी करून बिम्बराज्य मोडकळीस आणले तेव्हापासून. त्यावेळी स्वतःच्या नावावरून नामकरण करून वसईस बहाद्दरपूर असे नाव त्याने दिले. या बहादूर शहाची मदत घेऊनच पोर्तुगीज (फिरंगी) यांनी व्यापाराचे निमित्त करून उत्तर कोकणात शिरकाव केला. इ स १२० गौतमीपुत्र सातकर्णी याने पश्चिम किनाऱ्यावर सत्ता स्थापन केली. १३१४ ते १४१४ दरम्यान क्षत्रिय नाथोजी सिंदा भंडारी भोंगळे यांची ४ बुरुजांची गढी बांधली. १५३० गुजरात सुलतान बहादुरशहा आक्रमण झाले. १५३४ गढी पोर्तुगीजांना बहाल केली. १५३५ बालेकिल्ल्याच्या बांधणीला सुरुवात झाली. १६०० मध्ये पूर्तता झाली. १६६१ चिमाजी निशाण किल्ल्यावर फडकले. या दिवशीच वसई विजय दिन साजरा केला जातो.
 
चौदाव्या शतकापासून वसईचा इतिहास वसईच्या किल्ल्याभोवती फिरत राहतो. किंबहुना किल्ल्यामुळे जपणूक झालेला तेवढाच इतिहास ज्ञात असावा. बाकी स्थानिक गोष्टी, घटना कालौघात पुसून गेल्या असाव्यात. आता पोर्तुगीज काळात काय झाले? नूनहो ड कुन्हा या गव्हर्नर च्या हुकुमाबरोबर पहिले कप्तान गार्सिया डिसा यांनी १५३६ साली हा किल्ला बांधला. असे संत गोन्सालो अनाथालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पोर्तुगीज भाषेत कोरलेला शिलालेख आहे, त्यावरून समजते. या शिलालेखाचे भाषांतर फादर कोरिया यांनी आपल्या पुस्तकात केलेले आहे.
 
मध्यंतरीच्या काळात जेव्हा पोर्तुगीज किल्ल्यावर व किल्ल्या आजूबाजूच्या परिसरावर राज्य करत होते तेव्हा धर्मप्रसार सुद्धा करत होतेच. विहिरीत पाव टाकून धर्म भ्रष्ट केला असे हिंदूंना पटवून देत होते तसेच, हाती मिळतील त्या स्त्रियांवर बलात्कार करून आपल्या नावाने वंशवेल फुलवत होते. त्या किल्लेदाराच्या नावाने आणि आडनावाने अजूनही कित्तीतरी कुटुंबे ओळख लावत आहेत. जसे कि, Nuno da kunha - Governer 9 यावरून डीकुन्हा, Captain Garcia disa या नावावरून गार्सिया आणि डायस अशी २ नावे. Antonio galwak वरून अंतोनि, Captain andre salema वरून सेल्मा हे आडनाव आहे. Dom luee francicko narona वरून लुईस, फ्रान्सिस व नरोन्हा ही नावे आढळून येतात. Captain desuza perira- last Portuguese genral वरून डिसोझा आणि परेरा अशी नावे आहेत. Pero disilva - voiceroy वरून डिसिल्वा नाव आहे व Pedru damel वरून डिमेलो हे नाव वापरात आहे. Silvera minezis वरून सिल्व्हेरा हे नाव आहे तर कुपारी ख्रिश्चनांमध्ये मिनेझिस हे नाव आहे. ही नावे त्यांच्या नावावरून तसेच आडनावावरून सुद्धा घेतली गेली आहेत. मात्र ती कशाच्या आधारे घेतली गेली किंवा लादली गेली याच्याबद्दल काही पुरावे मिळत नाहीत. त्याचबरोबर पूर्वीचे (म्हात्रे) आडनाव लावणारी काही ख्रिस्ती कुटुंबे सुद्धा वसईत वास्तव्य करून आहेत. त्यांच्यावर आडनाव बदलण्याची जबरदस्ती का झाली नसावी याचे कारण अज्ञात आहे.
 
या जनतेच्या त्रासाला वैतागून पुण्यात शनिवारवाड्यातून वसईची मोहीम आखली गेली. पोर्तुगीजांनी शरणागती पत्करताच, रामचंद्र हरीने मराठ्यांच्या विजयाचं भगवं निशाण विजयस्तंभावर चढवलं वैशाख वद्य शके १६६१, १२ मे १७३९ रोजी.
वसई किल्ल्यावर मराठ्यांनी विजय मिळवला त्यादिवसाबाबत अनेक वितर्क अनेक नोंदी वेगवेगळ्या ऐतिहासिक साधनांत नोंद केल्या गेलेल्या आहेत.
 
धर्मप्रसार करणे हेच मूळ उद्दिष्टय ठेऊन आलेल्या या फिरंग्यांनी मिळेल त्या मार्गाने जनतेला बळजबरीने ख्रिस्ती करून घेण्यास सुरुवात केली. धर्म म्हणजे काय हे त्यांना कळलेच नव्हते. धर्माच्या संकल्पना त्यांच्या नक्की काय असाव्यात असा विचार त्यांची कृत्ये अजूनही करायला लावतात. ज्या येशूच्या नावाच्या धर्माचा प्रसार त्यांनी चालू केला होता त्या येशूने हे कधी स्वप्नात सुद्धा चिंतिले नसेल. त्याच्या विचारसरणीच्या साच्यात हे बसत नव्हते. १५३४ ते १७३९ - पोर्तुगीज यांची सत्ता वसईवर होती. मराठयांनंतर १८१८ मध्ये ब्रिटिश सरकार आले व १८१९ - वसईला मुंबईचा भाग बनवले. धर्मप्रसार करताना किल्ल्यातील सात चर्च सोबतच वसईत इतर भागात अजून नऊ ख्रिस्तमंदिरे बांधली. ही सर्व ख्रिस्त मंदिरे स्थानिक गावदेवतांच्या स्थानावर बांधलेली आहेत. जसे कि रमाई मातेच्या जागी रमेदी चर्च. ज्यांचा उपयोग अजून प्रार्थना करण्यासाठी केला जातो.
 
पेशवाई राजकारणात अहिल्याबाईंपासूनच संघाचं सुरु होते. रणसंग्रामात शिंदे होळकर संबंध बिघडले ते बिघडलेच, त्याचे पडसाद वसईवर सुद्धा उमटले. इंग्रजांची मदत घेतली आणि स्वराज्यातला वसई किल्ला परत इंग्रजांच्या स्वाधीन झाला. ११ मे १७३९ रोजी वसई विजय मिळाला व २५ ऑक्टोबर १८०२ रोजी होळकर आणि शिंदे पेशवे यांचे युद्ध झाले. त्यानंतर ३१ डिसेम्बर १८०२ दिवशी इंग्रजांची मदत घेतली, तोच तो वसईचा कुप्रसिद्ध तह, त्यानंतर पेशवे सत्ता संपुष्टात आली. या वसई किल्ल्यातील ख्रिस्त मंदिरातील घंटा मात्र अनेक ठिकाणी मंदिरांना दान दिल्या गेल्या. त्यातली एक घंटा नाशिकच्या नारो शंकर मंदिरात अजूनही आहे.
 
108 एकर परिसरात पसरलेला हा वसईचा भुईकोट किल्ला आज अनेक वर्षे इतिहास जपत उभा आहे. कित्तीतरी प्रमाणात पडझड झालेला, काही प्रमाणात पुनर्बांधणी केलेला, उल्हास नदी जिथे समुद्राला मिळते त्या भाईंदर खाडीच्या कुशीत हिरवी संपदा सांभाळून शौर्याच्या, बेईमानीच्या, स्वार्थाच्या, परोपकाराच्या, जुलूमाच्या,आपलेपणाच्या, विजयाच्या आणि त्याच बरोबर दुःखाच्या कहाण्या घेऊन अजूनही स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि गौरवशाली इतिहासासाठी इथल्याच समाजाशी लढा देत आहे. इथल्या लोकांना आपल्या वसईतील इतक्या राजवटी पाहिलेल्या ह्या किल्ल्याविषयी अभिमान, आपलेपणा वाटत नाही असे बिलकुल नाही, परंतु किल्ले समजून घेण्याची तेवढी इच्छा क्वचितच दिसून येते. गुजरात चा सुलतान बहादूर शहा पासून फिरंगी, मराठे आणि मग ब्रिटिश इतक्या राजवटी पाहिलेला हा किल्ला इथल्या स्थायिक ख्रिस्ती आणि हिंदू बांधवाना एकत्र सांधून ठेवणारा दुआ आहे. किल्ल्यातले भुयार, रंगीत नक्षीदार बाप्तिस्मा कुंड अशा अनेक गोष्टी आहेत. त्याविषयी सविस्तरर माहिती हवी असल्यास कमेंट्स बॉक्स मध्ये आम्हाला जरूर कळवा.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.